बौद्ध धर्माची छाप असलेले म्यानमारमधील रामायण

    05-Apr-2025
Total Views |

article on myanmar s buddhism influenced  ramayana  
 
भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक, व्यापारी अशा विविध प्रकारे भारताशी जोडला गेलेला देश म्हणजे म्यानमार उर्फ ब्रह्मदेश. अशा ब्रह्मदेशात रामकथेचे अयन झाले नसते, तरच नवल! तेव्हा, म्यानमारच्या जनमनामध्ये रुजलेल्या रामकथेविषयी...
 
 
सर्वसामान्य मान्यतेनुसार साधारणपणे १७७५ मध्ये रामकथा ‘यमथग्यीन’ या नावाने, आवा साम्राज्यात परिचित झाली. पण, उत्खननशास्त्राच्या पुराव्यांवरून, मौखिक परंपरेने वाल्मिकी रामायण ११व्या शतकापासून किंवा त्याच्याही पूर्वीपासून म्यानमारमध्ये परिचित होते. इ. स. १०४४ ते इ. स. १०७७ या कालावधीत अनवरठा राजाचे राज्य होते. त्याने बांधलेल्या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर, परशुराम आणि रामाच्या मूर्ती विष्णुचा अवतार म्हणून दिसून येतात. १३व्या शतकात पगान राज्याच्या पतनानंतर, मौखिक परंपरेने रामकथा आवामध्ये टिकून होती. साधारण सन १५२७ मध्ये बौद्ध भिक्खु आणि कवी शिन अग्गा थमाडी याने आपल्या शिष्यांना, सीता आणि हनुमानाची कथा लोकांना सांगायला बंदी केली असल्याच्या संदर्भावरून, मौखिक परंपरेमध्ये रामकथा टिकून होती, या विचाराला पुष्टी मिळते. एकीकडे हा थोडा विरोध असला, तरी काही उदाहरणांतून निश्चितच रामायण हा कौतुकाचा, आदराचा विषय होता हे दिसून येते.
 
१८व्या शतकाच्या प्रारंभी टांगू वंशाच्या राजवटीत, दोन साहित्यिक संदर्भांतून रामायणाकडे अत्यंत महनीय साहित्य म्हणून बघितले जात असल्याचे दिसून येते. पहिल्या संदर्भात दुष्ट रावणाचा पक्ष सोडून आलेल्या विभीषणाचे, एक चांगला मित्र म्हणून स्वागत करण्यात रामाच्या चातुर्याचे कौतुक ‘मिनक्यांग’ बौद्ध मठाचे मठाधिपती मिंनक्यांग सियाङ्वांनी केले होते. दुसरा संदर्भ आहे आवाचे मंत्री पडेथा याझा यांचा. त्यांच्या ‘मनिखेत’ नाटकात, अपत्यप्राप्तीसाठी दशरथाने केलेल्या यशस्वी प्रार्थनेचा उल्लेख येतो. या उल्लेखांवरून रामजन्माआधी म्हणजे बालकांडापासून ते युद्धकांडापर्यंत, संपूर्ण रामायण म्यानमारमधील लोकांना ज्ञात होते आणि ते त्यातील मूल्यांसाठी ज्ञात होते, असे लक्षात येते. सन १८०० ते सन १९०० या कालावधीत, रामायणाच्या विविध रचना तिथे निर्माण झाल्या.
 
