फ्रालाक् फ्रालाम लाओसचे रामायण

    05-Apr-2025
Total Views | 17
 
article on laos ramayana
 
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्‍या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष्कारसुद्घा केला. मग लाओस देश तरी कसा याला अपवाद असेल? ‘लाओस रामायण’ म्हणजे, लाओसला भारताशी स्नेहपूर्वक जोडणारा जणू रामसेतूच!
 
भारताच्या आग्नेय दिशेला कंबोडियाला लागूनच असलेला लाओस हा लहानसा देश. लाओस म्हणजे रामायणातील ‘लवाचा देश’ अशी इथल्या लोकांची धारणा. साधारणपणे इसवी सनाच्या १६व्या शतकात, थायलंड-कंबोडिया या देशातून रामायण इथे पोहोचले. त्याला स्थानिक जनविश्वास, लोकपरंपरा आणि अभिरूची यांची जोड देऊन, रामकथेचा एक नवाच अविष्कार लाओसच्या रामायणात दिसतो. इथल्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही जीवनशैलींवर, रामायणाने सारखेच गारूड केलेले दिसते. इथल्या ‘वाट’ (ुरीं म्हणजे स्थानिक भाषेत मंदिर) आणि विहारांच्या भिंतींवर, रामकथेचे चित्रण केले आहे. ‘दि सेंट्रल हॉल ऑफ वाट ओपमाँग’ इथे, आपल्याकडील अजिंठा-वेरूळप्रमाणे रामायणातील प्रसंग चितारणारी जवळजवळ ३० भित्तिचित्रे आहेत. लाओशिअन नववर्षाचा स्वागतसमारंभ, रामगीतांशिवाय पूर्णच होत नाही. इथल्या ‘खेन’ आणि ‘लखेन’ नृत्यप्रकारात, ‘रामायण बॅले’ सादर होतात आणि शॅडो प्ले, लाकडी कोरीव काम, शिल्पकला आणि लाखेच्या कलावस्तूंनाही रामकथेने अक्षुण्ण विषय पुरवले आहेत.
 
लाओस रामायणाचे नाव आहे. ‘फ्रालाक् फ्रालाम’. ‘लाम’ म्हणजे राम आणि ‘लाक्’ म्हणजे लक्ष्मण! ‘प्रिय लक्ष्मण आणि प्रिय राम’ असा अर्थ असलेले हे रामायण म्हणजे, राम आणि लक्ष्मण या दोन भावांच्या बंधुप्रेमाची कथा आहे. (भरत नाही हं!) लाओसवासीयांच्या अभिरूचीप्रमाणे म्हणा किंवा तिथे रामायणाची जी धारा पोहोचली, त्याप्रमाणे त्यांनी त्यात बदल केले आहेत. प्रत्यक्ष भारतातसुद्धा आपल्याला रामायणात कितीतरी बदल किंवा भेद दिसतात. ‘फ्रालाक् फ्रालाम’ या लाओशियन रामायणाला, त्यांच्या महाकाव्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
 
इथे बौद्ध धर्माला राजमान्यता असून, इथले ६६ टक्के लोक बौद्धधर्मीय आहेत. या बौद्ध प्रभावामुळेच या काव्याचे नाते ते बौद्ध परंपरेतील ‘दशरथ जातका’शी जोडतात. त्यांचा राम पूर्वजन्मातील बोधिसत्व आहे. त्यामुळे हे काव्य ‘पत्रलामसदोक’ म्हणजे, ‘रामजातक’ या नावानेही ओळखले जाते. त्यांच्या कथेत इंद्र, ब्रह्म आणि शिवही येतात आणि रावण हा बौद्ध परंपरेतील मोहाचे, ऐहिक कामोपभोगांचे प्रतीक असलेला ‘मार’ होय. त्यांचा नायक राम त्यांना नैतिक तत्त्वांचा उपदेश करतो आणि धर्मपालनास प्रेरित करतो. ‘दशरथ जातका’प्रमाणे राम, लक्ष्मण आणि सीता ही दशरथाची अपत्ये असून, शेवटी राम आणि सीता या बहीण-भावांचा विवाह होतो, असे सांगितले आहे.
 
