चीन आणि हृदयसंवादी रामायण

    05-Apr-2025
Total Views | 20
 
Ramnavami 2025
 
 
वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली. या रामकथेने जगभरातल्या अनेक संस्कृतींना भुरळ घातली. अगदी चीनही त्याला अपवाद नाहीच.
एखादी कलाकृती जेव्हा देशांच्या सीमा ओलांडून पलीकडे जाते, तेव्हा अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक कारणांचा त्याला हातभार लागतो. चीनमध्ये भारतातली रामकथा जाते, तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. चीनमधे रामायण कसे गेले ? कोणी नेले? चीन आणि रामायण यांचे संबंध किती जुने आहेत आणि किती विविधांगी आहेत? ज्या काळात बौद्ध धर्म चीनमध्ये गेला आणि पुढे लोकप्रियही झाला, त्या काळात बौद्ध तत्त्वज्ञानाने युद्ध आणि युद्धानंतर होणारी मानसिक वाताहत, यातून या देशाला उभे राहण्याची ताकद दिली. युद्धापश्चात दुःखातून, विफलतेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. चीनमधे इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकात हान राजवंशाच्या काळात, बौद्ध धर्म पोहोचला.
 
भारत आणि चीन या देशांचे संबंध फार फार जुने. या दोन शेजारी देशांमध्ये अनेक शतकांपूर्वीपासून व्यापार चालू होता. रेशीममार्ग हा चीनमधून युरोपीय देशांपर्यंत जायचा. या व्यापारी मार्गावरून उत्तम प्रतीचे रेशीम, मसाल्याचे पदार्थ, रत्न इत्यादींचा व्यापार व्हायचा. जशा व्यापारी वस्तू या मार्गाने गेल्या, तशाच या मार्गावरून भारतीय कला, कल्पना आणि धर्म विशेषतः बौद्ध धर्म गेला. त्यामुळे हा व्यापारी मार्ग सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरला.
 
याच आसपास, हिंदू धर्मही व्यापारी मार्गांनी चीनमध्ये पोहोचला. बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे वेगवेगळ्या 24 देवता चीनने सामावून घेतल्या. शिव, ब्रह्म, लक्ष्मी, सरस्वती, यम इ. देवता चिनी संस्कृतीच्या अविभाज्य भाग झाल्या. उदा. शिव म्हणजे ‘दाझायतियान’ किंवा इंद्र म्हणजे ‘दिशितिआन’ इ. देवतांच्या मूर्ती चीनमधील वेगवेगळ्या बौद्ध मंदिरांमध्ये बघायला मिळतात. हनुमानाचा तर चीनने मोकळ्या मनाने अगदी स्वीकार केला.
 
फायान आणि युआन श्वांग यांसारखे अनेक चिनी बौद्ध भिक्खू भारतात आले, त्यांनी भारतीय हस्तलिखिते बरोबर नेली. त्याचे चिनी भाषेत अनुवाद केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राटांच्या आमंत्रणावरून, धर्मरक्षक आणि कश्यप मातंग असे काही बौद्ध भिक्षूही भारतातून चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले. तिथूनच पुढे बौद्ध धर्म कोरिया, जपान, व्हिएतनाम अशा अनेक आशियामधल्या देशांपर्यंत गेला.
 
चीन आणि मध्य आशिया यांचा परस्परांशी संबंध प्रस्थापित होऊन, दुसर्‍या शतकापर्यंत तेथे भारतीय साहित्याचा प्रभाव बराच वाढला होता. इ.स. 472 मध्ये चि-चिया-यन् याने पाओ-त्सांग-चिङ्ग या त्याच्या ग्रंथाचा प्रारंभच रामायणाने केला. ‘चि-चिआ-य’ हे संस्कृतच्या ‘केकेय’ नावाचे रूपांतर आहे. या ग्रंथाच्या उपसंहारात, रामराज्याचे मोठे गुणगान केलेले आहे. ‘अनामकं जातकम्’ नावाच्या बौद्ध जातकाचे, कांग-से-इ नावाच्या चिनी लेखकाने चिनी भाषेत रूपांतर केले; ते ‘लिये-उतुत्सी’ नावाच्या ग्रंथात सुरक्षित आहे. यामध्ये राम-सीतेचा वनवास, सीताहरण, जटायुचा वृत्तांत, वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध, सीतेची अग्निपरीक्षा इत्यादी घटनांचे रोचक वर्णन आहे. या ग्रंथाच्या कितीतरी हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत.
 
