हिंद महासागरातील श्रीलंका हे केवळ एक निसर्गरम्य द्वीपराष्ट्र नाही, तर भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेले महत्त्वपूर्ण पौराणिक स्थळसुद्धा आहे. रामायणात प्रसिद्ध असलेली ही सोन्याची लंका म्हणजेच रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेत आजही रामायणकालीन स्थळे जसे की अशोकवन, केलानिया बिभीषण मंदिर, रामसेतू आणि दिवूरुमवेला अस्तित्वात आहेत. रामायणातील प्रसंग तिथे जिवंत वाटतात. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक स्थळे आणि श्रद्धेचा संगम असलेले ही भूमी भारतीयांसाठी केवळ एक पर्यटनस्थळ नसून, एक भावनिक नाते जपणारे पवित्र स्थळदेखील आहे. अशा या श्रीलंकेच्या मातीतील रामयणाच्या पाऊलखुणांचाघेतलेला हा मागोवा...
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥
रामायणात श्रीलंकेचा उल्लेख अनेकवेळा येतो. तसा येणे अपरिहार्यही आहे. मुळात ही नगरी कुबेराची होती. रावण हा त्याचा सावत्र भाऊ होता. त्याने पराक्रमाच्या बळावर त्या नगरीवर आपले आधिपत्य निर्माण केले व कुबेराला हाकलून लावले. पुढे कुबेराने हिमालयाच्या कुशीत, अलकापुरी नामक नगरी निर्माण केली व रावणापासून सुरक्षित अंतर राखले.
श्रीलंकेचा इतिहास खरेतर रामायण काळापासून सुरु होतो; तथापि कालौघात इतिहासाची अनेक पृष्ठे गहाळ झाल्यामुळे सहसा सनपूर्व काळापासून चालू होतो असे मानले जाते. ‘चूलवंश’, ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या पाली भाषेत लिहिलेल्या तीन ग्रंथांमुळे, श्रीलंकेचा इतिहास समजायला मदत होते. ओडिशाच्या राजघराण्यापासून ते तामिळ राजांच्या आक्रमणापर्यंत श्रीलंकेचा रोचक इतिहास आहे. त्यामुळे पूर्वी हा एक प्रकारे भारताचाच भाग होता, हे समजून येते. स्वामी विवेकानंद अमेरिकेहून परतताना, अनुराधापूर येथे उतरले होते. तेथे त्यांची भव्य मिरवणूक निघाली होती, हे आजच्या लंकन नागरिकांना ठावूक नाही. कारण, ते मुळी शिकवलेच जात नाही.
1505 साली पोर्तुगीजांचे पांढरे पाऊल श्रीलंकेत पडले. 1616 साली डच शिरले आणि 1795 साली इंग्रज घुसले. सर्वांनी यथेच्छ लंकालूट केली. इंग्रजांनी तर पुढे भारत तोडून, तो देश नवा म्हणून निर्माण केला. त्यांनी चहा व रबर शेतीत काम करायला तामिळ मजूर हे तत्कालीन मद्रास प्रांतातून पकडून आणले. आता मूळ राजघराण्यातील तामिळ आणि मजूर तामिळ असे दोन वर्ग तिथे तयार झाले. या मजुरांनी बांधलेले मंदिर आजही तिथे उभे आहे, अन्यथा मोठे गोपूर असलेले मंदिर येथे पाहायला मिळणेच कठीण!
