अगस्तींपासून ते अलीपर्यंत...मालदीवमधील रामायण

    05-Apr-2025
Total Views | 13


Maldives Ramayan  
 
मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि चर्चेत आले ते मालदीव! मोदींनी भारतीय द्वीपसमूह असलेल्या लक्षद्वीपच्या पर्यटनाला प्रोत्साहन दिल्याने, तसाच समुद्रकिनारा असलेल्या शेजारी मालदीवला स्पर्धा निर्माण झाली, असे वाटून तेथील मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या विषयी अपमानास्पद ट्विट केले. सहजच भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शेवटी मालदीव सरकारने त्यांच्या तिन्ही वाचाळ मंत्र्यांना निलंबित केले. पण, भारतविरोधी वक्तव्यांचा मालदीवच्या पर्यटनावर व्हायचा तो परिणाम झाला आणि मागच्या वर्षी जवळपास निम्म्या पर्यटकांनी, मालदीवऐवजी लक्षद्वीपला पसंती दिली. हा झाला मालदीवचा वर्तमान, आता जरा या देशाचे भारताशी पुराणकाळापासून असलेले संबंध, तेथील रामायणाच्या पाऊलखुणा यांचा मागोवा घेऊया.
मालदीवमध्ये रामाचे गुरू - अगस्ती
 
हिंद महासागरात लक्षद्वीप बेटांच्या दक्षिणेला 450 मैलांवर 26 द्वीपसमूह आहेत. ही द्वीपांची एक मालाच आहे जणू. म्हणून त्यांचे नाव ‘मालाद्वीप.’ आता अपभ्रंश होऊन ‘मालदीव’ झाले. बौद्ध, ग्रीक आणि अरबी ग्रंथांमध्ये, मालदीव द्वीपसमूहाचे उल्लेख मिळतात. या मालदीवशी आपले खूप जुने नाते आहे, ज्याची मुळे पार ऋग्वेदातील अगस्त्य ऋषीपर्यंत जातात. ऋग्वेदात अगस्त्य ऋषी व त्यांची पत्नी लोपमुद्रा यांनी लिहिलेली सूक्त आहेत. त्यांनी तामिळ भाषेचे व्याकरण लिहिले, अशी तामिळनाडूमधील मान्यता. अगस्तींची ओळख आहे दोन संघांना एकत्र आणणारा आणि दोन देशांना एकत्र जोडणारा महात्मा म्हणून!
 
अगस्तींची एक पुराणकथा सांगते. त्यांनी एका आचमनात समुद्रप्राशन केला होता! एकदा देव-दानव यांचे युद्ध चालले असता, दानव समुद्रात जाऊन लपले. त्यांना शोधणे अवघड झाले, तेव्हा देव अगस्तींना त्यावर उपाय विचारायला गेले. अगस्तींनी एका आचमनात समुद्र गिळून टाकला! मग काय? दानवांचे लपणे व्यर्थ ठरले. देव-दानव युद्ध पूर्ण झाले आणि देव जिंकले! या समुद्रप्राशन कथेचा गर्भितार्थ असा की, अगस्तींनी समुद्रावर प्रभुत्व मिळवले होते. समुद्र कापण्याचे तंत्र त्यांना ठाऊक होते किंवा जहाजे समुद्रापार नेण्यात ते निष्णात होते. अनेक भारतीयांना त्यांनी जहाजातून, दक्षिण आकाशातील ‘अगस्ती’ तार्‍याच्या साहाय्याने जावा, सुमात्रा, कंबोडियाच्या प्रदेशात कसे जावे, हे शिकवले असावे. भारताला आग्नेय आशियाई देशांशी जोडणारे हे ऋषी आहेत. या देशांमध्येसुद्धा अगस्ती ऋषींना अतिशय मान आहे. येथील मंदिरां-मंदिरांमधून अगस्तींच्या मूर्ती दिसतात.
 
भारतीय लोक आग्नेय दिशेला गेले, तसेच ते नैऋत्येला मालदीवमध्ये सुद्धा पोहोचले होते. म्हणूनच मालदीववासीयांमध्येही अगस्त्य ऋषींना अतिशय मान होता. मालदीवमध्ये झालेल्या उत्खननात शिव, लक्ष्मी, कुबेर अशा अनेक देवांची चित्रांकने मिळाली आहेत. तसेच, अगस्ती ऋषींची चित्रांकने मिळाली आहेत. ती सर्व आता संग्रहालयातून पाहायला मिळतात. एका दगडी क्यूबवर अगस्ती ऋषींच्या चित्राचे अंकन दिसत आहे.
 
