हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
भारतातील व्यापारी, प्रवासी हे भारताच्या सीमा ओलांडून आशियातील विविध देशांमध्ये प्राचीन काळीच पोहोचले होते. म्हणूनच अनेक देशांमधील स्थानिक संस्कृतीवर भारतीय धर्माची आणि संस्कृतीची छाप पडलेली स्पष्ट दिसते. यामध्ये आशिया खंडातील विविध देशांचा देखील समावेश होतो. हे देश असलेल्या प्रदेशाला सामान्यपणे ‘बृहत्तर भारत’ असे म्हणावे, असे अनेक अभ्यासकांचे मत. खरे तर, ‘फुनान’ म्हणजे इंडो-चीनच्या भागात भारतीय संस्कृतीचा पहिला अविष्कार झाला, असे आपल्याला चिनी इतिहासकार सांगतात. आजच्या कंबोडिया या देशातील हा भाग आहे. ‘बीऊ-नाम्’चा आजचा चिनी उच्चार ‘फुनान’ असा होतो. हे एक हिंदू राज्य होते आणि ते मेकोंग या नदीच्या खोर्यात वसले होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौन्डीण्य नावाच्या ब्राह्मणाने हे राज्य स्थापन केले, असे चिनी नोंदीवरून समजते. तिथले स्थानिक लोक अतिशय मागासलेले होते. त्यांना कपडे घालण्यापासून सगळे कौन्डीण्याने शिकवले. तिथल्या सोमा नावाच्या स्थानिक नागवंशीय राणीशी त्याने लग्न केले. त्यानंतर तिथे भारतीय संस्कृतीचा झपाट्याने प्रसार झाला. कंबोडिया या देशात यांच्या वंशजांनी पुढे बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. त्याचा परिणाम म्हणून बयोन, ता फ्रोम, बांते श्राय आणि अतिशय भव्य असे जगातले सर्वांत मोठे मंदिर अंगकोर वाट निर्माण झाले.
बुद्ध, विष्णू, शिव, दुर्गा, लक्ष्मी, गणपती, नाग, इंद्र इ. आणि अजून अनेक भारतीय देवदेवतांची उपासना कंबोडियात लोकप्रिय होती, असे आजच्या अवशेषांवरून सहज समजते. भारतीय कला, स्थापत्य, सामाजिक रूढी, परंपरा यांचा खूप मोठा प्रभाव या देशात पाहायला मिळतो. भारतीय धर्म, पुराणकथा, कला, स्थापत्य, भाषा, लिपी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. या भारतीय संस्कृतीने प्रभावित झालेल्या देशांमधले साहित्य हे रामायण, महाभारत, हरिवंश, पुराणे, जातककथा इ. ग्रंथांवर आधारित आहे. तेथील कायदे आणि राजनीती हे मनुस्मृती, कौटिलीय अर्थशास्त्र इ. ग्रंथांवरच आधारित आहे. त्यामुळे इतक्या शेकडो वर्षांनी आजही या बृहत्तर भारतातील देशांचे सांस्कृतिक अधिष्ठान भारतीयच आहे, हे स्पष्ट दिसते.
कंबोडिया या देशातील एक अतिशय लोकप्रिय काव्य आणि त्यांचे राष्ट्रीय महाकाव्य म्हणजे ‘रिएमकेर’ म्हणजे ख्मेर भाषेतील रामायण. ‘रिएमकेर (रामकीर्ती)’ या नावाचा अर्थ म्हणजे ‘रामाचा गौरव’. या देशात रामायण नेमके कधी पोहोचले, हे जरी आपण आज खात्रीने सांगू शकत नसलो, तरी जसजसा भारतीयांचा या देशांशी संपर्क आला, तसतसा भारतीय परंपरा, साहित्य, धर्म यांचा पगडा कंबोडियातील समाजावर पडू लागला. रामायणाचा सर्वांत प्राचीन उल्लेख हा इ.स. सातव्या शतकातील व्हील कोन्टेल या ठिकाणी मिळालेल्या शिलालेखात आढळतो. हा उल्लेख अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, यामध्ये रामायणाच्या नियमित पठणाचा उल्लेख आहे. त्यामुळे जर ही रामायण पठणाची परंपरा प्रस्थापित झाली असेल, तर तिची सुरुवात बरीच आधी झाली असणार, हे उघड आहे. कंबोडियातील रामायण हे मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा थोडे वेगळे आहे. जरी यातील मुख्य पात्र तीच असली, तरी काही नवीन पात्रेसुद्धा पाहायला मिळतात. हिंदू लोकांच्या व्यापारामुळे जरी रामायण इथे आलेले असले, तरी त्यावर बौद्ध धर्माचाही प्रभाव होता असे दिसते. सध्या उपलब्ध असलेले रामायणाचे रूप हे 16व्या शतकातले आहे.