बिभीषण वाड्यात बुद्धमंदिर
केलानिया येथे खूप विशाल प्रांगण असलेले आणि सुवर्ण मूर्ती असलेले बुद्ध मंदिर आहे. त्याच आवारात बिभीषण मंदिर आहे. इतकेच नव्हे, तर विशाल बुद्ध मंदिराच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर बिभीषण राज्याभिषेक प्रसंगाचे शिल्प कोरले आहे. यावरून नंतर, बहुधा बिभीषण वाड्याच्या त्या स्थानावर बुद्धमंदिर बांधले गेल्याचे स्पष्ट होते. प्रांगणात एक मोठा स्तूप आहे आणि बोधिवृक्षाच्या समोर नवग्रह मंदिरदेखील आहे. गयेतील बोधिवृक्षाची फांदी तिथे अशोक कन्येने लावल्याचे मानले जाते. आजही त्या वृक्षाला पाणी घालण्यासाठी लोक श्रद्धेने रांग लावतात. भूतकालीन बुद्ध आणि भविष्यबुद्धाच्या दोन पूर्णाकृती मूर्ती जवळच आहेत. गंमत म्हणजे, आभूषणांनी सजलेल्या या मूर्तींच्या गळ्यात, ठळकपणे यज्ञोपवीत दिसते.
येथे बिभीषण हा ‘विभूषण’ या नावाने प्रसिद्ध आहे. आजही त्याला लंकेची रक्षक देवता मानतात. दर पौर्णिमेला तो आकाशातून चक्कर मारून, लंकेचे रक्षण करीत असल्याची मान्यता आहे. मंदिरात मूर्ती दिसत नाही. लंकेतील बहुतेक हिंदू मंदिरांत अशीच गत आहे. मूर्तीसमोरून पडदा सोडलेला असतो. भक्तांचे अर्पण हे एका ताटलीत घेऊन, पुजारी पडद्यामागे अदृष्य होतात व लगेच परततात. पडद्यावर ती देवता रंगवलेली असते. तिला बघणे हेच दर्शन. अर्थात, काही मोठ्या मंदिरात मात्र मूर्तिदर्शन होते.
मागील जनगणनेनुसार, श्रीलंकेची लोकसंख्या दोन कोटी, एक लाख इतकी आहे. तिथे एकूण सात प्रांत आहेत. एकूण 64 टक्के बौद्ध, 18 टक्के हिंदू, नऊ टक्के मुस्लीम व सात टक्के ख्रिस्ती आहेत. सिंहली भाषकांचे तिथे वर्चस्व आहे. बौद्ध देश असल्याने प्रत्येक पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते. वर्षात प्रत्येकी तीन-तीन बौद्ध, हिंदू व मुस्लीम सणांना सुट्टी असते. फिरताना गावोगावी चौकात वा रस्त्याच्या कडेला बुद्धमूर्ती दिसतात.
राम्बोडाजवळ हनुमान मंदिर
राम्बोडाच्या जवळ असलेल्या टेकडीवर हनुमान मंदिर आहे. काळ्या घडीव दगडात हनुमंताची देखणी उभी मूर्ती आहे. लंकेत प्रथम त्या स्थळी ते उतरले असे सांगतात. त्यासमोर असलेला पर्वतमाथा पाहिला, तर हनुमंत हात छातीवर घेऊन प्रणाम केल्याच्या अवस्थेत पाठीवर निजले आहेत, असे दिसते. अर्थात, ढग असल्यास फोटो चांगला येईलच असे नाही! सध्या या मंदिराची व्यवस्था ‘चिन्मय मिशन’कडे असल्याचे कळते.
नुवारा एलिया कोलंबोमार्गे अविसावेला, कावेरीनवेला (येथील नदी कावेरी गंगा), याटियानटोटा (टोटा म्हणजे इस्टेट-इथून दुतर्फा चहामळे व रबर लागवड दिसते). तिथून हॅटन, तळवाकल्ले, नानुओया (हिल रेल्वे स्टेशन) मार्गे नुवारा एलियाला पोहोचता येते. हिल स्टेशन असल्याने तिथे मस्त गारवा असतो. डोंगराळ भागातील वळणे, हिमालयातील रस्त्यांची आठवण करून देतात. हे शहर श्रीलंकेतील दुसर्या क्रमांकाच्या उंचीवरील डोंगरावर आहे, साडेपाच सहस्त्र फूट उंचीवर. जवळच बोटॅनिकल गार्डन आहे. रावणाने तिथे औषधी वनस्पतींची लागवड केली होती म्हणे! आता फुलझाडे, काही उंच व विशाल वृक्ष, माकडे आणि तळे दिसते. लंकेत सहसा न आढळणार्या औषधी वनस्पती या डोंगरराजींवर आढळतात. हिमालयातून संजीवनी घेऊन येताना काही वनस्पतींचे अवशेष तिथे सापडले, त्यामुळे या वनस्पती तिथे आढळतात, असे गाईड सांगतो.
