भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल समर्थपणे सांभाळत आहेच. मात्र, जागतिक व्यापारात भारतीय व्यापारी नौदलही विक्रमाचे नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. याच व्यापारी नौदलाचा भारतातील इतिहास आणि स्वदेशी नौदलाची प्रवास याचा घेतलेला हा आढावा...
आपला भारत देश हा समुद्रवलयांकित आहे. आपल्या देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीची लांबी आहे ७ हजार, ५१६ किमी. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचा त्याच्या किनार्यापासून पुढे २०० सागरी मैल इतक्या अंतरापर्यंतचा समुद्रातला आणि हवेतला प्रदेश हा रीतसर त्या देशाच्या मालकीचा असतो. या हिशोबाने भारताची एकंदर किनारपट्टी २३ लाख, ५ हजार, १४३ चौ.किमी इतक्या लांबीची आहे. म्हणजेच, भारत हा एक दर्यावर्दी देश आहे आणि तरीही आज भारताच्या जनमानसात सर्वात दुर्लक्षित विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे नौकानयन. आज अत्याधुनिक जगात व्यापारी मालवाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध आहेत. या मार्गांनी मालवाहतूक होते देखील. पण, सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे नौकानयनच. तरीही त्याबाबत समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे.
माझा स्वतःचा सख्खा मामा ‘नेव्ही’मध्ये कॅप्टन होता. पांढर्या शुभ्र पोशाखात, डोक्यावर पीकॉक कॅप घालून तो जेव्हा टॉकटॉक बूट वाजवत घरी येई, तेव्हा आम्हा भावंडांना कोण आनंद होत असे. पण, तू नेमके काय काम करतोस? असे त्याला मोठ्या माणसांपैकी कुणी कधी विचारल्याचे मला तरी आठवत नाही. १९८० सालच्या आसपास केव्हातरी मी स्वतः गो. नी. दांडेकरांचे ‘दर्याभवानी’ आणि दि. वि. गोखले यांचे ‘पहिले महायुद्ध’ ही दोन पुस्तके लागोपाठ वाचली आणि हल्लीच्या साहित्यिक भाषेत बोलायचे, तर मला एकदम ‘युद्धभान’ आले. वेगवेगळ्या युद्धांवरची पुस्तके शोधून-शोधून, मी त्यांचा फडशा पाडत सुटलो. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या लोकांमध्ये कुणी निवृत्त किंवा सेवारत सैनिक आहेत का? याचा शोध घेऊ लागलो आणि मला एकदम धक्काच बसला. अरे, खुद्द मामाच कॅप्टन आहे की!
मी अत्यंत उत्सुकतेने त्याला भेटलो. त्यावेळी तो पश्चिम किनार्यावरच्या एका छोट्या बंदरात मुख्य बंदर अधिकारी म्हणून कार्यरत होता. “मामा, मला सांग की, १९६५ आणि १९७१ सालच्या भारत-पाक युद्धांमध्ये तू कोणकोणत्या जहाजांवर होतास? तुला प्रत्यक्ष ‘अॅक्शन’मध्ये भाग घ्यायला मिळाला का?” मी उत्सुकतेने प्रश्नांची फैर झाडली. “तुला कुणी सांगितले मी ‘नेव्ही’त होतो म्हणून?” मामाने मिश्किलपणे मला प्रतिप्रश्न केला. “म्हणजे काय? आम्ही कित्येकदा तुझ्याबरोबर आलोेय की, भाऊच्या धक्क्यावर किंवा बॅलार्ड पियरला तुझी बोट बघायला. तुझ्या कॅप्टनच्या केबिनमध्ये पण बसलोय,” मी लहानपणीचे ते प्रसंग आठवत आश्चर्याने म्हणालो.