पुढे मालदीवमध्ये सम्राट अशोकाच्या काळात, म्हणजे इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात बौद्ध धर्माचा प्रचार झाला. येथे अनेक बौद्ध भिक्खू पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्यासाठी मोठे विहार आणि स्तूप बांधले गेले. अलीकडे केलेल्या उत्खननात येथील 50 हून अधिक बेटांवर बौद्ध स्तूपांचे व मोठमोठ्या विहारांचे अवशेष मिळाले आहेत.
 
मालदीवचे प्राचीन राजे सूर्यवंशी होते. कलिंगचा राजा ब्रह्मादित्यने आपला मुलगा सूर्यदास अरुणादित्य, याला मालदीवला पाठवले होते असे म्हटले जाते. याने आदित्य राजघराण्याची स्थापना केली. या घराण्याच्या अनेक राजांनी राज्य केल्यानंतर, सोमवंशी राजांनी इथे राज्य केले. यातील काही राजांनी लिहिलेले संस्कृत भाषेतील दानलेख उपलब्ध आहेत. त्यांची सुरुवात ‘स्वस्ति श्री सोमवंशीय अधिपती’ अशी होते. त्यामध्ये राजाची स्तुती येते. राजाच्या पूर्वजांची नावे येतात. अशा ताम्रपटांवरील लेखांतून मालदीवचा इतिहास कळतो. काहीकाळ दक्षिणेतील प्रसिद्ध चोल राजांनीसुद्धा येथे राज्य केले होते.
 
12व्या शतकात अरबी व्यापारी मालदीव बेटांवर पोहोचले. त्यानंतर इस्लाम धर्म तिथे फोफावला आणि मग तेथील हिंदू आणि बौद्ध धर्माला ओहोटी लागली. आता मालदीव पूर्णपणे सुन्नी मुस्लीम देश आहे. आताच्या मालदीवच्या लोकांना, त्यांच्या इस्लामपूर्व इतिहासाची माहिती नाही. तेथील प्राचीन हिंदू-बौद्ध संस्कृती पूर्णपणे पुसून तिथे अरबी धर्म, अरबी लिपी, अरबी भाषा, अरबी पोशाख लादले गेले आहेत.
 
मालदीवमध्ये बोलली जाणारी भाषा प्राकृतमधून तयार झालेली आहे. या भाषेचे नाव आहे ‘दिवेही बासा’ म्हणजेच ‘द्वीपाची भाषा.’ दिवेही आणि श्रीलंकेच्या सिंहली भाषेचे उत्तर भारतातील गुजराती, उडिया, मराठी यांच्याशी साधर्म्य आहे. दिवेही या मूळच्या हिंदुस्तानी भाषेत काळाच्या ओघात अरबी, इंग्रजी, पोर्तुगीज भाषांमधले शब्द आले आहेत. पूर्वी लिखाणासाठी इथे दक्षिण भारतातील जुनी पल्लव लिपी वापरली जात असे.
 
लंका - श्रीलंका की मालदीव?
 
वाल्मिकी रामायणात वर्णन केलेली ‘लंका’ नक्की कोणती, याविषयी आजही चर्चा रंगताना दिसते. दक्षिणेला असलेल्या श्रीलंका देशाचे नाव नवीन आहे 1972 मधले. त्यापूर्वी श्रीलंकेला ‘सिलोन’, ‘तंबपंनी’, ‘ताम्रपर्णी’ आणि ‘सिंहलदेश’ म्हटले जात असल्याची नोंद भारतीय, ग्रीक आणि ब्रिटिश कागदपत्रांत आहे. कैक भारतीय संस्कृत नाटकांतून, साहित्यांतून ‘सिंहलदेश’ आणि ‘लंका’ अशी दोन वेगवेगळ्या बेटांची दोन वेगवेगळी नावे नमूद केली आहेत. त्यावरून हे दोन वेगळे देश आणि दोन वेगळी बेटे असल्याचे लक्षात येते. काही रामायणांत पुष्पक विमानातून अयोध्येला परत जाताना लंका सोडून पुढे गेल्यावर राम सीतेला, ‘ते पाहा ताम्रपर्णी बेट’ असे म्हणून एक बेट दाखवतो. त्यावरून लक्षात येते की, रावणाची लंका सोडून उत्तरेला आल्यावर मग आजचे ‘श्रीलंकेचे’ बेट लागते. म्हणजे खरी लंका आजच्या श्रीलंकेच्या दक्षिणेला असावी.
 
