तिबेटी पर्वतरांगांमध्ये गुंजणार्या वार्याच्या सुरांत एक वेगळीच रामायणगाथा गुंफलेली आहे. येथे ‘राम’ होतो ‘रामन’, जो शौर्य आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे ‘पृथ्वीची कन्या’, जी नांगरलेल्या भूमीतून प्रकटते, ती प्रतीक आहे निर्मळतेचं. कथेच्या शेवटी धर्माचं तेज तिबेटी हिमालयाच्या शिखरांवर अखंड प्रज्वलित राहतं, अशा एका सनातन, नव्या स्वरांनी झंकारलेल्या या कथेचा घेतलेला मागोवा...
२० व्या शतकाच्या सुरुवातीला चीनच्या तुन्-हुआंगमधील ग्रंथालयातून तिबेटी रामायणाची सहा हस्तलिखिते मिळाली. येथील तिबेटच्या वर्चस्वाच्या काळात आठव्या शतकाच्या आसपास, पोथीच्या पानाच्या एका बाजूला चिनी, तर दुसर्या बाजूला प्राचीन तिबेटी भाषा आणि लिपीत लिहिलेले रामायण, असे या हस्तलिखितांचे स्वरूप आहे. याशिवाय, इंग्लंड आणि फ्रान्स येथील ग्रंथालयांमध्ये ठेवलेल्या काही हस्तलिखित अंशांमध्ये, राम-सीतेची कथा प्राचीन तिबेटी भाषेमध्ये अभ्यासकांना उपलब्ध झाली आणि तिबेटी रामायणाच्या निरनिराळ्या आयामांचा अभ्यास सुरू झाला. प्रथमतः या हस्तलिखितांची जुळणी करून, संपादित आवृत्ती सटीप भाषांतरासह प्रकाशित करण्याच्या प्रयत्न झाला. कथावस्तुची वाल्मिकी रामायणाबरोबर तुलना, ही कथा तिबेटमध्ये कशी पोहोचली, भारत आणि तिबेटमधील सांस्कृतिक देवाणघेवाण याविषयीचा अभ्यास यादरम्यान सुरू झाला.
तिबेटी रामायण हे गद्य-पद्यात्मक अशा मिश्रशैलीत लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायणापेक्षा, बौद्ध रामायणापेक्षा तसेच चिनी किंवा खोतानी रामायणांपेक्षासुद्धा ही कथा निराळी दिसते. ती थोडक्यात अशी- तिबेटी रामकथेची सुरुवात लंकापुराच्या वर्णनाने होते. राक्षसांच्या या नगरातील, यग्शकोरी नावाच्या राजाचे त्रिभुवनावर वर्चस्व होते. देव-मनुष्यांपैकी कोणीही, त्याच्याशी लढण्यास समर्थ नव्हता. देवांनी विश्रवस् आणि श्रीदेवी यांना, आपला पुत्र जन्माला घालण्याची विनंती केली. त्यांचा मुलगा या राजावर विजय प्राप्त करू शकेल, असा त्यांना विश्वास होता. विश्रवस् आणि श्रीदेवी यांच्या स्मितहास्यातून मुलाचा जन्म होतो. हा मुलगा यग्शकोरीचे अर्भक मल्हयपांत नावाचे तान्हे बाळ सोडून, त्याचा समूळ विनाश करतो.रतन नावाच्या ब्राह्मणाकडून मल्हयपांताला वडिलांचा विनाश कसा झाला, हे समजते. सूडाने पेटलेला मल्हयपांत, ब्रह्मदेवाचा पुत्र असलेल्या स्वपाशिन नावाच्या ऋषींची आराधना करतो. ऋषींना आपली कन्या मेकेसेना देऊ करतो. स्वपाशिन आणि मेकेसेना यांना दशग्रीव, अंपकर्ण आणि चिरिशन असे तीन मुलगे होतात. नावाप्रमाणेच दशग्रीवाला दहा तोंडे असतात. मल्हयपांताच्या आज्ञेवरून, तिन्ही मुले लंकापुराला जातात. देवपुत्र असणारी ही मुले, महादेवाकडून मोठी शक्ती प्राप्त करतात आणि लंकापुरातील देव, मनुष्यांचा निःपात करतात. मल्हयपांत त्यांना आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल सांगतो आणि बदला घेण्याची आज्ञा करतो.