“अरे बाळा, ‘नेव्ही’चे दोन प्रकार असतात. एक ‘डीफेन्स नेव्ही’-लढाऊ नौदल आणि दुसरा ‘मर्चंट नेव्ही’-व्यापारी नौदल. यांपैकी मी ‘मर्चंट नेव्ही’मध्ये होतो. त्यामुळे मी युद्धात असण्याचा प्रश्नच नव्हता,” खो-खो हसत मामा उत्तरला. माझी उत्सुकता केळीच्या सालावरून घसरावे, तशी धाडकन खाली आपटली. व्यापारी नौदल म्हणजे, फक्त विविध प्रकारच्या मालाची ने-आण. त्यात तोफा, बंदुका, पाणबुड्या, विमानवाहू नौका यांची घनचक्कर लढाई नाही, म्हणजे काही गंमतच नाही. यातला ‘मी’ हा प्रातिनिधिक धरला, तर एकंदर हिंदू समाजाची हीच स्थिती आहे. लष्करी नौकानयन काय नि व्यापारी नौकानयन काय? कुणालाच कसलीही धड माहिती नाही. माहिती करून घ्यावी अशी इच्छाही नाही, हे जास्तच वाईट आहे. मुळात व्यापारी नौदलाला, म्हणजे व्यापार करण्यासाठी तर्हेतर्हेचा माल घेऊन एका बंदरातून दुसर्या बंदराकडे जाणार्या जहाजांच्या काफिल्याला संरक्षण देण्यासाठी लढाऊ नौदलाची निर्मिती झाली. व्यापारी जहाजांना मुख्य धोका असायचा, तो अन्य प्रतिस्पर्धी व्यापार्यांकडून किंवा त्याहीपेक्षा म्हणजे, चांचे लोकांकडून. चांचे म्हणजे समुद्रावरचे डाकू, लुटारू, दरोडेखोर.
आधुनिक काळात म्हणजे इ. स. १६०० साली लंडनमध्ये ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ची स्थापना करून, इंग्रजांनी नौकानयनाला संघटित रूप दिले. म्हणजे ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची व्यापारी जहाजे, स्वतःच्या किंवा इतर खासगी व्यापार्यांच्या मालाची ने-आण करीत असे. प्रवाशांची ने-आण करीत असे. तर कंपनीची लढाऊ जहाजे, या व्यापारी किंवा प्रवासी जहाजांच्या काफिल्यासोबत राहून त्यांंचे संरक्षण करीत असत. इंग्रजांप्रमाणेच भारत आणि आग्नेय आशियातील अन्य देशांसोबत मोठा व्यापार करणार्या ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’, ‘डच ईस्ट इंडिया कंपनी’ यासुद्धा होत्याच. अधिकृतरित्या या कंपन्यांचा त्या-त्या देशातील सत्ताधार्यांशी काही संबंध नसून, या खासगी मालकीच्या कंपन्या होत्या. या सगळ्यांपेक्षा व्यापार आणि लढाऊ शक्ती या दोन्ही दृष्टींनी, त्यावेळी पोर्तुगीज जास्त प्रबळ होते. ते खासगी कंपनीचा बुरखा न घेता, उघड-उघड आपल्या राजाच्या नावाने व्यापार, लढाया आणि जोरदार बाटवाबाटवी करीत होते.