सीता अम्मन टेम्पल
बोटॅनिकल गार्डनपासून जवळच सीता अम्मन टेम्पल आहे. तिथे रावणाचे अशोकवन होते, असे म्हणतात. सीता व हनुमंताची त्या स्थानी भेट झाली होती. तिथे हनुमानाची पावले दाखवली आहेत, मंदिर छान आहे. येथे मात्र मूर्ती पाहायला मिळतात व दर्शनाचा आनंद घेता येतो. येथील एक दगड अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी आणला गेला होता.
गुरुलुपुथा येथे कॅण्डीहून जाता येते. रस्ता उतरणीचा आहे. एका पुढे एक अशी तीव्र 18 वळणे हे रस्ताविशेष होय. अर्थात, हिमालयातील पर्वतीय वळणरस्ते पाहिलेल्या लोकांना याचे विशेष वाटणार नाही. तिथे मंदोदरी महाल होता, अशी मान्यता आहे. सुमारे दीड किमीचा व दगडा-मुळांचा अगदी कच्चा रस्ता असून, जवळपास 800 फुटांचा तीव्र उतार आहे. तो पायी उतरावा लागतो. खाली दोन चौथरे आहेत, त्यांना ‘महाल’ संबोधतात. सीतेला आरंभी तिथे ठेवल्याचे सांगतात. रावणाचे पुष्पक विमानही त्याच भागात होते, असे म्हणतात. त्या विमानावरून स्फूर्ती घेऊन ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ने आपला लोगो म्हणून मोर वापरला आहे. बाजूला काही विशाल वृक्ष दिसतात. रावणाकडे आणखी चार प्रकारची छोट्या आकाराची विमाने होती आणि ती ठेवण्याचे स्थानही तिथेच असल्याचे सांगितले जाते.
राम-रावण युद्धक्षेत्र
युद्धगणाव : तेथून पुढे सुमारे 25-30 किमी अंतरावर हसलका परिसरातील युद्धगणाव हा भाग राम-रावण युद्धक्षेत्राचा असल्याचे मानतात. यहंगला पर्वताचा सपाट भाग हा रावणाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घ्यायला वापरला गेला. युद्धात रामबाणामुळे लग्गला पर्वताचा कडा तुटला गेल्याचेही दाखवतात.
पोलोन्नारुवा : तामिळ राजांची आक्रमणे वाढताच, सन 922 मध्ये महिंद्र पाचवा या राजाने आपली राजधानी अनुराधापूरहून पोलोन्नारुवा येथे हलवली. हा भाग सुपीक आहे. उत्तरेला महाओया नदी वाहते. 12व्या शतकात पराक्रमबाहु या राजाच्या काळात या भागाची भरभराट झाली. त्याने एक मोठे सरोवर बांधले व शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल, याची सोय केली. त्याचा पुतळा पाहून एखाद्या ऋषींची आठवण होते. खरे तर तो पुतळा एखाद्या ऋषींचाच असावा. कारण, त्याच्या हाती भूर्जपत्रे असल्याचे दिसते. अगस्ती की रावणपिता विश्रवांचा अथवा अन्य कोणा ऋषींचा याचा शोध घ्यायला हवा.