कंबोडियातील ‘रिएमकेर’ या महाकाव्याची कथा खालीलप्रमाणे आहे. याची सुरुवात रामाच्या वनवासापासून होते. त्यानंतर प्रीह रिएम (राम) आणि निएन सेदा (सीता) यांच्या विवाहाची कथा यात येते. पण, मूळ कथेतील शिवधनुष्य पेलण्याचा भाग यामध्ये न येता, फिरत्या चाकातून बाण सोडण्याचा पण जनकाने लावलेला होता, असे सांगितले आहे. रामाबरोबर निएन सेदा (सीता) आणि प्रीह लीक (लक्ष्मण) हेसुद्धा वनवासात जातात. तेव्हा त्यांची राक्षसी सूर्पनखार (शूर्पणखा) हिच्याशी भेट होते. ती सुरुवातीला रामाला मोहवण्याचा प्रयत्न करते, पण प्रीह लीक तिचे कान आणि नाक कापून टाकतो. यामुळे संतप्त होऊन बदला घेण्यासाठी सूर्पनखार तिचा दहा डोक्याचा भाऊ, राक्षसांचा तसेच लंकेचा अजिंक्य राजा क्रोंग रीप (रावण) याच्याकडे जाते आणि त्याला झालेल्या अपमानाचा बदल घ्यायला सांगते. क्रोंग रीप जेव्हा पहिल्यांदा सीतेला पाहातो, तेव्हा तो तिच्या दिव्य सौंदर्याने भारावून जातो. क्रोंग रीप स्वतःचे रूपांतर सोनेरी हरणात करतो आणि त्या तिघांच्या समोरून धावत जातो. प्रीह रिएमला कळते की, ते हरीण खरे नाही, तरीही निएन सेदाच्या आग्रहास्तव आपल्या धाकट्या भावाला पत्नीचे रक्षण करण्यास सांगून हरणाचा पाठलाग करतो.
क्रोंग रीप नंतर प्रीह रिएमचा आवाज काढतो आणि भावाला मदतीला बोलावतो. प्रीह लीकला माहीत असते की, तो त्याच्या भावाचा आवाज नाही, तरीही निएन सेदाच्या आग्रहास्तव तो प्रीह रिएमकडे जाण्यास निघतो. तथापि, निघण्यापूर्वी तो आपल्या भावाच्या पत्नीभोवती मातीमध्ये एक मंतरलेले वर्तुळ काढतो, जे कोणत्याही वाईट गोष्टीला वर्तुळात प्रवेश करण्यास प्रतिबंध करेल. क्रोंग रीप एका वृद्ध भिक्षूच्या रूपात येतो आणि निएन सेदाला वर्तुळाबाहेर पाऊल ठेवण्यास भाग पडतो, त्यानंतर तो तिचे अपहरण करतो. प्रीह रिएम आणि प्रीह लीक परत येतात आणि निएन सेदाचा खूप शोध घेतात. यादरम्यान, ते वानर राजा सुक्रीप (सुग्रीव)ला त्याचा प्रतिस्पर्धी पाली थिरात (वाली) याचा नाश करण्यास आणि त्याचे सिंहासन परत मिळवण्यास मदत करतात. याबाबत त्यांची कृतज्ञता व्यक्त करून, सुक्रीप शूर योद्धा असलेल्या हनुमानाला निएन सेदाच्या शोधात मदत करण्यासाठी प्रीह रिएम आणि प्रीह लीक यांच्याबरोबर पाठवतो. पवनपुत्र हनुमान याला असे समजते की, लंका बेटावर राक्षस क्रोंग रीपने निएन सेदा हिला कैदी बनवले आहे. तिला शोधण्यासाठी तो उड्डाण करतो.
