मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी झटणारेनाशिक येथील ‘जागर मनाचा’ संस्थेचे संस्थापक शंतनू श्रीरंग गुणे यांच्याविषयी...
पुण्यात १९६२ साली जन्मलेल्या शंतनू श्रीरंग गुणे यांचे आईवडील पेशाने शिक्षक. शंतनू यांचा जन्म पहिल्या शिक्षकदिनीच झाला. वडील उत्तम कवी, नाटककार व लेखक होते. त्यामुळे बालपणापासूनच वाचनाशी संबंध आला. आईवडिलांना एकाच महाविद्यालयात नोकरी मिळाल्यामुळे दोघेही १९६६ साली नाशिकला स्थायिक झाले. ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’च्या पेठे हायस्कूलमधून शंतनू यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पोहणे, क्रिकेट आणि तबलावादनाची आवडही त्यांना होती. त्यावेळी नाटक, व्याख्याने, संगीत मैफिलींनाही ते हजेरी लावत. इयत्ता दहावीनंतर ‘आरवायके महाविद्यालया’तून विज्ञान शाखेत, इयत्ता बारावीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विवेकानंदांची अनेक पुस्तके वाचली. वाडिया कॉलेजमधून ‘डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअरिंग’ पूर्ण केले. तसेच, त्यांना उत्तम वाचनासह, भटकंतीची आवड निर्माण झाली.
नाशिकला परतल्यानंतर सुरुवातीला ‘व्हिआयपी इंडस्ट्रीज’मध्ये एक वर्ष नोकरी केली. पुढे ‘क्रॉम्पटन’ कंपनीत दोन दशके नोकरी केली. यादरम्यान त्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. त्यावेळी आपण उत्तम बोलू आणि शिकवू शकतो, हे शंतनू यांनी जाणले. शेवटच्या तीन वर्षांत, आपल्यातील क्षमतांना वाव मिळत नसल्याचेही त्यांना जाणवले. त्यामुळे नोकरीचा मार्ग थांबवून, स्वतःच्या उन्नतीचा मार्ग सुरू केला. लोकांकडे क्षमता खूप आहे. मात्र, ते केवळ पोट भरण्यासाठी जगत आहेत. उत्तमाचा ध्यास कुणाला लागलेला नाही. त्यामुळे विकास होत नाही आणि जीवनाला न्याय देता येत नाही, हे जाणवल्यावर त्यांनी दुसर्यांच्या मनावर काम करण्याचे ठरवले. त्याआधी स्वतःच्या मनावर काम करणे आवश्यक होते. त्यामुळेच नोकरी सोडली.
मन म्हणजे काय, स्वभाव काय असतो, तो कसा घडतो, स्वभाव बदलण्यासाठी काय करता येईल, असा आतला प्रवास सुरू झाला. २००९ साली त्यांना एका मोठ्या कंपनीचे कंत्राट मिळाले, ज्याद्वारे हजारो लोकांचा स्वभाव बदलण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे अनेक कंपन्यांत, त्यांनी कर्मचार्यांना औद्योगिक प्रशिक्षणही दिले. ‘सृजन अॅकेडमी’ सुरू केली, ज्याद्वारे मुलांना केवळ शिकवलेच नाही, तर त्यांच्या आवडीनुसार त्यांच्यातील क्षमतांचा विकास करण्याचे प्रयत्न केले. स्वभाव बदलण्याची पद्धत शोधून, तिला नाव दिले गेले ‘जागर मनाचा’. २००९ सालापासून ही संस्था उद्योग, पालक, विद्यार्थी, खेडेगावातील शाळांबरोबर काम करत आहे. मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविणे, यासाठी सध्या ‘जागर मनाचा’ संस्था काम करते.
शालेय विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन केले जाते. ‘बेट्स’ कंपनीद्वारे औद्यागिक बदलांवर काम केले जाते. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती आणि ‘जागर मनाचा फाऊंडेशन’च्या माध्यमातून, सामाजिक कार्य केले जाते.
२०१३ सालापासून मुलगी श्रिया गुणे-पांडे यांनी देखील, शंतनू यांना मदत करण्यास सुरुवात केली. मनाचा अभ्यास करताना शहाणपण जे मिळालेले आहे, ते शिळे आहे. त्यात वाढ करण्यासाठी तपश्चर्या पाहिजे. एका पुस्तकातील ‘नर्मदा परिक्रमा’ ही या जगातील सर्वश्रेष्ठ तपश्चर्या आहे, या शब्दांमुळे शंतनू प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी तयारी सुरू केली. यासाठी दररोज चालणे, डोंगर चढणे-उतरणे, गीता, उपनिषदे ऐकणे आणि मनाची तयारी सुरू केली. शारीरिक आणि मानसिक तयारी करून, दि. २४ ऑक्टोबर, २०२३ रोजी ओंकारेश्वरपासून परिक्रमेला सुरुवात झाली. ‘जो प्राप्त हैं, वो पर्याप्त हैं,’ जे घडेल, ते प्रसाद म्हणून स्वीकारायचे, अशा पद्धतीने शंतनू यांनी ‘नर्मदा परिक्रमा’ सुरू करण्याचा प्रयत्न केला. तब्बल ११२ दिवसांनंतर ३ हजार, २०० किमीची परिक्रमा पूर्ण झाली. लोकांना परिक्रमा आणि त्याविषयीच्या अनुभवांबद्दल उत्सुकता असते. परिक्रमेबद्दलचे त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी, अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करून, पुढे समाजमाध्यमांवर व्हिडिओ स्वरूपात टाकण्यात आले. याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.
“लोक परिक्रमा श्रद्धेपोटी करतात. मी डोळस दृष्टिकोनातून परिक्रमा केली. माझ्या मनावरील अज्ञान, चुकीच्या सवयी पुसून टाकत नर्मदेसारखे आपल्याला निखळ कसे होता येईल, यासाठी मी प्रयत्न केला. परिक्रमेत सेवेतून पिंड पोसला जातो, आपल्याकडून सेवा होत नाही. नर्मदेचे प्रतीक म्हणून, विद्यार्थिनींसोबतही संस्था काम करते. भारतीयत्वाच्या वैशिष्ट्यांविषयी जागृती आणण्यासाठी काम केले जाते. मन हा दुर्लक्षित विषय आहे. भारतीय तत्त्वज्ञानात, उपनिषदांमध्ये मनाविषयी प्रचंड माहिती आहे. पण, ती कोणी पाहातही नाही. परिक्रमेचा उद्देश स्वतःला शोधणे आणि मिळवणे हा आहे. नर्मदेच्या प्रवाहासारखे आयुष्य प्रवाहित राहावे,” असे शंतनू सांगतात.
‘नर्मदा परिक्रमा’ असो वा ‘जागर मनाचा संस्था किंवा फाऊंडेशन’, मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी झटणार्या शंतनू गुणे यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!