आग्नेय आशियाई देशांपैकी रामायणाच्या सर्वाधिक पाऊलखुणा आजही कुठे दृष्टिपथास पडत असतील, तर तो देश म्हणजे थायलंड. तेथील राजांच्या नावापासून ते अगदी मंदिरे, शिल्पकला आणि एकूणच समाजजीवनात रामकथेचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथच ‘रामाकियन रामायण.’ असे हे थायलंडचे रामायणाशी असलेले ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
प्राचीन काळी भारतीय संस्कृतीचा प्रसार भारताबाहेर मोठ्या प्रमाणात झाला. प्रामुख्याने दक्षिण भारतातून सागरी मार्गाने भारतीय विदेशात ये-जा करत होते. त्यांच्यासह तसेच बौद्ध भिक्षुकांमार्फत भारतीय संस्कृती भारताबाहेर ठिकठिकाणी पोहोचली. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब रामायणात दिसत असल्याने, अनेक शतकांपूर्वी साहजिकच रामायणही तिथे पोहोचले. थायलंडमध्ये सातव्या शतकातील एक शिलालेख आहे, ज्यात राम-लक्ष्मणाची नावे आहेत. जगण्याचा आदर्श असलेल्या श्रीरामाची कथा सांगणार्या ‘रामायण’ या महाकाव्याची लोकांना एवढी गोडी लागली की, रामाविषयीच्या लोकश्रद्धेने देश, काळ, भाषा अशी सर्व बंधने तोडली.
रामायणाचा प्रभाव भारताबाहेर म्यानमार, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलीपाईन्स, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम आणि चीनसह अनेक आशियाई देशांमध्ये पसरला आहे. आजही रामायण अनेक आग्नेय आशियाई देशांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जरी येथील प्रमुख पंथ बौद्ध (थायलंड, कंबोडिया, लाओस); इस्लाम (मलेशिया, इंडोनेशिया) असले तरीही. आजही तेथे ‘राम’ हे अतिशय लोकप्रिय नाव आहे. पश्चिम आशिया, इटली, होंडुरास, दक्षिण अमेरिका येथेही रामायणाच्या खुणा आढळतात.
भारताबाहेरील रामकथा
जगाच्या विविध भागांत ३००हून अधिक रामकथा प्रचलित आहेत. याव्यतिरिक्त रामकथेशी संबंधित दोन ते तीन हजार लोककथाही आहेत. भारताव्यतिरिक्त असे आणखी नऊ देश आहेत, जिथे रामकथा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ऐकली आणि गायली जाते.
कंबोडिया - रामकरे ति
फिलीपाईन्स - महाराजा लावण
लाओस - फलक् फलाम
इंडोनेशिया - रामककविन
म्यानमार - रामवत्थु, रामथग्यन्
मलेशिया - हिकायत सेरी राम
थायलंड - रामाकियन
रामाकियन
थायलंड हा जगामध्ये एकमेव असा देश आहे की, ज्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ ‘रामाकियन रामायण’ आहे. ते थायलंडचे ‘राष्ट्रीय महाकाव्य’सुद्धा आहे. लोककलेच्या माध्यमातून राम आणि रामायण अनेक शतकांपासून थाई लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. रामायणाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १८व्या शतकात थाई राजा रामा-१ यांनी विद्वानांच्या साहाय्याने स्थानिक रामायण संकलित केले. ते ‘रामाकियन’ रामाचा महिमा, रामाची कीर्ती नावाने सुप्रसिद्ध आहे. ९०-९४ टक्के लोक थेरवादी बौद्ध पंथावलंबी असलेल्या थायलंडमध्ये, रामाकियन थाई संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. हा अंतर्विरोध नाही. पंथ उपासना पद्धती व संस्कृती या भिन्न गोष्टी आहेत.
आदौ राम तपोवनादि गमनं
हत्वा मृगं काञ्चनम्।
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम्॥
वालीनिर्दालनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्।
पश्चात् रावणकुम्भकर्ण हननम्
एतद्धि रामायणम्॥
ही एकश्लोकी वाल्मिकी रामायणाची मुख्य कथा ‘रामाकियन’चा आधार आहे. परंतु, वाल्मिकी रामायणापेक्षा थाई रामायणाचे कथानक काहीसे वेगळे आहे. स्थानिक संस्कृती, स्थानिक श्रद्धा, स्थानिक दंतकथा, बौद्ध पंथ यांनुसार मूळ रामायणातील अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन करून, थाई संदर्भ लिहिलेले आहेत. यात थायलंडच्या काही प्राचीन कथा आहेत. ‘रामाकियना’त प्रमुख पात्रे तीच असून, काही नावे थाई आहेत. फ्रा - श्रीराम, थोत्सकन - दशकंठ रावण, लक - लक्ष्मण, कायकेसी - कैकेयी, फाली - वाली, सुक्रीब - सुग्रीव, ओंकोट - अंगद, खोंपून - जाम्बवान्, बिपेक - विभीषण, फिराब - विराध, समणखा - शूर्पणखा, मोंथो - मंदोदरी; मैयारब - महिरावण इत्यादी. हनुमान ब्रह्मचारी नाही; कामतुष्टीची मर्यादा जाणणारा हनुमान आहे. सीतेच्या वनवासाची कथाही वाल्मिकी रामायणापेक्षा खूप वेगळी आहे. ‘रामाकियन’नुसार रावणाच्या पराभवाने दुःखी झालेल्या एका राक्षसाने सीतेला फसवून रावणाचे चित्र काढायला लावले आणि ते रामाच्या पलंगाखाली ठेवले. यामुळे रामाला असे वाटते की, सीतेला रावणाची आठवण येते.
