व्हिएतनामची रामकथा नृत्यनाट्ये

    05-Apr-2025
Total Views | 10

article on vietnamese ramayana dances
 
व्हिएतनाममध्ये रामकथेचा सांस्कृतिक प्रभाव अत्यंत खोल असून, तेथील समृद्ध परंपरेचा तो एक भाग आहे. प्राचीन ‘चम्पा’ राजवंशाने भारतीय संस्कृतीशी असलेली आपली नाळ अधिक दृढ केली आणि रामकथेचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला. ‘चाम’ व ‘खमेर’ समाजांनी आपल्या नृत्यनाट्य परंपरांमधून, रामायणाच्या कथा आणि पात्रांना सजीव ठेवले. ‘त्रुयेन कियू’ आणि ‘रोबन याक’ सारख्या लोककला प्रकारांमध्ये रामकथेतील मूल्ये, नीतिकथा आणि आदर्श यांचे प्रभावी दर्शन घडते. बौद्ध संस्कृतीत देखील रामकथेची छाया जाणवते, जिथे प्रभू राम आदर्श पुरुष व धर्मनिष्ठ राजा म्हणून पूजले जातात. व्हिएतनामच्या जनमानसांत रामकथेची ही परंपरा अजूनही जिवंत आहे. याच व्हिएतनामच्या रामकथेचा घेतलेला हा मागोवा...
 
रामकथेचा विश्वसंचार थक्क करणारा आहे. विशेषतः आग्नेय आशियातील मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस या देशांप्रमाणेच व्हिएतनाममध्येही रामकथेचा तेथील साहित्य, संस्कृती आणि कलेवर आजही स्पष्ट ठसा आहे. रामकथेच्या प्रभावाची प्रसादचिन्हे, व्हिएतनाममधील ‘रोबन याक’ (ROBAN YAK) ‘त्रुयेन कियू’ (TRUYEN KIEU) इत्यादि नृत्यनाट्यांतून हजारो पर्यटक आजही अनुभवत आहेत. मध्य व्हिएतनाममधील खमेर आणि चाम समाजातल्या उत्सवांमधील नृत्यनाट्यांत, रामकथांच्या सुवर्णबीजांचे अनोखे दर्शन घडते.
 
व्हिएतनामचा संक्षिप्त इतिहास-भूगोल
 
व्हिएतनामला फार मोठा रोमहर्षक इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण भूगोल आहे. भारताच्या दक्षिण पूर्वेस महासागरातील बेटांनी संपन्न असे अनेक छोटे-मोठे देश आहेत. या देशांना ‘आग्नेय आशियाई देश’ म्हणून ओळखले जाते. कोणे एके प्राचीन काळी हे देश बृहद् भारताचेच भाग होते. त्यात २० वर्षांच्या झुंझार युद्धामुळे जगात प्रसिद्ध झालेला व्हिएतनाम हा छोटासा देश. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या देशातील शेकडो समुद्र किनारे, जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. आर्थिक उदारीकरण व सामाजिक खुलेपण हे नव्या विद्यमान व्हिएतनामच्या प्रगतीचे द्योतक आहे. राजकीय परिभाषेत व्हिएतनाम हा समाजवादी प्रजासत्ताक, एकाच साम्यवादी पक्षाची हुकूमशाही राज्यव्यवस्था असलेला देश आहे. उत्तर व्हिएतनाममधील हनोई हे शहर हे या देशाची राजधानी असून, दक्षिण व्हिएतनाममधील ‘हो चि न्मिह’ हे देशातील सर्वांत मोठे महानगर आहे. हा देश धर्मनिरपेक्ष असून, देशातील ८५ टक्के प्रजा ही बौद्ध धर्मावलंबी आहे आणि त्यांच्यावर स्वाभाविकपणे भारतीय संस्कृती, रामकथा यांचा प्रभाव आहे. तसेच बर्‍याच लोकांवर ‘कन्फ्युशियस’ आणि ‘माओ’ विचारांचाही पगडा आहे.
 
१९व्या शतकात फ्रान्स आक्रमकांनी व्हिएतनामवर कब्जा मिळवला आणि व्हिएतनाम फ्रान्सची एक वसाहत झाला. द्वितीय महायुद्ध काळात जपानने व्हिएतनाममधील फ्रेंच सैन्यावर आक्रमण करून, त्याचा पराभव केला आणि व्हिएतनाम जपानच्या ताब्यात गेला. महायुद्ध संपताच फ्रान्सने पुन्हा व्हिएतनाम मिळवण्यासाठी युद्ध केले, पण त्यात व्हिएतनामचाच विजय झाला. दि. २ सप्टेंबर १९४५ रोजी व्हिएतनाम फ्रान्सच्या पारतंत्र्यातून मुक्त, स्वतंत्र झाला. पण, जिनेव्हा करारानुसार, व्हिएतनामचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन स्वतंत्र देशांत विभाजन करण्यात आले. त्यानंतर १९५४ ते १९७५ अशी २० वर्षे दोन्ही देशात प्रदीर्घ युद्ध झाले. उत्तर व्हिएतनामच्या पाठीशी चीन-मंगोलिया, तर दक्षिण व्हिएतनामच्या मागे अमेरिका-फ्रान्स अशा युद्धाने सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेतले. १९७५ मध्ये व्हिएतनाम युद्धाचा शेवट झाला. त्यानंतर उत्तर व दक्षिण अशा दोन्ही व्हिएतनामचे ऐतिहासिक एकीकरण झाले. १९८५ नंतर साम्यवादी सरकार सत्तारूढ झाले व नव्या आर्थिक धोरणांनी व्हिएतनामची अभूतपूर्व प्रगती झाली
.
भारत-व्हिएतनाम पूर्वापार संबंध
 