रामकथेचा आनंद चीनवासीयांना पहिल्यांदा मिळाला तो, बौद्ध धर्मातल्या जातकामधल्या ‘दशरथ जातक’, ‘वानरराजा’ अशा कथांमुळे. या जातककथा म्हणजे, बुद्धाच्या आधीच्या जन्मांमधल्या कथा आहेत. याचा रचनाकाल इसवी सनाचे पहिले शतक ते तिसरे शतक मानला जातो. त्या जातकांमध्ये अनेक कल्पना, पात्रे भारतीय समाजात प्रचलित असलेल्या कथासंचितातून घेण्यात आली आहेत. राजा दशरथ, राम, सीता यांसारख्या रामायणातल्या व्यक्तिरेखा आणि युधिष्ठिर, विदुर, कृष्ण अशा महाभारतातल्या व्यक्तिरेखाही या जातकांमधून दिसतात. त्यातल्या रामायणाशी संबंधित सुमारे दहा ते 15 जातककथा आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या काही कथा उदा. ‘राजा दशरथ’, ‘वानरराजा’, ‘अनामकं जातकम्’ आणि ‘दशरथ कथानाम’ याबद्दल आपण माहिती घेऊया.
 
दशरथ जातक
 
‘दशरथ जातका’तील कथेनुसार, एकेकाळी बनारस म्हणजे वाराणसीमध्ये दशरथ नावाचा राजा शासन करीत होता. तो वीर, धर्मपरायण आणि न्यायप्रिय होता. प्रजाहित आणि सतत धर्ममार्गावरून चालणे, ही त्याची विशेष ओळख होती. त्याच्या राज्यात लोक सुखी होते. कारण, राजाने नेहमीच न्याय आणि सत्याचे पालन केले होते. राजा दशरथाला चार पुत्र होते. त्यात सर्वांत मोठा पुत्र राम. दशरथाची कन्या आहे सीता, ती रामाची बहीण आहे आणि पत्नीही आहे. या कथेत राम बोधिसत्व आहे. सर्व भावंडांमध्येे अधिक गुणवान, विनम्र आणि बलशाली. रामाच्या राज्याभिषेकाची तयारी होत असताना, तपस्वी विश्वामित्र राजा दशरथाकडे आले. दुष्ट राक्षसांच्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी, ते रामाला घेऊन गेले. विश्वामित्रांनी सांगितले की, “हे कार्य रामाचे आहे. कारण, तो केवळ पराक्रमी नाही, तर त्याच्यात सत्य आणि धर्माची शक्ती आहे.” राम आणि लक्ष्मण तपस्वींची रक्षा करण्यासाठी गेले असता, कैकेयीने दोन वर मागितले. भरतासाठी राज्य आणि रामाला 14 वर्षे वनवास. राजा दशरथाने धर्म आणि सत्याचे पालन करण्यासाठी दिलेले वचन पाळले.
 
ही कथा बौद्ध धर्माच्या जातकामध्ये घेतली गेली. कारण, ‘दशरथ जातका’च्या माध्यमातून बुद्धांनी शिकवले की, जीवनात सत्य आणि धर्मपालनाचे किती महत्त्व आहे. दशरथाने पुत्रावर अत्याधिक प्रेम असतानाही, ते बाजूला सारून वचन आणि धर्माचे पालन केले. प्रिय पुत्राचा वियोग होऊनही सत्याच्या मार्गापासून तो कधीही विचलित झाला नाही.
 
‘अनामकं जातकम्’
 
‘अनामकं जातकम्’ हे साधारणपणे तिसर्‍या किंवा चौथ्या शतकात लिहिलेले जातक आहे. पाचव्या शतकात कांग-सेंग-हुई यांनी केलेला त्याचा चिनी अनुवाद, ‘लियेऊ-तुत्सी-किंग’ नावाच्या पुस्तकात बघायला मिळतो. या जातकाचे नाव ‘अनाम’ आहे. कारण, यातल्या पात्रांना नावे नाहीत. यातल्या कथानकाच्या साम्यावरून हे रामायणाशी संबंधित जातक आहे, हे लक्षात येते. या जातकातल्या कथेप्रमाणे नायक म्हणजेच राम, त्यांच्या मामाच्या आक्रमणाच्या तयारीबद्दल ऐकून स्वतःच राज्य सोडतो आणि वनात जातो. त्यामागे रक्तपात आणि युद्ध थांबवणे, हा उद्देश असतो. या जातकानुसार वालीचा वध रामाने केला नाही, तर तो स्वतःच भीतीने पळून गेला.
 