रामाकियन आधारित लोककथा
‘रामाकियन’वर आधारित अनेक लोककथा आहेत. उदाहरणार्थ-
- एका गावच्या डोंगराला भले मोठे भोक आहे. त्या गावाला वाटते की, रावण सीतेला रथातून घेऊन जाताना रथाचे चाक डोंगराला लागले.
- लोपबुरीमधील पांढरी माती लोक टाल्कम पावडर बनवण्यासाठी वापरतात. पांढर्या मातीची एक कथा प्रचलित आहे. युद्ध संपल्यानंतर राम आयुथ्याला परतला. हनुमानाला पारितोषिक देण्यासाठी रामाने बाण सोडला आणि हनुमानाला त्याच्या मागे जाण्यास सांगितले. ज्या ठिकाणी बाण पडेल, त्या भूभागावर हनुमानाचा राज्यकारभार असेल. बाण लोपबुरीवर पडला, जिथे बाणाच्या उष्णतेमुळे जमीन पांढरी झाली.
- दोन गावांमध्ये गुहा आहेत, तेथील माती लाल आहे. त्या गावांना वाटते की, वालीने दुंदुभीला तिथेच मारले.
- थायलंडमध्ये बुद्धांविषयी अतिशय श्रद्धा असल्याने, गौतम बुद्ध पूर्वजन्मी राम होते, अशी जातककथाही तेथे आहेत. या प्रादेशिक लोककथांमुळे थाई प्रादेशिक संस्कृती समजून घेण्यास मदत होते.
थाई राजपद
राजा कसा असावा? त्याचे राज्य कसे असावे? प्रजाहितदक्ष म्हणजे नेमके काय? आणि प्रजेचेही वर्तन कसे असावे? हे सारे रामायणातून समजते. या कारणांमुळेच थाई राजघराण्याने हिंदू वैदिक शास्त्रांवर आधारित चालीरिती स्वीकारल्या आणि रामायणात वर्णन केल्याप्रमाणे, रामाने अनुसरलेल्या धार्मिक-राजकीय विचारसरणीचाही स्वीकार केला.
थायलंडची प्रजा राजाला विष्णूचा अवतार मानते, तसे जुने शिलालेखही उपलब्ध आहेत. म्हणूनच प्राचीन परंपरेनुसार राजाला ‘राम’ म्हणतात. १३५०-१७६७ पर्यंत थाई राजांना ’रामाधिपती’ म्हणले जात असे. १७८२ मध्ये तेव्हाच्या सेनापतीला ‘राजा’ घोषित करण्यात आले. त्याने आधीच्या राजांप्रमाणे ‘रामाधिपती’ नाव स्वीकारले. चक्री राजवंशातील हा पहिला राजा राम-१. त्यानंतरच्या सर्व राजांना ‘राम’ म्हणतात. ‘राम-१’, ‘राम-२’, ‘राम-३’ इत्यादी. ७३ वर्षीय वज्रालंकरण हे २०१६ पासून थायलंडचे राजा आहेत. चक्री राजवंशातील दहावे सम्राट आहेत. त्यांना ‘राम-१०’ म्हणतात. थायलंडचा औपचारिक असा राज्यपंथ नाही. परंतु, थाई संविधानानुसार राजा बौद्धपंथीय असणे आवश्यक असते आणि असे घोषित केले आहे की, राजा हा धर्मरक्षक आहे. अशा रितीने एक प्रकारे थायलंडमध्ये रामराज्य आहे!
अयुथ्या
- थाई भाषेत ‘थाई’ म्हणजे स्वतंत्र. १९४९ पर्यंत थायलंडचे अधिकृत व प्राचीन नाव ‘सियाम’ (श्याम) होते. १४व्या शतकापासून १८व्या शतकादरम्यान, तेव्हाच्या विशाल समृद्ध सियाम साम्राज्याची राजधानी होती अयुथ्या; ‘अयोध्या’चा अपभ्रंश. बँकॉकहून ७० किमी उत्तरेस वसलेल्या अयुथ्याची स्थापना १३५० मध्ये राजा रामातीबोधी-१ याने केली होती. अयुथ्या शहराचे आधीचे नाव ‘द्वारावती’ होते.
