रामायणाचे खोतानी स्वरुप

    05-Apr-2025
Total Views | 13

Ramnavami 2025
खोतान राज्याच्या भूमीत, भारतीय परंपरेतील रामायण एका वेगळ्या रूपात साकारलेले आजही पाहायला मिळते. भाषा वेगळी, परंपरांची वळणं वेगळी, पण कथा तीच; धर्म, सत्य आणि आदर्शाचं तेज जपणारी! वेळ बदलली, ठिकाण बदलले, पण ही कथा आजही लोकांच्या मनांत त्याच श्रद्धेने घर करून आहे. खोतानी रामायण वाचताना, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवल्याचा भास आपल्याला होतो, जिथे परंपरा आणि श्रद्धांच्या अतूट धाग्यांनी विणलेली ही रामायणाची नक्षी नव्या अर्थांनी समोर येते.
यावत्स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले, तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति।’ अर्थात, जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत आणि नद्या आहेत, तोपर्यंत रामकथा लोकप्रिय राहील, असे खुद्द वाल्मिकींनीच रामायणात लिहून ठेवले आहे. ती त्यांची वाणी शब्दशः खरी ठरली. जोवर पर्वत, नद्या आहेत, इतकेच नाही, तर जिथे पर्वत, नद्या आणि प्राचीन संस्कृती, विशेषतः भारतीय संस्कृती पोहोचली, तिथे तिथे रामकथा आपले प्रादेशिक रुपडे घेऊन तिथल्या संस्कृतीतली एक महत्त्वाचा घटक बनली. ‘वाल्मीकिगिरिसम्भूता रामसागरगामिनी’ म्हणजे वाल्मिकीरूपी पर्वतावर उगम पावलेली आणि रामरूपी सागराला जाणारी महानदी असे रामायणाचे काव्यात्मक वर्णन केले गेले आहे. या नदीने आपल्या प्रवासात विविध प्रदेशांनुसार अनेक वळणे, विविध रूपे घेतलेली आपल्याला दिसतात. जणू काही रामरूपी सागराकडे जाणार्‍या अनेक नद्या असाव्यात, असेच दिसून येते. अशीच एक रामायणाची वेगळी कथा खोतान या चीनमधील भागात आढळून येते. तिथे ती फार प्राचीन काळीच पोहोचली असावी, असे दिसते.
 
प्राचीन खोतान राज्य हे आताच्या चीनमध्ये तारिम नदीच्या खोर्‍यामधील (आधुनिक काळातील शिनजियांग प्रदेश) तकलामकान वाळवंटाच्या दक्षिणेकडे रेशीममार्गाच्या बाजूला वसलेले एक प्राचीन शक राज्य होते. तिथे मिळालेल्या हस्तलिखितांमध्ये 1938 साली सर हॅरोल्ड वॉल्टर बेली या ब्रिटिश विद्वानाला खोतानी भाषेतील रामायण आढळले. वाल्मिकी रामायणाप्रमाणे ते पद्यामध्ये, म्हणजे श्लोकांमध्ये रचलेले आहे.
 
खोतानी रामायणात परशुराम आणि कार्तवीर्यार्जुन म्हणजेच, सहस्त्रबाहू या दोघांची कथा आणि रामकथा एकत्र झालेली दिसते. इथे राजा दशरथाचे एक नाव सहस्त्रबाहू आहे. खोतानी रामायणाची थोडक्यात कथा अशी - एक ऋषी पर्वतावर तपस्या करत होते. 12 वर्षांच्या शेवटी त्यांना महेश्वर प्रसन्न झाले. ऋषींना महेश्वरांनी सर्व इच्छा पूर्ण करणारे ‘चिंतामणी’ नावाचे रत्न आणि जीवनावश्यक गरजा पूर्ण करणारी एक गाय दिली. दशरथ नावाचा एक पराक्रमी राजा होता, त्याला ‘सहस्त्रबाहू’ म्हणत असत. तो शिकार करायला गेला असता, या ऋषींची आणि त्याची भेट झाली. ऋषींनी त्याचे आदरातिथ्य केले. पण, दशरथाने त्यांची गाय पळवून नेली. त्यानंतर ते ऋषी आपला तरुण मुलगा परशुराम याच्याबरोबर खूप दिवस भीक मागत दुःखात फिरत होते. या मुलाने पर्वतावर जाऊन 12 वर्षे तपस्या केली. ब्रह्मदेवाने त्याला सिद्धी दिली. त्यानंतर दशरथाचा सूड घेण्यासाठी तो परशू घेऊन निघाला. त्या दोघांचे युद्ध झाले आणि दशरथाचा वध झाला. या रामायणात श्रावणबाळ, कैकेयी, तिला दिलेले वर इत्यादी कोणताच कथाभाग येत नाही.
 