नीतिमत्ता सांगण्यासाठी कथा हे इथे एक प्रभावी माध्यम आहे. सत्याचे पालन, कर्तव्य आणि त्याग, नैतिकता आणि नेतृत्व अशा अनेक गोष्टी, या कथांमधून नकळतपणे वाचकांच्या मनावर बिंबवल्या जाव्या, अशी येथील लोकांची कल्पना आहे.
 
‘दशरथ कथानाम’
 
‘दशरथ कथानाम’ ही जातककथाही या संदर्भात पाहायला हवी. ही कथा मुळात पाली त्रिपिटकात असली पाहिजे. पण, सध्या मात्र त्याचे फक्त चिनी भाषांतरच उपलब्ध आहे. या कथेमध्ये दशरथ हा जम्बुद्वीपाचा राजा आहे. त्याला तीन राण्या आणि चार पुत्र आहेत. या कथेत रामाचे नाव ‘लोमो’, तर लक्ष्मणाचे ‘लो-मन’ आहे. लोमोला म्हणजेच रामाला राज्याभिषेक करून युवराजपद द्यायचे असतानाच, भरताची आई वर मागते. पुढे वनवास, भरताने रामाच्या पादुका आणणे हा भाग तसाच आहे. पण, या कथेमध्ये सीतेचा अजिबात उल्लेख नाही. त्यामुळे अर्थातच रावण, रावणाने तिला पळवणे, हेदेखील काहीच नाही. राक्षसांचा उल्लेखच नाही. युद्ध, रक्तपात हा विषय या 
 
 
कथेत अजिबात येत नाही आणि त्यामुळेच, ही बौद्ध तत्त्वज्ञानाशी सुसंगत कथा आहे.
 
आता आपण हनुमान आणि चीन याबद्दल थोडे पाहूया. ‘जर्नी टू दि वेस्ट’ ही चीनमधील एक प्रसिद्ध साहित्यकृती आहे. मिंग राजवंशाच्या काळात लिहिलेले हे साहित्य, हुएन त्संग याच्या भारतातील प्रवासावर आधारित आहे. या साहित्यात सन वुकोंग हा वानरांचा राजा आहे. तो ‘मंकी किंग’ म्हणून जगभर ओळखला जातो. रामायणातल्या हनुमानाशी त्याचे पुष्कळ साम्य आहे. दोघेही, बल, साहस, निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक आहेत. आजही कार्टून आणि चित्रपटाच्या माध्यमातून, भारतीय हनुमानाचे रूप ‘मंकी किंग’च्या रूपाने पाहायला मिळते, असे काही अभ्यासकांना वाटते. दाय हा युनान भागात निवास करणारा एक गट आहे. रामकथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या त्यांच्यात प्रचलित आहेत. त्यादेखील मौखिक पद्धतीनेच पिढ्यान्पिढ्या म्हटल्या जात आहेत. त्यातली सर्वांत प्रसिद्ध कथा लंका श्यिये याची आहे. रामायणाशी अनेक साम्यस्थळे या कथेत आपल्याला दिसतात. यामध्ये रामाने वनवासात 14 वर्षे काढली, त्याचा संबंध चिनी राशीचक्राप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांशी लावलेला दिसतो.
 
1950 साली मि वेकांई यांनी वाल्मिकीकृत रामायणाचे गद्य भाषांतर केले, तर 1962 मध्ये सन योंग यांनी दोन्ही आदिकाव्यांचे भाषांतर केले. पण, या दोघांनी केलेले भाषांतर, इंग्रजी भाषांतरावर आधारित होते. मूळ संस्कृत भाषेतून चिनी भाषेमध्ये पहिल्यांदा भाषांतर केले, ते भारतीय विद्येचे गाढे अभ्यासक जी श्यानलिन यांनी. हे भाषांतर 1984 मध्ये प्रकाशित झाले. 2006 मध्ये जी श्यानलिन यांना अनुवादाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल चीन सरकारकडून ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. दि. 26 जानेवारी 2008 रोजी भारत सरकारने जी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. पहिल्यांदाच एखाद्या चिनी व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला. जी यांचे हे भाषांतराचे काम म्हणजे, भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणारा अमोल दुवा आहे.
 