 
रामायणाच्या विविध रचना
 
सन १७७५ मध्ये यू आंग फ्यो नावाचे शाहीर त्यांच्या कवनांतून ‘यमथग्यीन’ गात असत. पुढे १७८९ मध्ये त्यांची सांगीतिक रामायण नाटकाची संहिता तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रामायणाचा आरंभ रावणाच्या दुष्ट, हिंसक वागण्याने आणि अंत त्याच्या मृत्यूने होतो. बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव असल्याने, त्यांच्या रामायणात अन्य काही बदलांबरोबरच एक महत्त्वाचा बदलही दिसून येतो. तो म्हणजे, दशरथाच्या बाणाने श्रावणबाळाचा मृत्यू झाल्यावर दशरथ त्याच्या अंध मातापित्यांना भेटतो. ते त्याला त्रिशूल ऋषींच्या आश्रमाची वाट दाखवतात. दशरथ त्यांच्या आश्रमात जातो. ऋषी त्याला दोन केळी देतात. तो आपल्या तीनही पत्नींना ती केळी खायला देतो. दहाव्या महिन्यात कोथला (कौसल्या) बोधिसत्त्व रामाला जन्म देते, कैकी भरत आणि लख्खनला आणि थुमित्रा सत्रुघ्नाला. म्यानमारी रामायणात पुत्रकामेष्टी यज्ञावर काट मारलेली आहे. कदाचित गौतम बुद्धांचा यज्ञसंस्थेला असलेला विरोध, हे त्यामागचे कारण असू शकते. तसेच, आपल्याकडे ज्याप्रमाणे बुद्ध म्हणजे विष्णूचा एक अवतार आहे; तर बौद्धधर्मीय म्यानमारमध्ये राम हा बुद्ध बनून येतो.
 
महा लौका मराझीन किंवा महा पगोडा येथे, रामायणाच्या ३४७ ‘प्लेट्स’ आहेत, पण त्या ‘दशरथ जातका’चा भाग म्हणून येतात. दुर्दैवाने, सध्या हा भाग अतिसंवेदनशील घोषित केल्यामुळे, या ठिकाणाला भेटीची बंदी आहे. राजकोशाचा प्रशासक असलेल्या यू टो यांनी १७८४ मध्ये रचलेले ‘यमयगान’ हे काव्य अपूर्ण आहे. ‘ग्यम’ या ‘अयुथिया’ अर्थात आजच्या थायलंड राज्याच्या राजधानीतून आणि युआन या हरिपुंजा या राज्याच्या राजधानीतून आलेल्या रामायणाचे, बर्मी भाषेत भाषांतर करण्यासाठी १७८९ मध्ये एका राजआयोगाची स्थापना करण्यात आली. भाषांतरानंतर रंगमंचीय प्रत सुयोग्य गीतांसह तयार करण्याची जबाबदारीही या आयोगावर देण्यात आली. आयोगात अभिषिक्त युवराजासह, इतर आठ विद्वानांचा समावेश होता. या आठ विद्वानांतील एक यू टो हे होते.
 
सन १८०० मध्ये तामिळ रामायण ’कलाई राम’ याचे भाषांतर, मैदाई प्रांताच्या राज्यपालांनी केले. गद्य रामायण ‘महायाम’ची रचना एका अज्ञात कवीने केली. १९व्या शतकात नाटक च्यो गाँग यांनी ‘थिरियाम’ची रचना केली. असा अंदाज आहे की, या रंगमंचीय काव्याची रचना राजआयोगाच्या संहितेवर बेतलेली असण्याची शक्यता आहे. ‘थिरियाम’च्या शेवटच्या दोन कांडांवर ‘कृत्तिवास रामायणा’चा प्रभाव आहे. १८८० मध्ये यू चू लिखित ‘पोन्टॉयाम यंगून’मध्ये छापून प्रकाशित करण्यात आले. सयॉ हितवे यांनी ‘यमथोनम्यो’ची रचना केली. यू मांग ची यांनी यंगून आणि अक्याब येथे ‘पोन्टॉयाम’ आणि ‘लख्खन’ प्रकाशित केले. १९१० पर्यंत प्रकाशित झालेल्या रामायणांपैकी, तामिळ रामायणावरून तयार केलेली प्रत आणि आयोगाची प्रत सोडल्यास, सगळ्या रामायणांत यू आँग फ्यो यांच्या ‘राम थग्यीन’शी साधर्म्य आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
 
एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, म्यानमारचा शेवटचा राजा थिबा, ज्याला ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले होते, त्याच्या राजसभेत रामायण सादर करणारे ९१ कलाकार होते. पूर्वी राजसभेत ४५ ते ६५ दिवस, रामायण सादर केले जात असे. आता ते नऊ रात्रींपुरते मर्यादित झाले आहे. जोपर्यंत राजाश्रय होता, तोपर्यंत रामायणाचे सादरीकरण मोठ्या प्रमाणात होत असे; पण राजाश्रय गेल्यावर आता लोकाश्रयावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, रामायण सादरीकरण खूप खर्चिक असल्याने, दिवसेंदिवस रामायण मंडळांची संख्या रोडावत चालली आहे. १९६८ ते १९७२ या कालावधीत, ’ऑल बर्मा हिंदू नॅशनल सेंट्रल काऊन्सिल’ने वाल्मिकी रामायणाची सहा कांडे बर्मी भाषेत भाषांतरित आणि प्रकाशित केली. भाषांतराचे हे काम बनारस येथे राहणारे म्यानमारचे बौद्ध भिक्खु शिन कैटिमा यांनी केले आहे. प्रत्येक कांडाचे प्रकाशन वेगवेगळ्या वेळी झाल्याने, त्यांच्या तारखाही वेगवेगळ्या आहेत. बालकांड - मार्च १९६८, अयोध्याकांड - एप्रिल १९६८, अरण्यकांड - १९६८, किष्किंधाकांड - जानेवारी १९७०, सुंदरकांड - मे १९७१ आणि युद्धकांड - मे १९७२ मध्ये प्रकाशित झाले.
 
सध्या मात्र सादरीकरण या एकाच माध्यमातून रामायण टिकून आहे. सादरीकरणाची फार थोडी मंडळे आता शिल्लक आहेत. उदा. क्येमुइंडाइंग यम, बटाहटुंग यम, ये चो यम. यांतील ‘ये चो यम’ हे १४० वर्षे जुनी परंपरा असलेले मंडळ, आयेयावाडी प्रांतात फ्यफोन या गावी आहे. त्यांच्या मते, राजसभेतील रामायण सादरीकरणाची परंपरा त्यांच्याकडे आली. येथील रामायण परंपरा ‘यमझट’ या नावाने ओळखली जाते. या कलाकारांच्या मते, म्यानमारमधील इतर परंपरांपेक्षा ‘यमझट’ पूर्णपणे वेगळे आहे. ही संहिता म्यानमार ऊर्फ बर्मी भाषेत असल्याने, त्यातील वेगळेपण इतर भाषिकांना समजणे सध्यातरी कठीण आहे. (माझ्या म्यानमारमधील कार्यकालात या मंडळाला भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या रामायणाच्या पोथीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यचे भाग्य मला लाभले. पुढील माहिती त्या कलाकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे.) १८७८ पासून हे मंडळ रामायण सादर करते. फ्यफोनमधील श्वे नलकु पगोडा येथे हे सादरीकरण केले जाते. रामायणाचे सादरीकरण रात्रभर होते.
 
सध्या रामायणाचे सादरीकरण ‘थडींग्यूट’ सणाच्या दिवशी, म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात केले जाते. ‘थडींग्यूट’ म्हणजे, आपल्याकडील दिवाळीचा सण. या सणाला आपल्यासारखेच सगळीकडे दिवे लावले जातात. एकदा एखादी भूमिका केली की, त्या कलाकाराला कायम तीच व्यक्तिरेखा सादर करावी लागते. उ मिंट ओह हे ७५ वर्षांचे आहेत आणि गेली ५३ वर्षे रामाची भूमिका करत आहेत, तर उ झॉ ऊ हे ५५ वर्षांचे आहेत आणि २००२ पासून रावणाची भूमिका करत आहेत. जी व्यक्तिरेखा कलाकार सादर करणार असेल, त्या व्यक्तिरेखेची पूजा त्या कलाकाराने वर्षभर करावी लागते. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी किमान तीन ते चार कलाकार तयार ठेवले जातात. सार्‍या व्यक्तिरेखांमध्ये राम हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक सादरीकरणाची सुरुवात आणि शेवट, मंचावर रामाच्या असण्याने होतो. यावरून रामाविषयीचा आदर सहज जाणवतो.
 