पुढे मराठ्यांनी सिद्दी आणि पोर्तुगीज यांचे सामर्थ्य संपवले. इंग्रजांनी फ्रेंच आणि डच यांना संपवले. अखेर इंग्रजांनी मराठ्यांना संपवले आणि पूर्वेकडचे संपूर्ण नौकानयन, इंग्रजांच्या ताब्यात आले. भारतीय व्यापार्यांचा समुद्री व्यापार एकतर खूपच मर्यादित होता आणि युरोपीय दर्यावर्दींप्रमाणे संघटित तर तो कधीच नव्हता. परिणामी ‘इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनी’ने जेव्हा संपूर्ण भारत जिंकला, तेव्हा स्वतः ‘ईस्ट इंडिया’ बरोबरच इतर काही जहाज कंपन्या, भारतीय नौकानयन व्यवसायावर घट्ट पकड ठेवून होत्या. त्यांपैकी काही कंपन्या एकत्र होऊन १८३७ साली एक जबरदस्त कंपनी निर्माण झाली. तिचे नाव ‘पेनिनसुला अॅण्ड ओरिएंटल स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ किंवा लोकप्रिय नाव ‘पी अॅण्ड ओ’. सन १८५६ मध्ये ‘पी अॅण्ड ओ’च्या जोडीला आणखी एक जबरदस्त जहान कंपनी आली, ‘ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ किंवा ‘बीआय’. पुढच्याच वर्षी म्हणजे १८५७ साली भारतीय क्रांतिकारकांनी, ‘ईस्ट इंडिया कंपनी’ उर्फ ‘कंपनी सरकार’ विरुद्ध क्रांतीचा वणवा पेटवला. तो असफल झाला. १८५८ साली ब्रिटिश पार्लमेंटने, कंपनी सरकारचा बुरखा फेकून देऊन भारतावर रीतसर व्हिक्टोरिया राणीचे राज्य सुरू झाल्याचे घोषित केले.
मात्र, भारतातून बाहेर जाणारा माल किंवा बाहेरून भारतात येणारा माल, हा ‘पी अॅण्ड ओ’ आणि ‘बीआय’ याच कंपन्यांच्या मार्फत नेला-आणला जाई. म्हणजेच, भारताच्या व्यापारी नौकानयनावर इंग्रजांचीच पूर्ण पकड होती आणि या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी, खुद्द ‘ब्रिटिश रॉयल नेव्ही’ सन १८६३ पासून तैनात करण्यात आली. पुढे १८९३ साली खास भारतीय नौकानयन मार्गांच्या संरक्षणासाठी, ‘रॉयल इंडियन मरीन’ असे एक छोटे लढाऊ नौदल निर्माण करण्यात आले. पोर्तुगीजांनी सन १५३४ साली वसई जिंकली. लवकरच त्यांंच्या असे लक्षात आले की, स्थानिक कारागीर हे युरोपीय कारागिरांपेक्षाही अधिक कुशल आहेत. पोर्तुगीजांनी आगाशी या विरार नजीकच्या गावात जहाजबांधणी कारखाना सुरू केला. इथे बांधलेली भक्कम जहाजे युरोपात जाऊ लागली. इंग्रजांनी सन १६१२ मध्ये सुरतेला वखार उघडली, त्यांनाही हाच अनुभव आला. सुरतेच्या स्थानिक कारागिरांनी बांधलेली उत्कृष्ट जहाजे युरोपात जाऊ लागली. सन १६६५ मध्ये इंग्रज मुंबईला आले. सन १७३६ मध्ये त्यांनी आपला सुरतेचा प्रमुख मिस्त्री लवजी नसखानजी वाडिया, यालाच मुंबईला आणले. पुढच्या काळात वाडिया शिपबिल्डर्सनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’साठी शेकडो उत्कृष्ट जहाजे बांधली.
परंतु, ही सगळी बुद्धिमता, हे कौशल्य फुकट होते. प्रबळ इंग्रज धन्याला आणखी प्रबळ करण्यासाठी, गुलाम भारतीयांची ही सगळी गुणवत्ता खर्ची पडत होती. सैनिकी नौदल पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात होते, यात आश्चर्य नव्हते. परंतु, व्यापारी नौदलावरदेखील पूर्णपणे त्यांचीच पकड होती. कुणाही भारतीय व्यापार्याला नौकानयन कंपनी काढायला, इंग्रज सरकारची परवानगीच नव्हती मुळी. इंग्रज फार फार सावध होते. त्यांना मनोमन माहीत होते की, हे भारतीय म्हणजे हिंदू लोक खरे पाहाता सर्वच बाबतीत आपल्याला भारी आहेत. ज्या क्षेत्रात त्यांना मोकळीक द्याल, त्यात ते बघता-बघता आपल्या पुढे निघून जातील. रेल्वे आम्हाला भारतात आणायची नव्हती. पण, त्या नाना शंकरशेटजींमुळे नाईलाज झाला. आता समुद्र हे मात्र खास आमचेच क्षेत्र आहे, आमची मक्तेदारी आहे. तिथे आम्ही या हिंदूंना घुसू देणार नाही. इंग्रजांच्या या धोरणाला पहिल्या महायुद्धाने धक्का दिला. १९१४ ते १९१८ या कालखंडात जर्मनीबरोबर झालेले हे महायुद्ध, ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका या दोस्त राष्ट्रांनी जिंकले. पण, ब्रिटनची या युद्धात अतोनात हानी झाली. फार मोठ्या संख्येत मनुष्यबळ आणि संसाधने नष्ट झाली. त्यामुळे इंग्रजांना नाईलाजाने, भारतीयांना व्यापारी नौकानयन कंपनी स्थापन करण्याची परवानगी द्यावी लागली.