त्रिभुवनावर विजय मिळवण्यासाठी आणि अमरत्वासाठी, त्यांनी मागितलेला वर ब्रह्मदेव नाकारतो. ते महादेवाकडे जातात आणि दशग्रीवाने आपले एक मस्तक अर्पण केले, तरी अशा प्रकारची शक्ती महादेव त्यांना देत नाही. महादेवाची पत्नी उमदे त्यांना आपली शक्ती देऊ करते. ती ते स्वीकारत नाहीत आणि उमदेचा शाप त्यांच्या पदरी पडतो की, ‘एका स्त्रीमुळे त्यांचा पराभव होईल.’ त्याचप्रमाणे महादेवाचा मंत्री प्रहस्ती त्यांना आपली शक्ती देऊ इच्छितो, तीही ते नाकारतात. त्यामुळे प्रहस्तीकडून ‘माकडे तुमचा विनाश करतील,’ असा शाप त्यांना मिळतो. देवपुत्रांच्या जिभेवर बसलेल्या सरस्वतीमुळे त्यांना, बदललेल्या स्वरूपात वर मिळतो की, ‘जोपर्यंत दशग्रीवाच्या दहा तोंडांपैकी घोड्याचे तोंड कापले जात नाही, तोपर्यंत ते अमर राहतील.’ मग हे तीन देवपुत्र, सगळ्या देवांचा आणि मनुष्यांचा लंकापुरात पराभव करतात. उत्तरेच्या क्षीरसमुद्रात राहणार्या विष्णूवर दशग्रीव आक्रमण करतो. मात्र, त्याला पराभूत करू शकत नाही.
देव एकत्र येऊन दशग्रीवाला मारण्यासाठी महादेवाची मदत मागतात. परंतु, महादेव आपली असमर्थता दर्शवत, विष्णूकडे जाण्याचा सल्ला देतात. विष्णू दशरथाचा पुत्र रामन म्हणून, तर विष्णुपुत्र लग्शन म्हणून पृथ्वीवर अवतार घेण्याचे ठरवतात. देवी दशग्रीवाच्या पत्नीच्या उदरात प्रवेश करते.
जम्बूद्वीपाचा राजा दशरथ, पुत्रप्राप्तीसाठी कैलासावरील 500 अर्हतांची प्रार्थना करतो. हे अर्हत् त्याच्या पट्टराणीला एक फूल देतात. अर्धे फूल ती धाकट्या राणीला देते. धाकट्या राणीचा रामन हा मुलगा, पट्टराणीच्या लग्शनापेक्षा तीन दिवस आधी जन्मतो. इकडे दशग्रीवाला मुलगी होते आणि भविष्यसूचक शकुनांवरून ती कन्या बापाच्या विनाशाला कारणीभूत होईल, हे समजताच तिला तांब्याच्या भांड्यात ठेवून पाण्यात सोडले जाते. एका शेतकर्याला नांगरलेल्या शेतात पाटाचे पाणी देताना, ही मुलगी सापडते. म्हणून तो तिचे नाव रोल्-र्ह्नेद्-मा (नांगरणीमध्ये सापडलेली) असे ठेवतो आणि तिचा सांभाळ करतो. अशा रितीने, तिबेटी सीतेचे नाव संस्कृत ‘सीता’ या शब्दाचे हे तंतोतंत तिबेटी रूप असले, तरी काही विद्वान मात्र तिचे नाव या कथेत ‘लीलवती’ असल्याचे मानतात.
देव-दानवांच्या युद्धात जखमी झालेला दशरथ आपले राज्य कोणत्या मुलाला द्यावे, या चिंतेत असताना रामनच्या राज्यत्यागामुळे लग्शनाला दशरथाच्या मृत्यूनंतर राज्य मिळते. लग्शनाने देऊ केलेले राज्य रामन स्वीकारत नाही. शेवटी लग्शन त्याचे पादत्राण सिंहासनावर ठेवून, राज्य करू लागतो. उपवर झालेली आपली कन्या शेतकरी रामनाला देतो आणि रामन तिचा स्वीकार करतो. ‘राणी सीता’ असे त्या कन्येचे नामकरण करून, रामन राजा होतो. सिद्धीसाठी प्रयत्नशील असणार्या 500 ब्राह्मणांच्या तपामध्ये, विघ्न उत्पन्न करणार्या यग्शकोरीच्या मरुत्से नामक मंत्र्याचा एक डोळा रामन फोडतो आणि सिद्धी प्राप्त झालेले ते ब्राह्मण रामनला आशीर्वाद देतात की, “तुझ्या बाणाने मरणारा देव म्हणून पुनर्जन्म घेईल.”
