जनकपुरीतील रामगाथा

    05-Apr-2025
Total Views | 21

Ramgatha from Janakpuri
रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदूर करते. त्यानिमित्ताने भानुभक्त विरचित रामायणाचा घेतलेला भावपूर्ण आढावा...
मानवजातीचा प्रवास युगानुयुगे सुरु आहे. प्रत्येक युगात आणि काळात मूलभूत मानवी चिंता सारख्याच असतात. रामायणात यावर उपाय सापडतो. रामायण म्हणजे सततचा प्रवास आहे. यात फक्त व्यक्तीचाच विचार नाही, तर कुटुंबाचा व समाजाचाही विचार व विकास आहे. रामायण हे त्यामुळेच भारतीय संस्कृतीचा मूलाधार म्हणता येईल. रामायणाने विश्वातील सर्वच प्रांतांना व धर्मांना आकर्षित केले. तिबेट, थायलंड, जपान, चीन, जावा(इंडोनेशिया) अशा वेगवेगळ्या देशांमध्ये रामाणयाची वेगवेगळी संस्करणे आढळतात. आपण आज नेपाळमधील रामायण याविषयी जाणून घेऊया.
 
तिन्ही बाजूंनी भारताच्या सीमा असलेले नेपाळ हे आशियाई राष्ट्र आहे. हिंदू व बौद्ध धर्मांच्या बाबतीत दोन्ही देशांत समानता आहे. गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी हे नेपाळमध्येच आहे, तर निर्वाणस्थान कुशीनगर हे भारतात आहे.
 
‘रामायण सर्किट योजना’ दोन्ही देशांतील सांस्कृतिक व धार्मिक संबंधांचे प्रतीक आहे. यामध्ये नेपाळच्या जनकपूरला अयोध्येबरोबर जोडले जाते. जनकपूर मध्य नेपाळमध्ये स्थित आहे, जेथे सीतेचा जन्म झाला. रामधुनी नावाचे गाव तेथून 32 किमी आहे, जेथे विश्वामित्र रामास घेऊन गेले होते. याच ठिकाणी रामचंद्रांनी विद्यार्जन केले आणि विश्वमित्रांच्या यज्ञाचेही रक्षण केले. त्या यज्ञस्थळातून सतत धूर निघत असतो, म्हणूनच त्याला ‘रामधुनी’ असे म्हणतात.
 
जनकपूर रामाची सासुरवाडी म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे राम आणि सीता यांचा विवाह झाला. जनकपुरीपासून 14 किमीवर ‘उत्तर धनुषा’ नावाचे स्थान आहे. येथे रामाने शिवधनुष्य भंग केले. भारत, नेपाळ हे दोन्ही देश श्रीरामास दुवा मानतात. याच मुद्द्यावर दोन्ही देशातील पर्यटन क्षेत्रे एकत्रदेखील येऊ पाहात आहेत. दोन्ही देशांतील जनतेची आस्था श्रीरामाच्या ठिकाणी आजही केंद्रित आहे. रामाच्या जीवनातील घटना जेथे घडल्या, ती ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. नेपाळमध्ये धनुषा पहाड, बावनबीघा क्षेत्र, माँ जानकी जन्मस्थळ मंदिर, श्रीराम विवाहस्थळ येथेही रेल्वेचे जाळे विस्तारले जाणार आहे.
एवढेच नाही तर नेपाळच्या राष्ट्रीय चिन्हावर रामायणातील एक श्लोकदेखील लिहिला आहे -
 
‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी।’
 
प्राचीन भारतात नेपाळ वेगळे राष्ट्र नव्हते. त्यामुळे नेपाळच्या राष्ट्रीय नेपाळी भाषेवर संस्कृतबरोबरच, अन्य भारतीय भाषांचा प्रभावही स्पष्टपणे दिसून येतो. नेपाळी भाषेची लिपीदेखील देवनागरी आहे. 19व्या शतकातील नेपाळी साहित्यात, सुंदरानंदकृत अध्यात्म रामायण व भानुभक्तांचे रामायण प्रसिद्ध आहे. त्यामुळे संस्कृत साहित्य व संस्कृतीचा प्रभाव नेपाळवर प्रकर्षाने दिसून येतो. नेपाळची राजभाषा संस्कृतच होती. हळूहळू संस्कृत जाऊन, नेपाळी राजभाषा झाली. भानुभक्त संस्कृत विद्वान होते. त्यांनी अनेक संस्कृत रचनाही केल्या. परंतु, ‘नेपाळी भाषेचे आद्य कवी’ असा गौरव त्यांना प्राप्त झाला; कारण त्यांनी लिहिलेले नेपाळी भानुभक्तकृत रामायण होय. नेपाळी रामायणात भानुभक्तांनी, ‘शार्दुलविक्रीडित’ या संस्कृत छंदाचा वापर जास्त केला आहे. याशिवाय ‘मालिनी’, ‘इंद्रवज्रा’, ‘शिखरणी’, ‘वसंततिलका’ हे संस्कृत छंदही वापरले आहेत, ज्यांचा नेपाळी भाषेत पूर्वी वापर होत नव्हता.
 