लाओस देशाच्या लिखित परंपरेत ‘कुय् तोराफी’ (र्घीरू ढेीरहिळ) हे रामायणाचे संक्षिप्त, पण अतिशय प्रसिद्ध असे संस्करण असून, संपूर्ण रामकथा ही त्यांच्या मेकाँग (माँ गंगा) नदीच्या तीरावर घडली आहे, अशी त्यांची भावना आहे. रामायणाची इतर संस्करणे, ताडपत्रावरील हस्तालिखित स्वरुपात त्यांनी जतन करून ठेवली आहेत. त्यांच्या रामायणावर ख्मेर आणि थाई रामकिर्ती-उच्चारी ‘रामकियन’ या काव्याचा प्रभाव आहे. रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये त्यांनी बरेच बदल केले आहेत. लाओस रामायणात सीता म्हणजे, इंद्राची पट्टराणी सुजाता हिचा अवतार आहे. तिच्या सौंदर्याने मोहित होऊन, रावणाने तिच्याशी दुराचार केला. तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी, ती त्याच्याच पोटी मुलगी म्हणून जन्मास आली. ज्योतिषांनी रावणाला तिच्यापासून जीवास धोका आहे, असे सांगितल्यावर रावणाने तिला एका पेटीत ठेवून समुद्रात सोडून दिले. ती जम्बुद्वीपावरील कश्यप मुनींना (जनक नव्हे!) मिळाली आणि त्यांनी तिला आपल्या मुलीप्रमाणे वाढविले.
 
इतरही दक्षिण आशियाई रामायणात, सीतेचे पितृत्व रावणाकडे असल्याचे म्हटले आहे. मूळ वाल्मिकी रामायणात, सीता ही भूमिकन्या म्हणजे शेत नांगरताना ती जनक राजाला सापडली, असे सांगितले आहे. तिचे ‘सीता’ हे नाव त्याच अर्थाचे सूचक आहे. म्हणजे मूळ स्रोतातच, तिच्या कुलपरंपरेविषयी काही निश्चित असे सांगितलेले नाही. आपल्याकडेसुद्धा इ. स. पाचव्या शतकातील ‘वासुदेवहिंडी’ या जैन परंपरेतील ग्रंथातही, सीतेचे पितृत्व रावणाकडे दिले आहे. ‘आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे...’ असे सीतास्वयंवराचे स्वर्गीय वर्णन गदिमांनी केले आहे. पण, मूळ वाल्मिकी रामायणात राम-सीतेचा विवाह अत्यंत साधेपणाने वर्णन केला आहे. धनुर्भंग आणि प्रत्यक्ष विवाह यातही काळाचे थोडे अंतर आहे. लाओस रामायणात, सीता कश्यप ऋषींच्या आश्रमात मोठी होते. तिच्या सौंदर्याने मोहित होऊन, शेकडो राजे तिला मागणी घालतात. कश्यप ऋषींकडे एक लहानसे परंतु जड असे धनुष्य असते. ते त्यांचे स्वतःचे असते. त्या धनुष्याचा भंग राम करतो आणि सीतेशी विवाह करतो. या प्रसंगात मात्र लाओस रामायण वाल्मिकी रामायणास प्रमाण मानते.
 