प्रेमात पडलेल्या दशग्रीवाच्या बहिणीचा पुर्पलेचा स्वीकार, सीतेच्या प्रेमात असणारा रामन करत नाही. तेव्हा पुर्पला दशग्रीवाला सीतेला पळविण्याचा सल्ला देते. दशग्रीवाला परावृत्त करण्यात अपयशी ठरलेला मरुत्से, नाईलाजाने हरणाचे रूप घेऊन सीतेला भूलवितो. सीता रामनाला हरीण पकडायला सांगते. मरुत्से रामन आणि सीता यांच्यामध्ये वादळ निर्माण करून, रामनाच्या बाणाने मरता मरता लग्शनाच्या नावाने मदतीसाठी हाका मारतो. सीता लग्शनाला रामनाला मदत करण्याची विनंती करते, लग्शन ती फेटाळतो. परंतु, वारंवार विनंती केल्यावर जाताना तो तिला शाप देतो की, ‘माझ्या मनात कोणतेही पाप नसेल, तर तुम्ही पतीपत्नी एकमेकांचा एकदा तरी द्वेष कराल.’ दशग्रीव आधी हत्ती आणि मग घोड्याचे रूप घेऊन सीतेपुढे येतो. मात्र, ती त्याच्यावर स्वार होण्यास तयार होत नाही. सीतेला स्पर्श केल्यास आपण जळून जाऊ, या भीतीने दशग्रीव ती उभी असलेल्या जमिनीच्या तुकड्यासकट तिला उचलून पळवून नेतो.
तिचा शोध घेणार्या रामन आणि लग्शनाला वानरराज सुग्रीव भेटतो. घोड्याचे एक तोंड असलेल्या दहा तोंडाच्या राक्षसाने सीतेला पळवल्याचे, सुग्रीवाचे वानर सहकारी रामनाला सांगतात. रामन आणि सुग्रीव यांच्यातील मदतीच्या करारानुसार, सुग्रीवाच्या मोठ्या भावाला वालीनला रामन मारतो. यासाठी युद्ध करताना दोघांमधील फरक स्पष्ट होण्यासाठी, सुग्रीव शेपटीला आरसा बांधतो. रामन आणि सुग्रीव आपापल्या घरी परततात. रामन सुग्रीवाच्या मदतीसाठी तीन वर्षे वाट पाहतो, शेवटी बाणाच्या टोकावर सुग्रीवाला संदेश पाठवतो की, ‘तुझीही गत वालीसारखीच करतो.’ त्यानंतर सुग्रीव वानरसेना घेऊन, लगोलग मदतीला येतो आणि सीतेच्या शोधासाठी पग्शु, सिंधू आणि हनुमन्त या तीन वानरांना पाठवले जाते. रामन सीतेसाठी अंगठी आणि पत्र देतो. शोध घेणारी, तहानलेली वानरे एका भुयारात शिरून, ग्त्सुग्-र्ग्याल् स्गेग-मो या श्रीदेवीच्या मुलीला भेटतात. ती त्यांना पाद नावाच्या सूर्याच्या तेजाने पंख जळलेल्या गरुडराजापुढे पोहोचवते. पादाच्या वृत्तांत कथनातून त्यांना समजते की, सीतेला पळवून नेत असताना कसे त्याच्या वडिलांनी दशग्रीवाकडून सीतेला बाजूला खेचले. दशग्रीवाने त्यांच्यावर फेकलेले तप्त लोखंड त्यांनी गिळले आणि त्यामुळे जळून त्यांचा मृत्यू झाला. दशग्रीवाकडून सीतेचे अपहरण झाल्याचे समजताच, हनुमान लंकेकडे झेप घेतो. लंकेतील सीताभेटीचा प्रसंग, उपवनाचा विद्ध्वंस वाल्मिकी रामायणाप्रमाणेच वर्णिलेला आहे. दशग्रीव हनुमानाला, सूर्यकिरणांपासून तयार केलेल्या जादुई पाशात पकडू पाहातो, देवांच्या आज्ञेने हनुमान त्या पाशात स्वतःला अडकवून घेतो. असा ब्रह्मास्त्राला पर्याय असणारा विशेष बदल इथे दिसत असला, तरी राक्षस त्याच्या शेपटीला कापड गुंडाळून पेटवतात आणि हनुमान दशग्रीवाचा किल्ला जाळून अनेक राक्षसांना यमसदनाला पाठवतो, हा कथाभाग मुळाबरहुकूमच आहे. सीतेकडे परत येऊन, हनुमान तिच्याकडून रामनसाठी पत्र घेतो.