- अयुथ्या जगातील राजकारण आणि व्यापाराचे केंद्रही होते. ‘युनेस्को’नुसार अयुथ्याच्या राजदरबारात अनेक देशांचे दूत होते. त्यात मुघल दरबार, जपान आणि चिनी साम्राज्यांच्या दूतांपासून, फ्रान्सच्या दूतांचाही समावेश होता.
- १७६७ मध्ये बर्मानं या वैभवशाली शहरावर भीषण हल्ला करून ते शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. अयुथ्याच्या पतनानंतर नवीन राजा राम-१ने, बँकॉकचे पूर्वीचे नाव रत्नकोशिंद्रमध्ये आपली राजधानी स्थापन केली.
- हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रभाव
- थायलंडच्या समाजावर शतकानुशतके हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा, हिंदू प्रतीकांचा खोलवर प्रभाव राहिला आहे.
- बँकॉकच्या विमानतळाचे नाव आहे सुवर्णभूमी. विमानतळावर समुद्रमंथनाचे भले मोठे शिल्प आहे.
- विष्णुचे वाहन गरुड हे थायलंडचे राष्ट्रीय चिन्ह आहे.
- विष्णूचे सर्व अवतार थाई लोकही मानतात.
- थायलंडमध्ये भारतीय शिल्पकला व मंदिरे आढळतात.
- लॉय क्राथोंग देव-दिवाळी कार्तिक पौर्णिमेस दीपोत्सवरूपात मोठ्या प्रमाणात साजरी होते. प्रमुख स्थानी शिव, पार्वती, गणेश आणि इंद्र यांच्या मूर्तींची स्थापना होते.
- अनेक उपहारगृहांच्या स्वागतकक्षात गणेशमूर्ती असते. प्रतिदिनी त्याची प्रातःपूजाही होते.
- थाई भाषेतील ५० टक्क्यांहून अधिक शब्द संस्कृत व पाली भाषेतील आहेत. ते काढले, तर थाई लोकांना एकमेकांशी संवाद करणे असंभव होईल!
‘रामाकियन’चा थाई संस्कृतीवर प्रभाव
थायलंडच्या राष्ट्रीय जीवनात रामायणाला विशेष स्थान आहे. थायलंडमध्ये रामायण प्रचंड लोकप्रिय आहे. ते थाई संस्कृतीचे एक दृढ घटकच झाले आहे. थाई चालीरिती, परंपरा, तत्त्वज्ञान, श्रद्धा आणि सर्व प्रकारचे ज्ञान ‘रामाकियन’मध्ये इतके गुंफलेले आहे की, ते केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे, तर इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रातही महत्त्वाचे बनले आहे.
रामानंद सागरांची ‘रामायण’ मालिका प्रथम प्रक्षेपित होईपर्यंत अनेक थाई लोकांचा समज होता की, रामायण थायलंडमध्येच घडले!
रामायणातील कथाप्रसंग थायलंडमधील नाट्य आणि लोकनाट्याचे विशेष विषय असतात. बँकॉकमधील सर्वांत मोठ्या आणि भव्य सभागृहाचे नाव ’रामायण सभागृह’ आहे. ते दिल्लीतील विज्ञान भवनाच्या दुप्पट आकाराचे असेल. तेथे प्रतिदिन ‘रामाकियन’वर आधारित खॉन नृत्य-नाटके आणि हुन कठपुतळी कार्यक्रम होतात. ते प्रतिदिन सरासरी दोन हजार अभ्यागतांना आकर्षित करतात. या कार्यक्रमांच्या वेळी सभागृहातील वातावरण पूर्णपणे राममय होऊन जाते. पाश्चात्य शिक्षण पद्धतीचे लौकिक शिक्षण घेत असतानाही, शाळा- महाविद्यालयातून ‘रामाकियन’च्या माध्यमातून नैतिक कर्तव्य, शौर्य, कृतज्ञता, क्षणभंगुरतेचे बौद्ध तत्त्वज्ञान, कार्य-कारणाचे बौद्ध नियम, युद्ध रणनीती, शिस्त आणि राष्ट्रासाठी आवश्यक असलेले इतर अनेक गुण यांचे शिक्षण दिले जाते. काही महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात, रामायण हा अनिवार्य अभ्यासक्रम आहे. ‘रामायणातील नेतृत्वगुण’ हा काही महाविद्यालयात ‘एम.ए.’च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमचा विषय आहे.