भानुभक्तकृत रामायण
 
पहिले नेपाळी महाकाव्य म्हणजे, भानुभक्त लिखित रामायण होय. नेपाळी आदिकवी भानुभक्त आचार्य यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषेत भाषांतर केले. 1887 मध्ये त्यांच्या मरणोत्तर या महाकाव्याचे प्रकाशन झाले. महाकाव्याच्या गद्यशैलीला ‘भानुभक्तीय लय’ असे म्हणतात. भानुभक्त रामायण थोड्याफार फरकाने वाल्मिकी रामायणाचेच भाषांतर आहे. तसेच अध्यात्म रामायणाचाही आधार भानुभक्तांनी घेतला आहे. भानुभक्त रामायणात बाल, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध व उत्तर कांड सात कांडे आहेत.
 
रामगीता : भानुभक्त आजारी असताना, त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचे पुत्र रामकंठ यांनी ‘रामगीता’ लिहिली. ही भानुभक्तकृत रामायणात उत्तर कांडात सांगितली गेली. लक्ष्मणाद्वारा विचारलेल्या प्रश्नांना, रामाने उत्तरे दिली आहेत. तीच उत्तरे ‘रामगीता’ नावाने प्रसिद्ध आहेत. यामध्ये रामाने भक्तियोगाचे महत्त्व सांगितले आहे. वैराग्य, ज्ञान, गुण आणि नीती यांविषयी रामगीतेमध्ये सविस्तर वर्णन केले आहे. संसाररूपी भवसागर पार करण्याची इच्छा असलेल्यांना, रामगीता अत्यंत उपयोगी आहे.
 
लक्ष्मणाने रामास ‘सर्वांत मोठे विष कोणते’ असा प्रश्न केला. तेव्हा रामाने ‘ब्रह्मस्व हे महान विष आहे’ असे सांगितले. येथे ‘ब्रह्मस्व’ म्हणजे देह-बुद्धी असताना, स्वतःला ब्रह्मस्वरूप समजणे आणि तसेच वागणे हे मोठे विष आहे, असे रामाने सांगितले. म्हणजेच अज्ञान हेच सर्व दुःखाचे कारण आहे. पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय व मन यांना जिंकून गुरू समोर जावे व गुरूसेवेने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे.
 
आता लक्षात येतेच की, जीव शुद्ध व निर्मळ आहे. स्थूल शरीरामध्ये असल्याने सद्गुण आदींनी युक्त असतो. तो वेगळा आहे, हे समजल्यावर मुक्ती प्राप्त होते. आपल्या मनाच्या इच्छा, आनंद आदि गोष्टी यांचा आत्मा साक्ष बनून आहे. तो या सर्वांमध्ये व्याप्त आहे, परंतु वेगळा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जसे की, लोखंड तापते, तेव्हा अग्नी सर्व लोखंड भरून असतो. हे सर्व लोखंड गरम असते, पण लोखंड म्हणजे अग्नी नाही, हे समजते. तसेच देह म्हणजे आत्मा नाही, हे जाणून घ्यावे. रामगीतेत रामाने अशा प्रकारे लक्ष्मणास उपदेश केला. परमेश्वराच्या सगुण किंवा निर्गुण रूपात शरण जाऊन, आत्मज्ञान जाणून घ्यावे आणि जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्ती मिळवावी, असे रामगीता सांगते.
 
आतापर्यंत आपण भानुभक्तकृत रामायणातील कथाभाग बघितला. त्यातील उत्तर कांडातील,अध्यात्मपर रामगीतेतील उपदेश बघितला. यावरून असे लक्षात येते की, नेपाळमध्ये रामायण भारताप्रमाणेच प्रसिद्ध आहे. सीतेची जन्मभूमी जनकपूर नेपाळ येथे असल्याने, ते रामभक्तीचे केंद्र आहे. संजीवन बुटी आणताना हनुमानाने, हनुमंते नदीकाठी विश्राम घेतला असे मानले जाते. येथे रामघाट व हनुमान घाट आहे. 