म्यानमारमध्ये मांसाहार हा प्रमुख आहे; पण रामायण सादरीकरणाच्या वेळी, कलाकार मांसाहार सोडून देतात. राम आणि रावण ही दोन वेगवेगळी कुळं आहेत आणि त्यांच्यात वैर आहे, म्हणून त्यांचे मुखवटेसुद्धा वेगवेगळ्या कपाटात ठेवले जातात. म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, बुढा म्हणजे वाल्मिकी, हनुमान इत्यादींचे मुखवटे एकत्र आणि रावण, मंदोदरी, कुंभकर्ण, राक्षस यांचे मुखवटे एकत्र ठेवले जातात. सादरीकरणाव्यतिरिक्त ते उगाच बाहेर काढले जात नाहीत. बाहेर काढताना आधी त्यांना वंदन केले जाते आणि मगच ते धारण केले जातात. मुखवटे ठेवतानासुद्धा काळजी घेतली जाते. ते अजिबात कलंडणार नाहीत, अशा प्रकारे ठेवले जातात. मुखवट्यांशिवाय मुकुट हे सादरीकरणात अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते मस्तकावर धारण केले जातात आणि मस्तक म्हणजे, उत्तमांग त्यामुळे मुकुटाचा मान विशेष असतो. ते ठेवायला वेगळी खोली असते. त्याला ‘बाउंग डो सा’ असे म्हणतात.
 
article on myanmar s buddhism influenced ramayana
 
 
रामायणाच्या सादरीकरणासाठी एका कुळाला साधारणपणे ३० मुखवटे लागतात. यातील राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, वाली, रावण अशा प्रमुख पात्रांचे मुखवटे आणि किरिट एकसंध बनवलेले असतात. मुखवटे अतिशय जड असल्याने, कलाकाराची ते धारण करण्याची क्षमता बघितली जाते. सीता मुखवटा धारण करत नाही, ती केवळ मुकुट घालते, तो एकसंध असतो. सीता दिसायला सुंदर आणि लांब केस असलेली निवडली जाते. सीतेचा राजसभेतील मुकुट आणि इतर ठिकाणचे मुकुट वेगवेगळे असतात. ती साधारणपणे चार ते पाच मुकुट धारण करते. सीता कधीच पादत्राणे घालत नाही. मंदोदरी ही अत्यंत सन्मान्य असली, तरी तिला राक्षसीचा वेश घालावा लागतो.रावणाचा मुकुट तीन स्तरांतला असतो. कलाकाराचे एक मुख आणि इतर नऊ मुखे त्या मुकुटात योजलेली असतात. रामायणातील पात्रांचे म्यानमारीकरण होऊन, त्यांच्या नावांचे उच्चार थोडे वेगळे होतात, उदा. कुंभकर्ण - गुंभीकन्न, लक्ष्मण - लख्खन, इंद्रजित - इंद्रचित, दशग्रीव - दत्तगिरि, त्रिजटा - त्रिकुंभी, सुग्रीव - तुक्रिट, अंगद - अंगक, सीता - तिडा, कुश - कुथ, लव - बल, कौसल्या - कोथिला, कुंभकर्ण - कोंबिकन्न आणि स्वतः राम हा यम होऊन जातो!
 
धार्मिक आणि सामाजिक स्थान
 
‘यमथग्यीन’, ‘थिरीयम’ आणि ‘महायम’ या सर्व रामायणांत, विष्णुचा अवतार असलेल्या रामाचे बुद्ध रामात परिवर्तन झाले आहे. रामायणाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले नसले, तरी एकूणच रामायणातील नातेसंबंध, उच्च कल्पना, ध्येयवाद या सर्वांचा बर्मी जीवनावर खोलवर परिणाम झालेला आहे. रामायणाकडे समाजाचा आदर्श म्हणून पाहिले जाते. साहित्य, रंगमंचीय सादरीकरण याव्यतिरिक्त तिथल्या चित्रकला, काष्ठशिल्पकला यांसारख्या कलांमधून रामायण प्रतिबिंबित होत असते.

- डॉ. आसावरी बापट
 
(लेखिका माजी प्रथम सचिव, अध्यक्ष (स्वामी विवेकानंद सांस्कृतिक) भारतीय राजदूतावास, रंगून, म्यानमार आणि माजी प्रथम सचिव, अध्यक्ष (स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र),भारतीय राजदूतावास, काठमांडू, नेपाळ आहेत.)
 
९८३३६७६३३१
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121