पोस्टल स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प, बसतिकीट यांवर रामायणातील चित्र असते. अनेकजण आपल्या हातावर हनुमानाचा टॅटू गोंदवतात. रामायणावर आधारित ब्लॉकबस्टर चित्रपटही निघाले होते. सुप्रसिद्ध थाई बॉक्सिंगची मूळ प्रेरणा वाली-सुग्रीव मुष्टियुद्धात आहे. थायलंडमध्ये २ हजार, ६०० अशी ठिकाणे पूल, रस्ता, मंदिर आहेत, ज्यांना रामाचे नाव आहे. थायलंडचे चित्रकूट म्हणजे तेथील शहर लोपबुरी. वनौषधी असलेली टेकडी हातात घेतलेल्या हनुमानाचे भव्य शिल्प तेथील पर्वतावर आहे. हनुमानाच्या खांद्यावर बसून राम युद्ध करत असलेले शिल्पही तेथे आहे. हनुमान सीतेला रामाची अंंगठी देणारे शिल्प आहे. मंदिरे, बुद्ध विहार, राजवाड्यामधील भित्तिचित्रे ‘रामाकियन’वर आधारित असतात. मोठमोठी उपहारगृहे, बँका यांसारख्या आधुनिक इमारतींमध्येही गॅलरीत ‘रामाकियन’ची चित्रे आढळतात.
बँकॉकमध्ये ‘वट फ्रा काएव’ नावाचे मंदिर आहे. ते ‘एमराल्ड बुद्ध मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. थायलंडमधील हे सर्वांत प्रसिद्ध मंदिर थायलंडसाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे. ग्रँड पॅलेस परिसरात असलेल्या या मंदिराभोवती सुमारे दोन किमी लांबीची भिंत आहे. त्यावर ‘रामाकियन’मधील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण असलेली १७८ भित्तिचित्रे आहेत. अविश्वसनीय कलाकृती असलेल्या या चित्रांमध्ये ‘रामाकियन’ची कथा संपूर्णपणे दाखवण्यात आलेली आहे. राम, सीता, हनुमान, रावण दाखविण्यात आले आहेत. राम-सीता विवाह, त्यांना वनात हद्दपार करणे, रावणाचे सीता अपहरण, हनुमान-राम भेट, युद्धात रामासह असलेली वानरसेना, राम-सीता पुनर्मिलन अशा घटना पाहावयास मिळतात. भित्तिचित्रांत रावणाच्या अवशेषांची स्मशानभूमीत नेण्यात येणारी अंत्ययात्राही दाखवण्यात आली आहे! ‘रामाकियन’ थाई लोकांना आकर्षित करते. कारण, ते एक आदर्श राजा रामाची प्रतिमा सादर करते, जो सद्गुण धर्मशक्तीचे प्रतीक आहे, तर थोत्सकन (रावण) दुष्ट शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. अंततः सत् शक्तीच विजयी होते. थायलंडमध्ये रामाविषयी तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये. भारतात रामाला न मानणारेही काही आहेत. परंतु, थायलंडमध्ये रामाला विरोध करणारा एकही आढळणार नाही. राम त्यांचे आराध्य आहे. थाई संस्कृतीत राम इतका खोलवर रुजलेला आहे की, त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरासाठी अयुथ्याची मातीही पाठवली!
निष्कर्ष
‘रामाकियन’मध्ये व्यक्त केलेली सत्यनिष्ठा, कर्तव्यपारायणता इत्यादी वैश्विक जीवनमूल्ये सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. रामायण मनुष्यजीवनाची आचारसंहिता आहे. भौगोलिक प्रसारापासून ते अंतरंगाच्या खोलीपर्यंत रामाचा प्रभाव आहे. जागतिकीकरण हे सांस्कृतिक, राष्ट्रीय अस्मितेसाठी धोका आहे. आंतरराष्ट्रीय नातेसंबंध सांस्कृतिक पार्श्वभूमीवर रामायण वाढवू शकते. संपूर्ण विश्वाला बांधून ठेवण्याची क्षमता ‘राम’ या घटकात आहे. रामायण हे जगासाठी सांस्कृतिक रोगप्रतिकारक क्षमतावर्धक आहे. रामायण अशी सौम्य शक्ती आहे की, केवळ आग्नेय आशियातील देशांसाठीच नव्हे, तर अखिल विश्वाला समजूतदारपणा, सामंजस्य, कौटुंबिक भावना या सूत्रात गुंफेल. दहशतवादासकट जगातील सर्व समस्यांचे समाधान रामायणात आहे. रामायण विश्वशांतीची शाश्वती आहे. राजकीय-आर्थिक शोषणरहित दहशतमुक्त विश्वनिर्मितीची शाश्वती आहे.
गिरीश टिळक
(लेखक रामायणाचे अभ्यासक असून, त्यांनी ’वाल्मिकी रामायणाचे सिंहावलोकन’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.)
९८२०३५२४१२