दशरथाचे दोन पुत्र - राम आणि ऋष्म (म्हणजे लक्ष्मण) यांना दशरथाच्या राणीने, 12 वर्षे पृथ्वीखाली लपवून ठेवल्याने ते वाचले. बाहेर पडल्यावर त्यांनी पर्वतांमध्ये परशुरामाचा शोध घेतला आणि रामाने परशुरामाचा वध केला. त्यानंतर या दोघा भावांनी संपूर्ण जम्बुद्वीप ताब्यात घेतला. आपल्याला माहीत असलेल्या रामायणात राम आणि परशुराम आमनेसामने उभे ठाकतात; पण दोघेही युद्ध थांबवतात. शिवाय, आपल्या परंपरेनुसार परशुराम ‘चिरजीवी’ (चिरंजीव) आहेत.
 
रावणाचे खोतानी रामायणातले नाव आहे ‘दशग्रीव.’ म्हणजेच, ज्याला दहा माना आहेत असा. त्याला एक मुलगी झाली, ती सीता. ज्योतिष्यांनी तिची कुंडली पाहिली आणि भाकित केले की, ती राजाच्या नगराचा आणि राजाचा नाश करेल. दशग्रीवाने मुलीला एका पेटीत ठेवून ती पेटी, मोठ्या नदीवर टाकण्याची आज्ञा दिली. एका ऋषींना ती वाहात जात असलेली पेटी मिळाली. त्यांनी त्या मुलीचे संगोपन केले. राम आणि लक्ष्मण मोठे झाल्यावर, सीता असलेल्या ठिकाणी आले आणि तिला पाहून तिच्या प्रेमात पडले. तिला त्यांनी एका मंडलात म्हणजे जादूच्या वर्तुळात ठेवले.
 
राम आणि लक्ष्मण शिकारीला निघाले. दशग्रीवाने हवेतून जात असताना ही सुंदर स्त्री जमिनीवर पाहिली आणि तो खाली उतरला. तो जादूचे वर्तुळ पार करू शकला नाही. सीतेवर लक्ष ठेवणार्‍या गिधाडाने त्याच्यावर हल्ला केला; पण दशग्रीवाने त्याला ठार मारले. त्यानंतर रावणाने सीतेला कशा तर्‍हेने पळवले, तो कथाभाग आपल्या रामायणाशी जुळणारा आहे. शिकार करून परतल्यावर राम आणि लक्ष्मण यांना सीता जागेवर नाही, हे बघून धक्का बसला. त्यांनी सीतेचा शोध घेतला, पण व्यर्थच. पुढे ते वानरांच्या देशात आले. या तरुण वीरांनी सुग्रीव आणि नंद या दोन वानर भावांना लढताना पाहिले. आता इथे एक गंमत आहे. वाल्मिकी रामायणातल्या वालीचे पात्र इथे सुग्रीव नावाने आहे, तर इथला नंद म्हणजे आपला सुग्रीव आहे! खोतानी रामायणात रामाने आणि नंदाने एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले. सुग्रीव आणि नंद हे दोघे भाऊ अगदी सारखे दिसत. म्हणून सुग्रीवाबरोबरील द्वंद्वात नंदाने त्याच्या अंगावर आरसा बांधला, जेणेकरून रामाला नंद ओळखू येईल. रामाने सुग्रीवाला ठार केले. नंदाने नंतर त्याच्या वानरांना बोलावले आणि त्यांचे डोळे फोडण्याची धमकी देऊन, त्यांना सात दिवसांत सीतेला शोधण्यासाठी पाठवले. (अशा गोष्टी आपल्या भारतीय मानसिकतेला फारच विचित्र वाटतात.)
 