मारिचवधाचा प्रसंग कितीही नाट्यपूर्ण आणि परंपरेत खोल रुजलेला असला, तरी तो मूळ वाल्मिकी रामायणात नाही. लाओस रामायणात प्रत्यक्ष इंद्राने सुवर्णमृगाचे रुप घेतले होते. कारण, सीता म्हणजे त्याची पट्टराणी सुजाता हिचा पुनर्जन्म होता ना! रावणाचा सूड तिला घ्यायचा होता. त्यासाठी राम आणि लक्ष्मणापासून दूर तिने एकटीने असणे आवश्यक होते. म्हणून स्वतः इंद्रानेच सुवर्णमृगाचे रुप घेतले. त्याला मारण्यासाठी राम गेला, परंतु बराच काळ झाला तरी आला नाही. म्हणून लक्ष्मण स्वतःहूनच गेला. जाण्यापूर्वी भूमीला त्याने, सीतेचे रक्षण करण्याची विनंती केली. लक्ष्मण जाताच रावण आला. परंतु, सीतेला उचलण्याचे त्यांचे दोन प्रयत्न व्यर्थ गेले. कारण, तिच्या भूमातेने सीतेला घट्ट धरून ठेवले होते. परंतु, तिकडे वनात जेव्हा रामाने लक्ष्मणाजवळ तिच्या सुरक्षिततेबद्दल आशंका व्यक्त केली, तेव्हा मात्र भूमातेने तिला सोडले. सीता ही केवळ मनानेच नाही, तर शरीरानेही शुद्ध होती, हे दाखवणारे प्रसंग यात घेतलेले आहेत. कदाचित भक्तिपंथाच्या उदयामुळे हे झाले असावे.
 
थाई आणि लाओस रामायणाप्रमाणे, सीतात्यागाचे कारण म्हणून रावणाच्या चित्राचा प्रसंग येतो. शूर्पणखेची मुलगी अतुला ही खोडसाळपणे सीतेची दासी बनते आणि रावणाचे चित्र काढण्यासाठी सीतेला भरीस पाडते. परपुरुषाचे चित्र काढल्याने राम रागवेल की काय? या भीतीने सीता ते शय्येखाली सरकवते. ते चित्र सीतेनेच काढले आहे हे कळताच, तिच्या चारित्र्याविषयी संशय येऊन, तिला अरण्यात नेऊन ठार मारण्याची आज्ञा राम देतो. लक्ष्मण स्वतःच ही जबाबदारी घेतो. पण, गर्भवती सीतेला तो मारू धजावत नाही. तेव्हा मेलेल्या कुत्र्याच्या रक्ताने माखलेली तलवार तो रामास दाखवितो. रावणाच्या चित्राचा प्रसंग भारतातील ‘आनंद रामायण’ आणि इतरही काही संस्करणांत येतो. काही ठिकाणी राम सीतेचा उजवा हात छाटून आणण्यास लक्ष्मणाला सांगतो (कारण, त्या हाताने तिने परपुरुषाचे चित्र काढलेले असते ना!)
 
भारताबाहेरील बहुतेक रामायणांप्रमाणे सीतेला एकच पुत्र झाला आणि दुसरा वाल्मिकींनी आपल्या तपसामर्थ्याने निर्माण केला. वाल्मिकींना तसे का करावे लागले? यात फक्त तपशीलाचा फरक दिसतो. लाओस रामायणाप्रमाणे, सीता एकदा बाळाला आश्रमात सोडून नदीवर स्नानासाठी गेली असता, दोन माकडिणींनी मुलाला आश्रमात सोडून आल्याबद्दल मारलेले टोमणे ऐकले. घाबरून ती परत आश्रमात येते आणि बाळाला घेऊन नदीवर जाते. इकडे ध्यानस्थ असलेल्या ऋषींच्या हे काही लक्षात आले नाही. ध्यान संपल्यावर सीतेचे बाळ हरवले, असे वाटून त्यांनी गवताने बाळाचे चित्र एका शिळेवर काढले आणि त्यात प्राण फुंकले, त्याचेच नाव लव. असा मजेशीर प्रसंग सांगितला आहे. पण, नवलाची गोष्ट अशी आहे की, संस्कृत ‘कथासरित्सागरा’तही काहीशी अशीच गोष्ट वर्णिली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये, रामकथेमध्ये जे विविध प्रसंग येतात, ते वाचून आपली नक्कीच करमणूक होते; पण त्यातल्या बहुसंख्य बदलांची बीजे भारतातल्या कुठल्या ना कुठल्या संस्करणात दडलेली असल्याचेही दिसते. कदाचित रामायणाच्या कथेमध्येच कवींना प्रेरित करण्याचे, नवे नवे अर्थ आणि प्रसंग सूचित करण्याचे सामर्थ्य, सर्जनशीलता फुलविण्याचे कौशल्य आहे, असे मला वाटते.
 