भारतवर्षाचे व्हिएतनामशी पूर्वापार, प्राचीन संबंध आहेत. वर्तमान व्हिएतनाममधील मध्य आणि दक्षिण भाग प्राचीन काळी, भारतीय हिंदू राजांच्या राजवटीचा भाग होते. या राज्याला ‘चम्पा राज्य’ म्हणून ओळखले जात होते. (इ.स. पूर्व १९२ ते १८३२) आजही व्हिएतनामच्या मध्य भागात ‘चाम समाज’ राहतो. तो शैव उपासक असून, या चाम समाजाने स्थापन केलेल्या अनेक शिवलिंगांची-मंदिरांची माहिती आपण तेथील भव्य संग्रहालयांत पाहू शकतो.
 
व्हिएतनामचा एक भूभाग भारतीय चोल साम्राज्याचाही अभिन्न घटक होता. व्हिएतनाम प्राचीन काळी ‘चम्पानगरी’ म्हणूनही ओळखले जात होते. त्या काळच्या चम्पा राज्याचा नकाशा संग्रहालयात उपलब्ध आहे. चाम समाज आज व्हिएतनाममध्ये अल्पसंख्य आहे. पण, त्यांनी पूर्वी स्थापन केलेली शिवलिंगे, मूर्ती आणि लाल विटांची कलाकुसरीने नटलेली मंदिरे आज पर्यटकांसाठी आकर्षण व अभ्यासाचा विषय असून, ‘युनेस्को’ने त्यांना जागतिक वारसा स्थळांची मान्यता दिलेली आहे. ‘मी सान’ (My Son) आणि ‘होई आन’ (Hoi An) ही जागतिक वारसा स्थळे, भारतीय संस्कृती व व्हिएतनामी चाम समाजाच्या प्राचीन संबंधाची प्रतीके आहेत. चाम समाजाचा महाभारतकालीन किरात समाजाशी वंशीय संबंध मानला जातो.
 
इ. स. १९२ मध्ये स्वतंत्र चम्पा राज्याची स्थापना झाली. संस्थापक श्रीमार तथा किड लिएन हा त्या राज्याचा पहिला नरेश राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव चम्पापूर ठेवले. हे गाव आजही भग्नावशेष रूपात पाहता येते, सध्याच्या कुअंग न-मच्या दक्षिणेस ‘किओ’ नावाने ते ओळखले जाते. या चम्पा राजघराण्यातील धर्म महाराज श्री भद्रवर्मन् (चिनी नाव : फन-हु-ता). हा इ.स. ३८० ते ४१३ काळात होऊन गेला. हा सर्वांत लोकप्रिय राजा मानला गेला आहे. त्याच्या सुपुत्राचे नाव गंगाराज होते. गंगाराज, विजयवर्मन, रूद्रवर्मन, प्रभासधर्म, ईशानवर्मन अशी पुढील राजांची नावे वाचली, तरी त्याचा भारतीय संस्कृतीशी असलेला दृढसंबंध स्पष्ट होतो. इ.स. ८५४ मध्ये अन्नम् लोकांनी केलेल्या आक्रमणाने, चाम नरेश पो चोंग कंबुजला म्हणजे सध्याच्या कंबोडिया राज्यात पळून गेला. त्याची मुलगी राजकुमारी पो-बिअ मागे राज्यात राहिली, कालांतराने तिचा देहान्त झाला. आणि बृहद् भारतातील एका गौरवशाली हिंदू राज्याचा अध्याय समाप्त झाला. चम्पा राज्यकारभाराची भाषा संस्कृत होती. चम्पा राज्यात निर्मित मंदिरांचे भग्नावशेष आजही पाहता येतात. ही मंदिरे दक्षिण भारतीय शैलीतील आहेत. इ.स. १९५४ ते १९७५ या काळातील युद्धात अमेरिकन सैन्याने केलेल्या प्रचंड बॉम्ब वर्षावाने व भूसुरूंगांनी व्हिएतनाममधील अनेक प्राचीन वास्तू-मंदिरे-स्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. हे व्हिएतनामचे फार मोठे ऐतिहासिक नुकसान आहे.
 