इथे कथानकात खूपच विस्तार झालेला दिसतो. बरीच वळणे घेतल्यावर एका पक्षिणीमुळे सीता कुठे आहे ते वानरांना कळले; या वळणाशी कथा येते. त्यानंतर वानरांचे सैन्य जमवण्यात आले. त्यांच्या गुरुंनी पाणी ओलांडण्यासाठी, दगडांचा पूल बांधण्याचा सल्ला दिला. वानरांनी पूल बांधून ओलांडला आणि नंतर तो नष्ट केला, पुढे लंकापुराकडे प्रयाण केले. पुढे खूप मोठे युद्ध झाले, या युद्धात राक्षसांचा पराभव होऊन ते पळून गेले. ते पाहून रावणाने तपस्येला सुरुवात केली. राम आणि वानर दशग्रीवाच्या शोधात लंकापुरात दाखल झाले. इकडे दशग्रीवाच्या लक्षात आले की, तो सिद्धी मिळवण्यात अयशस्वी झाला आहे. त्यामुळे त्यानंतर त्याने नागाचे विष काढून, ते लोण्यात मिसळून बाणावर लावले. असा बाण रावणाने रामावर सोडला. तो रामाच्या कपाळाला लागला आणि राम बेशुद्ध पडला. इथे कथेमध्ये एक ‘जीवक’ नावाचा बौद्ध वैद्य येतो. जीवकाला बोलावण्यात आले आणि तो म्हणतो की, “हिमवंत पर्वतावर उगवलेल्या अमृत संजीव नावाच्या औषधी वनस्पतीचा वापर करून मी रामाला पुनर्जीवित करेन.” आतापर्यंत हनुमानाचे पात्र कथेत कुठेच आलेले दिसत नाही, मग हे काम कोण करते? तर रामायणातला सुग्रीव म्हणजे इथे खोतानी रामायणातला नंद हे काम करतो. तो ही वनौषधी आणायला गेला. पण, नाव विसरल्यामुळे त्याने पर्वताचे शिखरच काढून जीवकाकडे आणले. त्या वनौषधीने राम शुद्धीवर आला.
 
ज्योतिष्यांनी शोधून काढले की, दशग्रीवाचा जीव त्याच्या उजव्या पायाच्या बोटात आहे. तेव्हा रामाने त्याच्या पायावर बाण मारला आणि दशग्रीव खाली कोसळला. इथे रावणाचा वध होत नाही. तहात खूप मोठी खंडणी देण्याचे वचन तो रामाला देतो आणि सीता परत येते.
 
उत्तर रामायणही वेगळ्या पद्धतीने खोतानी रामायणात येते. राम आणि लक्ष्मणाने नंतर 100 वर्षे राज्य केले. त्यानंतर प्रजा असमाधानी असल्याचे समजल्याने राम दुःखी झाला. सीतेला लक्षात आले की, ती लोकांमध्ये चेष्टेचा विषय बनली आहे. तिने हे रामाला सांगितले आणि त्यानंतर ती धरणीमध्ये लुप्त झाली. वाल्मिकी रामायणात आणि खोतानी रामायणात साम्यापेक्षा भेदच जास्त दिसून येतात.
 