येथे सातमजली आणि एक हजार खोल्यांचा विशाल राजवाडा होता. तो हिंदू आक्रमकांनी जाळला व त्या भागाची लूट केल्याची लोणकढी थाप तेथील संग्रहालयातील गाईड मारतो. त्याला म्हटले, “राज्य करणारे असे का करतील? आणि हा विध्वंस केवळ मुस्लीम व ख्रिस्ती आक्रमकांनी जगभर केला. हिंदू विध्वंसक असते, तर आज भारतात स्तूप व बुद्धमूर्ती राहिल्या नसत्या. या उलट तुमच्याकडे भग्न हिंदू मंदिरे दिसतात, त्याचे काय? अगदी या क्षेत्रातही भग्न विष्णुमंदिर, शिवमंदिर व मूर्ती नसलेले पण, सीता मंदिर म्हणून संबोधले जाणारे छोटे मंदिर दिसते.” यावर त्या पोपटांकडे उत्तर नसते. राजवाड्याचा परिसर छान आहे. बाजारपेठ आदी गोष्टीचे अवशेष जपले आहेत.
सीतेच्या अग्निपरीक्षेचे स्थान
नुवारा एलियाहून निघून आपण दिवूरुमवेला येथे पोहोचतो. सीतेने अग्निपरीक्षा दिली ते स्थान इथे दाखवले जाते. अर्थात, श्रीलंकेतील बहुतेक हिंदू स्थानांवर बौद्ध कब्जा व पगडा दिसतो. बहुतेक मुख्य हिंदू मंदिराच्या जागी बुद्ध येऊन गेले वा जेवले अथवा झोपले, अशा कथा सांगून भव्य स्तूप असल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात गौतम बुद्ध हे लंकेत येऊन गेल्याची नोंद इतिहासात कोठेही आढळत नाही. त्यामुळे येथील रामायण सोसायटीला काम करणे व रामायण संबंधित स्थाने दाखवणे नक्कीच जिकिरीचे आहे.
इथे एका आम्रवृक्षात कोरलेली हनुमान मूर्ती आहे. पुढे एका छोट्याशा खोलीत सीतेची मूर्ती आहे. बाजूला भित्तिचित्रे आहेत. खोलीच्या मागे एक स्तूप आहे. तिथे म्हणे, सीतेचे अलंकार पुरून ठेवले आहेत. लंकेत असताना तिच्याकडे कोणतेही अलंकार असल्याचे वर्णन वाल्मिकी रामायणात नाही. दर्शनी मंदिरात सर्वत्र केवळ बुद्धमूर्ती दिसतात. भित्तिचित्रात मध्येच टिळा वा गंध नसलेले राम-सीता दिसतात. एका चित्रात चक्क लंकादहन दिसते. बाकीची दोन मंदिरे बंद असतात. कारण, ती हिंदू आहेत. तेथील गाईडला वारंवार सांगितल्यावर त्याने ती उघडून दिली. आत बव्हंशी चित्रे आहेत, मूर्ती आहेत त्या चटकन ओळखता येत नाहीत.
दोवा येथे राजमहा विहाराया आहे. तेथील गुंफेला मात्र ‘रावण गुंफा’ का म्हणतात कुणास ठावूक! आत सर्वत्र मूर्ती व भित्तिचित्रे बुद्धांची आहेत. गुहेतच दोन मंदिरे दाखवली जातात. चक्क दोन कपाटासारख्या जागा व त्यावर लटकणारी चित्रे. श्रीलंकेत मूर्तिपूजा ही मूर्तिपूजेचे विरोधक असलेल्या बुद्धांची होते. मूर्तिपूजक असलेल्या हिंदूंना चित्रे पाहून हात जोडावे लागतात. मूर्ती नसल्याने दिवा, हार वा पूजेची कोणतीही व्यवस्था नाही.