ही सुवर्णसंधी साधली, वालचंद हिराचंद दोशी या द्रष्ट्या उद्योगपतीने. दोशी घराणे मूळचे गुजरातमधल्या वांकानेरचे. कित्येक पिढ्यांपूर्वी ते सोलापूरला स्थायिक झाले. तिथे ते कपडा उद्योग आणि सावकारी करीत असत. वालचंद हा मात्र वेगळा माणूस होता. पिढ्यान् पिढ्यांचा धंदाच फक्त न करता, ते रेल्वे बांधणी व्यवसायात उतरले. आजचे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरचे खंडाळ्याच्या घाटातले बोगदे वालचंदशेटनी बांधलेले आहेत. तानसा तलावापासून मुंबई शहरापर्यंतचे अजस्त्र नळ वालचंदशेटनी टाकलेले आहेत. १९१४ साली युरोपात महायुद्ध सुरू झाले, तेव्हा भारतीय संस्थानिकांनी आपापली सैन्यदले इंग्रजांच्या मदतीला पाठवली. ‘ग्वाल्हेर संस्थान’च्या शिंदे महाराजांनी तर कमालच केली. ‘कॅनडा पॅसिफिक स्टीम शिप कंपनी’चे ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ हे प्रवासी जहाजच त्यांनी विकत घेतले. त्याचे रूपांतर हॉस्पिटल शिपमध्ये केले आणि ‘लॉयल्टी’ असे त्याचे नवे नाव ठेवून, सैनिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी ते इंग्रजांकडे सुपूर्त केले. १९१८ साली महायुद्ध संपल्यावर ‘लॉयल्टी’चा उपयोग संपला.
वालचंद हिराचंदनी १९१९ साली शिंदे सरकारकडून ते जहाज विकत घेतले. नरोत्तम मोरारजी आणि किलाचंद देवचंद या आपल्या मित्रांना बरोबर घेऊन, एक नौकानयन कंपनी काढली. शिंदे सरकारांचा मान ठेवण्यासाठी तिला नाव दिले ‘दि सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी.’ आधुनिक भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी नौकानयन कंपनी. भारताच्या पूर्व किनार्यावरील चोल आणि पांड्य, पश्चिम किनार्यावरील चेर, विजयनगर आणि हिंदवी स्वराज्य या सागरी सत्तांच्या अस्तानंतर उदयाला आलेली पहिली, संघटित, व्यापारी, पूर्णपणे भारतीय कंपनी आणि या कंपनीचे पहिले जहाज ‘स्टीम शिप लॉयल्टी’, दि. ५ एप्रिल १९१९ रोजी मुंबईहून लंडनकडे माल घेऊन निघाले. ‘पी अॅण्ड ओ’ नि ‘बीआय’ यांच्या नाकावर टिच्चून, एक भारतीय कंपनी समुद्री व्यापारात उतरली. म्हणून दि. ५ एप्रिल रोजीचा हा ‘राष्ट्रीय नौकानयन दिवस’ आहे. आपल्याला डिसेंबरचा पहिला सप्ताह हा ‘नौदल सप्ताह’ म्हणून माहीत आहे, तशीच दि. ५ एप्रिल रोजीची प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.