भानुभक्त कृत रामायणाची वैशिष्ट्ये : नेपाळी रामकथेत कश्यप ऋषी व आदिती यांनी परमेश्वरास पुत्ररूपात इच्छिले होते. म्हणून दशरथ व कौसल्या रूपात ते पृथ्वीवर येतात. रामाकडून अहिल्या शाप मुक्तता, सरस्वतीद्वारा कैकयी - मंथरा मनपरिवर्तन, लक्ष्मण-निषाद दार्शनिक संवाद आदि प्रसंग, नेपाळी रामायणात आले आहेत. जे तुलसीदासकृत ‘रामचरितमानस’मधील प्रसंगाशी समानता दाखवतात. रावण वधावेळी रावणाचे नाभीत अमृत आहे, हा प्रसंग नेपाळी रामायणात नाभीतील अमृताला सुकवून रावणास मारले, अशा प्रकारे वर्णिला आहे.
 
फेर अम्रित पनि नाभि मा छ तब यो मदैं काट्य पनि।
 
नेपाळी रामायणात रामकथेबरोबरच दार्शनिक विचारही आहेत. नेपाळी रामायणातील व्यक्तिरेखा, ब्रह्मत्वाच्या आसपास दाखविल्या आहेत. यांच्यामध्ये उद्वेग दिसत नाही. रामाला स्वतःलादेखील आपण अवतार पुरुष आहोत, पृथ्वीवरील पापाचा भार कमी करण्यासाठी आलो आहोत, हे माहीत आहे असे दर्शवतो. तो आपल्या ब्रह्मत्वाचा परिचय सीता व लक्ष्मणाला स्वतः देतो. कौसल्या आई असून, रामास नमस्कार करून विनंती करते.
 
आइन पाऊ परिन् फेर् विनति पनि गरिन् राम जी का चरण मा।
 
यज्ञाची रक्षा केल्यावर विश्वामित्रदेखील आदराने व भक्तीने रामासमोर येतात, असे दाखवले आहे. भानुभक्तकृत रामायणामुळे भारत नेपाळ राजनैतिकदृष्ट्या वेगळे असले, तरी सांस्कृतिकदृष्ट्या एक आहेत. नेपाळी रामायणात हिंदू संस्कृतीचे वर्णन केले आहे. जन्मल्यापासून होणार्‍या नामकरण, विवाहादि संस्कारांचे वर्णन करून, पारिवारिक संबंध सांगितले आहेत. सेतू बांधताना श्रीराम शिवलिंगाची स्थापना करतात. त्यासाठीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, काशीवरून गंगाजल रामेश्वर येथे आणले जाते. याचा उल्लेखही नेपाळी रामायणात आहे. यावरून उत्तर व दक्षिण देशातील तीर्थाटन संस्कृती ही सांस्कृतिक एकतेचा परिपाठ घालते.
भानुभक्तांनी रामराज्याचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.
 
राजा श्री रघुनाथ हुंदा पृथिवीमा शस्यादि खूपै बढ्यो।
 
पृथ्वी पिकाने समृद्ध होती, फुलांमध्ये सुगंध वाढला होता, विधवा विलाप नव्हता, रोगव्याधी नव्हती, अकाली मृत्यू नव्हता, सर्व धर्मांचे पालन करत होते, असे रामराज्य होते. भानुभक्ताने नेपाळी रामायणात भक्तिमार्ग सांगितला आहे. बिभीषण रामाच्या चरणी निष्काम भक्ती मागतो. भक्तीमध्ये वर्णभेद मिटवला गेला आहे. भानुभक्त शबरी हीन कुलीन व स्त्री असूनही रामाची भक्त आहे, हे दाखवतात.
 
भानुभक्तकृत रामायण अशा प्रकारे मनाचे, भावनांचे प्रकटीकरण करणारे आहे. येथे रामकथेबरोबर आध्यात्मिक उन्नतीही सांगितली आहे. कवीने समाजाची जडणघडण आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीद्वारे करताना, सामाजिक समानतेचेही भान काव्य लिहिताना ठेवले आहे. सर्वच दृष्टीने कालजयी असलेल्या रामायणास, सर्वसामान्य नेपाळवासीयांना भानुभक्त आचार्यांमुळे समजून घेता येते. त्यांनी नेपाळच्या जनतेस केंद्रस्थानी ठेवून, रामायण रचले. त्यामुळेच भारत-नेपाळ सांस्कृतिकदृष्ट्या एक झाले आहेत. रोजगार, व्यापार, शिक्षण आदी गोष्टींसाठी एकमेकांच्या देशात जाण्यास मुक्त आहेत. अशा प्रकारचे सांस्कृतिक, सामाजिक एकता निर्माण करणारे काव्य म्हणजेच, रामायण आणि त्याचे नेपाळी भाषांतर भानुभक्तकृत रामायण असे म्हणता येईल.
 
डॉ. वैशाली काळे-गलांडे

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ व एम.ए.संस्कृत असून, भारतीय ज्ञानप्रणालीच्या अभ्यासक आहेत.)
9420456918
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121