रामकथेची सुवर्णबीजे
 
आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये तेथील स्थानिक भाषेत वाल्मिकींच्या रामकथेची रूपांतरित आवृत्ती मिळते. तशा प्रकारचे ग्रंथ रूपात वा साहित्य रूपात वाल्मिकी रामायणाचे व रामकथेचे, व्हिएतनामी स्थानिक भाषेत रूपांतर-भाषांतर, लिप्यंतर झालेले नाही. इंडोनेशियात स्थानिक भाषेत ‘काकावीन’ रामायण, कंबोडियात ‘रामकेर’ (Ream ker) आहे, तशा प्रकारचा शब्दाविष्कार व्हिएतनामी भाषेत झालेला आढळत नाही. व्हिएतनाममध्ये जे विविध समाजघटक आहेत, त्यांतील चाम आणि खमेर या समाजामध्ये सण, उत्सव, नववर्ष दिन या प्रसंगी होणारी विविध लोकनृत्ये, नृत्यनाट्ये ही मूळ रामकथेच्या बीजातून फुललेली आहेत.
 
खमेर हा लोकसमूह-समाज, मध्य व्हिएतनाममधील एक प्रमुख समाजघटक आहे. हा समाज मूळचा कंबोडियाचा. तेथून तो व्हिएतनाममध्ये येऊन, शेकडो वर्षांपूर्वी स्थायिक झाला व व्हिएतनामचाच एक घटक झाला. कंबोडियात प्रसिद्ध असलेले (Ream ker) हे रामकथेवर आधारित नृत्यनाट्य, खमेर लोक बरोबर घेऊन आले. ‘रामकेर’ म्हणजे रामाची थोरवी (Glory of Ram) रामकथांवर आधारित स्थानिक रंग-रूप शैली लाभलेली नृत्यनाट्ये, खमेर लोक संस्कृतीची अभिन्न अंग आहेत. अशी कला सादर करणारी अनेक नृत्यपथके, मंडळी येथे आहेत. आपल्या उत्तर भारतात जशी रामलीला सादर करणारी कलापथके आहेत, तशीच ही नृत्यपथके आहेत. या रामकथा आधारित रूपांतरित नृत्यनाट्याचा महोत्सव, नवी दिल्लीतील कामानी सभागृहात २०१८ साली झाला होता. भारत सरकारच्या सांस्कृतिक देवाणघेवाण परिषदेने हा ‘आशियान २०१८ महोत्सव’ आयोजित केलेला होता.
 
या नृत्यामध्ये ढोल, टाळ, धुगरे या तालवाद्यांचा विशेष उपयोग केला जातो. तसेच बासरी, ट्रम्पेट, पिपाणी या वाद्यांचीही त्यास साथ असते. एकेका नृत्यात दहा ते १२ कलाकार असतात. सहा स्त्रिया आणि चार पुरुष किंवा सहा पुरुष, सहा स्त्रिया. पुरुष कलाकार पांढरी लुंगी, कुर्ता, कंबरपट्टा हा पारंपरिक पोषाख घालतात, तर महिला निळा पायघोळ गाऊन, त्यावर लाल दुपट्टा, डोक्यावर विशिष्ट प्रकारचा टोप घालतात. त्यांचे तालवाद्याच्या ठेक्यावरील सफाईदार पदन्यास आणि हस्तमुद्रा अत्यंत आकर्षक-चित्तवेधक असतात. हातातील पंख्याचा वापर आणि डोक्यावरील टोपातील फुले, उंच मेणबत्ती यामुळे नृत्याला एक वेगळेच चैतन्य लाभते. येथील ’ROBAN YAK' हे नृत्य, रावण-हनुमान युद्धाचे कलात्मक दर्शन आहे. यात रावण-हनुमान हीच दोन मुख्य पात्रे आहेत. त्यांचे मुखवटे व्हिएतनामी कलेचे सुंदर नमुने आहेत. सत्य-असत्य, सुष्ट विरुद्ध दुष्ट प्रवृत्तीचा मूल्य संघर्ष असे या नृत्यनाट्याचे मुख्य वर्म आहे.
 
येथील संग्रहालयात इ.स. सातव्या शतकातील राजा प्रकाशवर्मन याचा शिलालेख उपलब्ध आहे. त्यामध्ये रामायणकर्ते वाल्मिकी ऋषींचा श्रद्धापूर्वक उल्लेख असून, त्यांना अभिवादन केलेले आहे. तसेच ‘त्रा कियू’ (Tra kieu) गावातील प्राचीन शिवलिंगाच्या चौथर्‍यावरील पट्टीवर, चारही बाजूंनी रामायणातील चार प्रसंग कोरलेले शिल्प हे व्हिएतनाममधील रामकथा संचाराचे, प्रभावाचे थक्क करून टाकणारे अनोखे दर्शन आहे. व्हिएतनाम पर्यटन करणार्‍यांनी या सर्व रामायणाच्या पाऊलखुणा-प्रसादचिन्हे असलेल्या स्थळांना आवर्जून भेट द्यावी.
 
 
विद्याधर ताठे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121