‘वाल्मीकिगिरिसम्भूता’ ही रामायणरुपी नदी, आपल्या प्रवासात विविध वळणे आणि वाकणे घेत ज्या ज्या भूभागांवर पोहोचली, तिथल्या जनांना ती आपली वाटली. कारण, तिच्यातील शाश्वत जीवनमूल्ये, जीवनाभिमुखता आणि कर्तत्यपराणतेची शिकवण! या आपलेपणाच्या भावनेतून म्हणा किंवा योगदानाच्या विचारातून म्हणा, त्या त्या देशाची संस्कृती, आवडीनिवडी, प्रथा-परंपरा, चालीरिती, जनविश्वास आणि मानसिकता या सार्‍यांनाच आपल्या उदरात सामावून घेत, रामकथा नित्य नूतन रुप धारण करती झाली आणि तिथल्या मातीशी एकरुपही झाली. या प्रक्रियेत भारतात आणि भारताबाहेरही, रामायणात असंख्य बदल झाले. कधी भ्रष्ट पाठ आले, तर कधी पुष्कळसे प्रक्षेप झाले. ज्या भागात रामायणाची जी धारा पोहोचली, ती तिथे अधिकाधिक पुष्ट झाली. भिन्नभिन्न रुचि, भाषा आणि संस्कृती असणार्‍या प्रचंड जनसमूहाला प्रेरित करण्याचे आणि त्याला आपल्यात सामावून घेण्याचे रामायणाचे सामर्थ्य, खरे तर अद्भुतच म्हणावे लागेल. इतर कोणत्याही ग्रंथाचा असा करिष्मा, क्वचितच कुठे दिसून आला असेल. हे केवढे प्रचंड साहित्यिक अभिसरण (transtextualism) आहे, हे भारताबाहेरील रामायण पाहिल्यावर समजते.
 
खरोखर वाल्मिकींचे रामायण हे सार्‍या मानवतेचे संचित आहे. श्रीराम फक्त भारतीयांचा नाही, तो ‘मि. युनिव्हर्स’ आहे. रामकथा ही मिथक नाही. रामायण होऊन गेलेले नाही, तर ते आहेच! ते काल होते, आज आहे आणि उद्याही असणार आहे. रामायण म्हणजे, एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळून राहिलेली रचना नाही, ती स्थलदिक्काल निरपेक्ष आहे. कवितारुपी शाखेवर आरुढ होऊन, मधुमधुर रामाक्षरांच्या कूजनाने या वाल्मिकी कवी-कोकिळाने सार्‍या सीमा पार करून, मानवी मनाला निर्विकल्प समाधीचा आनंद दिला आहे. रामकथेच्या या विश्वव्यापक प्रसाराचे श्रेय निःसंशय वाल्मिकींनाच दिले पाहिजे.
 
यावत्स्थास्थन्ति गिरयः सरितश्च महीतले।
तावद्रामायणकथा लोकेषु प्रचलिष्यति॥
 
“जोपर्यंत पर्वत आणि नद्या आहेत, तोपर्यंत रामायण जगात अमर राहील,” हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने वाल्मिकींना दिलेले वरदान फोल कसे ठरेल!
 
 
डॉ. परिणीता देशपांडे
 
९८१९५ ३६३९५
 
(लेखिका क्रिटिकल स्टडी ऑफ रिच्युअल लीजेण्डस फ्रॉम दी ब्राह्मण टेक्स्ट्स या वेदांसंबंदित विषयावर पी.एचडी धारक असून, मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्कृत विभागात निमंत्रणावरून अध्यापनही करतात.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121