सेतू बांधून रामन, वानर आणि मानवी सैन्य लंकेवर चालून येते. भाऊ अंपकर्णाचा पळून जायचा सल्ला दशग्रीव मानत नाही, तेव्हा अंपकर्ण रामनला येऊन मिळतो. यानंतर झोपायचे वरदान मिळालेल्या कुंभकर्णाला उठवले जाते. तो अनेक वानर आणि माणसांना मारून टाकतो. रामन आणि हनुमंत कसेबसे वाचतात मात्र, कुंभकर्ण पुन्हा झोपी जातो. अंपकर्णाच्या सल्ल्याने कैलास पर्वतावरून ‘अमृतसंजीव’ नावाची वनस्पती आणून, हनुमंत सर्व वानर आणि माणसांना जिवंत करतो. दशग्रीवाबरोबरच्या युद्धात लग्शन मारला जातो. दशग्रीवाचा धाकटा भाऊ बिरिसन पळून जातो. दशग्रीवाला फसवून,रामन त्याला आपला तळपाय दाखवायला सांगतो. दशग्रीव तसे करण्यासाठी वाकताच, रामन त्याचे घोड्याचे शिर उडवतो आणि दशग्रीव मरतो. खाली पडता पडता तो अनेक राक्षसांना चिरडतो. रामन किल्ल्याच्या खिडकीतून आत शिरून सीतेला सोडवतो. मेलेल्या लग्शनाला जिवंत करतो. सुग्रीव आणि रामन आपापल्या राज्यात परत येतात. सुग्रीवाच्यापश्चात राजा झालेला त्याचा मंत्री हनुमंत रामनला पत्र किंवा भेटी पाठवायला विसरतो; मात्र रामनने समज दिल्यावर ते पुन्हा मित्र बनतात.
बेंबल राजाचा पाडाव करण्यासाठी रामन युद्धावर निघतो. त्यावेळी तो सीता आणि तिचा मुलगा लव यांची जबाबदारी, मलयन पर्वतावरच्या 500 ऋषींवर सोपवतो. एक दिवस मलयन पर्वतावर फिरायला निघालेली सीता, मुलाला ऋषींवर सोपवते. पण, तो तिच्या मागोमाग जातो. ऋषींना मुलगा न सापडल्याने, ते कुश गवतापासून कुश नावाचा मुलगा बनवतात. लवासह परत आलेली सीता कुशाचाही मुलगा म्हणून स्वीकार करते.
बेंबलचा पराभव करून परत येत असताना, लिच्छवी विमल आपल्या पत्नीवर करत असलेला स्वैराचाराचा आरोप रामन ऐकतो. त्यावेळी लिच्छवीची पत्नी म्हणते की, सीता तर दशग्रीवाकडे 100 वर्षे राहूनही पवित्र आहे, हे कसे शक्य आहे? स्त्रियांचे चारित्र्य कोणी समजू शकत नाही. तिच्या संभाषणावरून आणि नंतर तिच्याकडून स्त्रीचारित्र्याची सविस्तर माहिती मिळालेला रामन आपली पत्नी स्वैराचारी आहे, असे मानून तिला त्यागतो. हनुमंत रामनला दशग्रीवाला सीतेच्या जवळ येणेसुद्धा कसे अशक्य होते, ते पटवतो. शेवटी रामन, सीता आणि आपल्या दोन्ही मुलांसह आनंदाने आपल्या राज्यात राहातो आणि हनुमंत स्वतःच्या राज्यात परत जातो, अशी ही तिबेटी रामकथा आहे.
तिबेटी रामायणाचा विचार करता, तिथे येणारी नावे आणि इतर तपशील पाहता, वाल्मिकी रामायणाच्या कथावस्तूचा निराळ्या पद्धतीचा अविष्कार इथे आहे. खोतानी, चिनी आणि मलय रामकथांमधून काही अंश घेऊन, एकप्रकारे नवीनच कथा इथे सादर केली आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातील रामकथेचा प्रभावही इथे दिसतो, ज्यामध्ये रावणाच्या दहा डोक्यांपैकी, गाढवाचे डोके लक्ष्मण छाटतो, असा संदर्भ आहे. थोडक्यात, तत्कालीन तिबेटमध्ये, वेगवेगळ्या रामकथांचा प्रभाव पडून हे वेगळेच रामायण आपल्याला ऐकायला मिळते.
डॉ. शिल्पा सुमंत
(लेखिका डेक्कन कॉलेजमधील संस्कृत आणि कोशशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)
9890193222