जातक आणि अवदानकथांच्या शैलीप्रमाणे, इथेही शेवटी बुद्ध आधीच्या त्यांच्या जन्मात या कथेमध्ये ते कोणती व्यक्ती होते हे सांगतात. शाक्यमुनी राम होते आणि मैत्रेय लक्ष्मण होता, असे हे रामायण आपल्याला सांगते. कथेत शेवटी दशग्रीव बुद्धांकडे आला आणि बुद्धाने धर्माचे पालन करून जगण्याचा उपदेश त्याला केला. सर्वात शेवटी बुद्ध आपल्या अनुयायांना बोधीचा शोध घेण्यास सांगतात आणि इथे हे रामायण संपते. या रामायणाची भाषा खोतानी आहे, फार 
 
 
अलंकारिक भाषा वापरलेली नाही. खोतानी रामायणातील काही व्यक्तिरेखांची नावे, बृहत्तर भारतातील रामायणांमध्ये येणार्‍या नावांपेक्षा खूपच वेगळी आहेत. लक्ष्मणासाठी ‘ऋषम’, ‘ऋष्म’, ‘रैष्म’ अशी नावे येतात. तिबेटी किंवा चिनी रामायणातील ‘लक्शन’, ‘लो-मन्’ या नावांचे ‘लक्ष्मण’ या नावाशी थोडे तरी साम्य आहे. तेवढे साम्य ‘ऋष्म’ नावाशी दाखवता येत नाही.
 
भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरील प्रसाराबरोबरच रामकथेचाही प्रसार झाला. दक्षिणेकडे जावा प्रदेशाकडे प्रचार झालेले रामायण हे बर्‍याच अंशी वाल्मिकी रामायणावर आधारित दिसते. खोतानचे रामायण हे त्यापेक्षा खूपच वेगळे आहे. तुलना करायचीच तर तिबेटी रामायणाशी त्याचे साम्य आहे. तिबेट आणि खोतान हे प्रदेश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असल्यामुळे, हे साम्य अगदी साहजिकच म्हणावे लागेल. मात्र, दशरथ आणि परशुराम यांची कथा तिबेटमध्ये आढळत नाही. अद्भुत रामायण, जैन रामायणाप्रमाणेच, तिबेटी आणि खोतानी रामायणात सीता रावणाची मुलगी आहे. लक्ष्मणरेखेची जागा जादूच्या मंडलाने घेतलेली दिसते. असे मंडल मलेशियातील रामायणातही आहे.
 
यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, वालीच्या जागी इथे ‘सुग्रीव’ हे नाव आहे आणि सुग्रीवाचे नाव ‘नंद’ असे आहे. हिमालयाकडे ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेणारासुद्धा नंदच आहे. कारण, हनुमंत या रामायणात मुळी येतच नाही. रामाने रावणाच्या उजव्या पायाच्या बोटाला बाण मारणे, हा भाग तिबेटी रामायणातही येतो. खोतानी रामायणात सुरुवातीला आणि शेवटी बौद्ध धर्माची शिकवण दिलेली आहे. तिबेटी आणि खोतानी रामायणात खूप साम्य असले, तरी त्यांचे मूळ स्रोत वेगळे असावेत. त्यांनी एकमेकांकडून उसनवारी केलेली नाही, असे विद्वान मानतात. खोतान भागातील बहुपतित्वाच्या प्रथेचा रामायणावर प्रभाव पडलेला दिसून येतो. खोतानी रामायणाचे क्वचित काही बाबतीत काश्मिरी रामायणाशीही साम्य आहे, असे दिसते.
 
या विविधरूपी रामायणांमधून एक लक्षात येते आणि आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘जोंवरि हें जग, जोंवरि भाषण, तोंवरि नूतन नित रामायण’ आहे, हे निश्चित!
डॉ. अमृता नातू
 
(लेखिका पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात साहाय्यक अभिरक्षक म्हणून कार्यरत असून रामायण-महाभारत आणि पुराणांच्या हस्तलिखितांच्या सूची प्रकल्पाच्या प्रमुख आहेत.)
9359570834
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121