लंका या बेटाला मुख्य भूमीशी जोडण्यासाठी हनुमान आपल्या सैनिकांना दगडांचा पूल बांधण्याचा आदेश देतो. दगड गोळा करत असताना हनुमानाच्या लक्षात येते की, जलपरी पूल बांधण्यात अडथळा आणण्याच्या हेतूने दगड चोरत आहेत. यावर तो चिडतो आणि जलपरींची राजकुमारी निएन मच्छेला पकडण्याचा निर्णय घेतो. परंतु, तो तिच्या प्रेमात पडतो. जलपरीदेखील प्रेमात पडते. पण त्यामुळे जलपरींचे सैन्य हनुमानाच्या कामात ढवळाढवळ करणे थांबवते. पूल बांधल्यावर, प्रीह रिएम आणि क्रोंग रीप एकमेकांशी लढतात. तथापि, क्रोंग रीप लवकरच बरा होतो. याचे कारण त्याला झालेली कोणतीही जखम किंवा कापलेला कोणताही अवयव पुन्हा भरून येऊ शकत असे किंवा निर्माण होऊ शकत असे. क्रोंग रीपचा एक सेनापती त्याच्या विरोधात जाऊन त्याला मारण्याचा गुप्त मार्ग उघड करतो. तो क्रोंग रीपच्या बेंबीत बाण मारायला सांगतो. नंतर ते हनुमानाच्या मदतीने ते क्रोंग रीपला मारतात.
आपल्या लढाईत विजयी होऊन प्रीह रिएम अयोध्या राजधानीत परततो आणि सिंहासनावर विराजमान होतो. दरम्यान, प्रीह रिएम संशय येतो की, त्याची पत्नी एका अतिशय दुष्ट राक्षसाच्या ताब्यात होती. त्यामुळे तिने व्यभिचार केला असावा. एकदा तिच्या दासीच्या आग्रहास्तव, निएन सेदा क्रोंग रीपचे चित्र काढते. त्यानंतर अनपेक्षित घटना घडल्यामुळे आणि प्रीह रिएम तिच्यावर अजूनच संशय घेऊ लागेल, या विचाराने ती ते चित्र गादीच्या खाली लपवते. दरम्यान क्रोंग रीपची शक्ती चित्रापर्यंत पोहोचते आणि त्या रात्री त्यातून काटे उगवतात. त्या गाडीवर झोपलेल्या प्रीह रिएम याला ते गादीतून टोचतात. नीट शोधल्यावर त्याला ते चित्र सापडते. त्याला खात्री पटते की, त्याच्या पत्नीने क्रोंग रीपच्या सततच्या प्रयत्नांना बळी पडून अनेक वर्षे कैदेत असताना त्याच्याशी संबंध ठेवले. खरे तर, निएन सेदा हिने क्रोंग रीपच्या सर्व प्रयत्नांना विरोध केला होता. क्रोंग रीपने एकदा तिच्या पतीचे रूप घेतले होते. पण, तरीही फक्त त्याच्या वासाने त्याचे कपट उघडे झाले होते.
या सर्व घटनेनंतर प्रीह रिएम आपल्या पत्नीला शुद्ध असल्याचे सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडतो. निएन सेदा परीक्षेत उत्तीर्ण होते. तथापि, तिला आपल्या पतीच्या तिच्यावरील अविश्वासामुळे खूप वाईट वाटते. ती त्याला सोडून निघून जाते आणि वाल्मिकी ऋषींकडे आश्रय घेते. तिथे ती जुळ्या मुलांना जन्म देते. पुढे त्या जुळ्या मुलांची त्यांच्या वडिलांशी भेट होते आणि ते कोण आहेत? हे त्याला लगेच कळते आणि तो त्यांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो.