कातरगामात मंदिरे बंद, स्तूप खुले
कातरगामा : दोवाहून कातरगामाकडे जाताना, वाटेत ‘रावण यल्ला’ नामक धबधबा आहे. त्याला रावणाचे नाव का दिले आहे ते गाईडही सांगू शकला नाही. कातरगामा येथे मोठे देवालय आहे. माणेकगंगा नदी ओलांडून आपण गावात शिरतो. डावीकडे विष्णु, कार्तिकेय मंदिरे म्हणजे चित्रे आहेत आणि तिथेही बुद्धांचा मात्र मोठा पुतळा आहे. अर्थात, लंकेत गावोगावी अशा भव्य मूर्ती दिसत राहतात. कातरगामामधील मंदिरे मात्र बंद होती. पहाटे 4.30, सकाळी 10.30 व सायं. 6.30 वाजता फक्त उघडून पूजा करून, बंद केली जातात. त्या जवळील स्तूप व बुद्धमंदिर मात्र दिवसभर खुले असते. तिथे जाफनावासी तामिळ भेटला. ‘आमच्या इथे तुम्हाला मूर्ती दिसतील, बाकी ठिकाणी कमीच दिसतील,’ असे सूचक बोलला.
जाफन्यातील प्राचीन ठेवा नष्ट
जाफना हा श्रीलंकेतील हिंदूबहुल भाग. अशावेळी हिंदू पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी असलेल्या रामखुणा त्यांनी जपायला हव्यात. जाफनातील जुन्या व मोठ्या वाचनालयात, सिंहली भाषेतील ‘सीताहरण’ या रामकथेची प्राचीन प्रत होती. अयोध्या ते लंका हा राममार्ग दर्शवणारा एक नकाशादेखील होता. सिंहली बौद्धांनी तामिळींसोबत झालेल्या संघर्षात वाचनालयाची वास्तू भस्मसात केली. एक प्राचीन ठेवा नष्ट झाला. अल्पसंख्य तामिळींवर सतत होणार्या अत्याचार व दुर्लक्षामुळे, प्रभाकरनला मोकळे रान मिळाले. तीन दशके चाललेल्या या संघर्षात श्रीलंका धगधगत होती. प्रभाकरनच्या अंतानंतर आता थोडी शांतता दिसते. दुसरी भाषा म्हणून तामिळला मानही मिळाला. पण, यात तामिळी हिंदूंचे भरपूर नुकसान झाले.
गालकडून कोलंबोकडे येताना मार्गात एक मंगळ मंदिर आहे. ते समुद्रात एका अत्यंत छोट्या जमीन तुकड्यावर आहे. मंदिराशिवाय तिथे छोटासा कूप आहे. चहूबाजूने समुद्राने वेढले असूनही कूपातील पाणी गोड आहे.
तीन दिशांना शिवमंदिरे
लंकेच्या तीन दिशांना रावणाने बांधलेली शिवमंदिरे आहेत. तसेच, दोन दिशांना राहू व केतू यांची मंदिरे आहेत. शनीला त्याने सिंहासनाखाली, त्याची दृष्टी पडू नये, म्हणून पालथे घातले होते. त्या शनीचे मंदिरही आहे. कोलंबोत एक मोठे हनुमान मंदिर आहे. जाफना भागात म्हणजे हिंदूबहुल भागात मंदिरे व मूर्ती दिसतात.
आम्हांला मात्र दोन्ही यात्रेत तेथील सर्व तारांकित हॉटेल्सनी ‘अपरिचित रामायण’ कथन करण्यासाठी हॉल्स, लॉन्स, लॉबीज आनंदाने उपलब्ध करून दिले. एकूण बौद्ध असलेल्या श्रीलंकेला राम धरवत नाही आणि बहुसंख्य हिंदू पर्यटकांमुळे राम सोडवतही नाही, अशी अवस्था आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे
(लेखक हे ‘शोध श्रीलंकेचा’ या पुस्तकाचे लेखक आणि व्याख्यान-प्रवचनकार आहेत.)