त्यानंतरचा प्रश्न होता, मूळ कथानकातील पर्वत, नद्या, राज्ये, वाद्ये, व्यक्ती यांच्या विशेष नामांचे भाषांतर कसे करायचे. काही वेळा अशा विशेष नावांसाठी चिनी शब्द वापरलेले दिसतात. उदाहरणार्थ, आपण ‘रामायण’ या ग्रंथाच्या नावाचे ‘लोमो-यान-ना’ असे भाषांतर केले आहे. राम या विशेष नामासाठी, ‘लुओ’ हा चिनी भाषेतला शब्द त्यांनी वापरला. ‘लुओ’ म्हणजे हुशार. या क्रियापदाचा अर्थ काळजी घेणे, सर्वांना एकत्र करणे. ‘मो’ म्हणजे पुढचा रस्ता. ‘यान’ म्हणजे विकसित करणे किंवा तेजस्वी. ‘लोमो-यान-ना’ या शब्दाचा एकत्रित अर्थ ‘चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाचा रस्ता आणि त्याचे तेज’ असा होतो. संस्कृतमध्ये ‘रामायण’ या शब्दाचा अर्थ ‘रामाच्या जीवनाचा प्रवास’ असा होतो. तो अर्थ तर या भाषांतरात आला आहेच, पण राम ही तेजस्वी आणि हुशार व्यक्ती आहे, हेदेखील त्यात गुंफले गेले आहे.” या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर वनवासातील रामाचे पेन्सिल चित्र आहे. त्यावर थोडा चिनी चित्रकारितेचा प्रभाव दिसतो आणि पुढे काही चित्रे आहेत, ती भारतीय हस्तलिखितांमधून घेतली असावीत, असे वाटते. त्यातले रेखाटन, कपडे, दागिने, वास्तू आणि रंगसंगती ही भारतीय शैलीमधली आहे. प्रत्येक चित्राच्या शेजारी पद्यात्मक विवेचनही दिलेले आहे.
 
1984 मध्ये त्यांचे हे काम प्रसिद्ध झाले. त्यांना हे प्रचंड काम करायला साधारणपणे एका तपाचा कालावधी लागला. हे भाषांतराचे काम करत असताना त्यांचा असा विश्वास होता की, मानवतेचा विकास हा सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनच शक्य आहे. मानवाला परस्परांमधील सामंजस्य वाढवल्याशिवाय तरणोपाय नाही. अशी देवाणघेवाण करण्यासाठी रामायणाइतका दुसरा चांगला ग्रंथ नाही. अर्थातच, त्या कालखंडात चीनमध्ये राहून याप्रकारचे काम करणे सोपे नव्हते. जी श्यानलिन या प्रकारचे काम करत आहेत, हे जर सरकारच्या लक्षात आले असते, तर त्यांना सरकारी रोषाला आणि अत्याचारांना तोंड द्यावे लागणार, हे निश्चित होते. हे कोणाच्या नजरेला पडू नये, यासाठी ते रात्रीच्या वेळी भाषांतराचे काम करायचे. तिथल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद त्या काव्यांतून आपल्याला दिसून येतात. या कार्यासाठी त्यांना नजरकैद सोसावी लागली. राजकीय बदल झाल्यानंतरच, श्यानलिन यांना त्यांचे पद परत मिळाले आणि त्यांचे हे प्रचंड काम राष्ट्रीय मोलाचे आहे, हे मान्य झाले.
 
चीन आणि भारत ही दोन्ही महान राष्ट्रे, दोन हजार वर्षांपासून संस्कृतीची देवाणघेवाण करत आहेत. दोन्ही देशांच्या सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी, सकारात्मक भूमिका साहित्याने बजावली आहे. रामायणासारखे साहित्य हा उत्कृष्ट साहित्यिक आणि कलात्मक वारसा आहे. भाषांतरांसारख्या प्रयत्नांमधून, चीन आणि भारतातील लोकांमधील परस्पर सामंजस्याची परंपरा अधिक दृढ होईल; आमचे नाते अधिक घट्ट होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
 
साहित्य हा संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो आणि तो देशांच्या, राजकारणाच्या आणि मनामनातल्या मर्यादा उल्लंघून पुढे जातो. साहित्य माणसांना जोडून घेते. रामायण-महाभारतासारखे प्राचीन ग्रंथ त्याचीच साक्ष देत असतात. अशा ग्रंथातले विचार, भावना आणि मूल्ये देशांच्या सीमांपेक्षा मोठी होतात आणि भेद मिटवून टाकायला मदत करतात.
 
डॉ. सुनीला गोंधळेकर
(लेखिका संस्कृत आणि मराठीच्या अभ्यासिका आहेत.)
9423236433
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121