अशा प्रकारे ‘रिएमकेर’मधली मुख्य कथा जरी वाल्मिकी रामायणावर आधरित असली, तरी यामध्ये स्थानिक परंपरेनुसार बरेच बदलही केलेले दिसतात. काही नवीन पात्रे आलेली दिसतात. उदा. क्रोंग रीप म्हणजे रावणाची मुलगी सुवन्नमच्छां ही समुद्रात राहणारी एक जलपरी दाखवली आहे. ती आणि हनुमान एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि नंतर त्यांना मच्चाणु नावाचा मुलगा होतो. रामायणाच्या भारतीय परंपरेत हनुमान जरी ब्रह्मचारी असला, तरी त्याच्या घामाचा थेंब एका मगरीच्या पोटात जाऊन त्यांना मकरध्वज नावाचा मुलगा होतो, अशी कथा येते. तो अहिरावण या रावणाच्या मुलाने त्याला मोठे केले असल्याने त्याच्या नगराचा रक्षक असतो, असे सांगितले आहे. इथे त्याचे नाव थोडे बदलले आहे आणि त्याची आई मात्र जलपरी दाखवली आहे. तसेच वालीचा मुलगा अंखुत (अंगद) हासुद्धा दाखवला आहे.
कंबोडियामध्ये ‘रिएमकेर’ हे अतिशय लोकप्रिय होते आणि अजूनही आहे, याचे अनेक पुरावे आजही पाहायला मिळतात. हे महाकाव्य ज्याला ‘लाखोन’ नावाच्या ‘ख्मेर’ नृत्य नाट्य यामध्ये नेहमी सदर केले जाते. कंबोडियामधील विविध उत्सवांमध्येसुद्धा याचे सादरीकारण होते. यामधील दृश्ये ‘ख्मेर’ शैलीतील शाही राजवाड्याच्या भिंतींवर रंगवलेली आहेत. पण, पूर्वीच अंगकोर वाट आणि बांते श्रायसारख्या मंदिरांच्या भिंतींवर, अनेक शिल्पांमध्ये यातील प्रसंग कोरलेले आहेत. अंगकोर वाटमध्ये प्रीह रिएम आणि क्रोंग रीप यांचे लंकेतील युद्ध खूप सविस्तर दाखवले आहे. त्यामध्ये हनुमानाच्या खांद्यावर बसून प्रीह रिएम युद्ध करतो आहे आणि त्याच्या मागे प्रीह लीक आणि बिभीषण उभे असून, सगळीकडे सैन्य, रथ इ. पसरले असल्याचे दाखवणारा मोठा शिल्पपटही आहे. एका व्हरांड्यातील संपूर्ण भिंतच या महाकाव्यातील प्रसंग कोरण्यासाठी वापरली आहे.
वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध तर तेथील कलाकारांचा अतिशय आवडीचा प्रसंग आहे. नोम पेन्ह येथील संग्रहालयात तसेच बांते श्राय येथील मंदिरावरही हा प्रसंग अतिशय सुरेख कोरलेला आहे. नोम पेन्ह येथील या युद्धातील मूर्तींचा आकार अतिशय भव्य आहे. अशा प्रकारे हे महाकाव्य कंबोडियन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे. ताडपत्रावर या महाकाव्याच्या अनेक प्रती सापडल्या आहेत. आजही विविध प्रकारे या महाकाव्याचे दर्शन लोकसंस्कृतीमध्ये दिसते. रामायण या महाकाव्याने जनमानसावर केलेली जादू काळ, प्रदेश, धर्म, राजवटी यांच्या पलीकडे पोहोचली आहे. शेकडो वर्षे ही कहाणी जगातील अनेक देशांतील लोकांच्या मनावर राज्य करत आहे. भारतीय संस्कृतीचा हा प्रसार मूर्त आणि अमूर्त रूपात, पण कोणावरही जोर-जुलूम, जबरदस्ती न करता झालेला असल्यामुळे, तो अजूनही त्या त्या प्रदेशांत आपले पाय रोवून आहे. जगातील इतर देशांनी केलेल्या वसाहतीकरणाच्या प्रयत्नांपेक्षा भारताचे हे सांस्कृतिक वसाहतीकरण नक्कीच वेगळे आहे आणि त्यामुळेच ते शाश्वत आहे.
डॉ. मंजिरी भालेराव
(लेखिका श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे इथे सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुखपदावर कार्यरत आहेत.)