‘वाल्मिकी रामायणा’नुसार राम आणि वानरसेना हे आग्नेय किंवा दक्षिण दिशेला (जिथे आजची श्रीलंका आहे) तिकडे गेले नाहीत, तर नैऋत्य दिशेला, जिथे मालदीव आहे त्या दिशेला गेले. तसेच, नैऋत्य ही दिशा ‘राक्षसांची दिशा’ मानली गेली आहे. ज्या दिशेला राक्षसांचे राज्य होते, रावणाचे राज्य होते, त्या नैऋत्य दिशेला मालदीव आहे.
 
आता विषुववृत्तावर, मालदीवच्या माले बेटाच्या पूर्वेला कोणतेही बेट नाही. पण, कदाचित जशी द्वारका बुडाली तसे ते बेट बुडाले असेल? त्याविषयी अधिक काही सांगता येत नाही. ‘वाल्मिकी रामायणा’तील वर्णनावरून याचा अधिक शोध घेणे आवश्यक ठरेल.
 
मालदीवमधील रामायण
 
मालदीवमध्ये रामायणाची कथा पण पोहोचली असावी. रामकथा तिथे पूर्वी माहितीत असावी. पण, आज तिथे आपल्याला माहीत आहे तसे रामायण नाही. पण, रामायणाच्या कथेशी थोडे साधर्म्य असलेली एक कथा मात्र तिथे लोकप्रिय आहे.
 
धोन हियाल आणि अली फुल्हू
 
मालदीवमध्ये एक प्राचीन लोककथा आहे, धोन हियाल आणि अली फुल्हू या जोडप्याची. ही कथा कदाचित दोन हजार वर्षे जुनी असावी. अजूनही तेथील लोकांमध्ये ही कथा गायली जाते. त्या कथेची नायिका धोन हियाल एक देखणी मुलगी. ती इतकी सुंदर होती की, कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिच्या जन्मानंतर तिचे आईवडील तिला एका तळघरात लपवून ठेवतात.
 
अली फुल्हूवर धोन हियालचे प्रेम असते. ती त्याच्यावर जादूटोणा करते. पण, तो तिला वश होत नाही. फुल्हूला स्वप्न पडते की, त्याचे लग्न धोन हियालशी होणार आहे. मग अली धोन हियाल ज्या बेटावर राहत असते तिथे जातो.
 
फुल्हूला एक होडी बांधायची असते, तेव्हा तो समुद्राच्या देवाची पूजा करतो. अनेक दिवस मंत्र म्हणत पूजा केल्यावर समुद्र देव प्रसन्न होतो. तो म्हणतो, “तुला काय हवे ते माग!” तेव्हा फुल्हूला म्हणतो, “माझा विवाह हियालशी व्हावा. होडी बांधायचे साधन मिळावे आणि मी जेव्हा जेव्हा समुद्रात होडी नेईन, तेव्हा तेव्हा समुद्र शांत असावा.”
 
मालदीवमध्ये इस्लाम धर्म आल्यावर, या कथेत बरेचसे बदल झाले. समुद्राच्या देवाच्या ऐवजी समुद्राचा ‘राजा’ झाला. वार्‍याच्या देवाच्या ऐवजी ‘वार्‍याचा राजा’ झाला. काही ठिकाणी ‘अल्ला’चा उल्लेख आला. अखेरीस हियाल आणि फुल्हूचा विवाह होतो. निळ्याशार समुद्राच्या मधोमध असलेल्या एका बेटावर, ते राहू लागतात. त्यांच्या जगावेगळ्या प्रेमाविषयी तेथील बेटांवर चर्चा होत असे! तेथील राजाला कळते की, सगळ्यात सुंदर मुलीचे, हियालचे लग्न फुल्हूशी झाले आहे. ती प्राप्त व्हावी म्हणून तो राजा हियालचे अपहरण करतो. तिला आपल्या बेटावर घेऊन जातो. एक पांढरा कावळा हे पाहत असतो. हियालला कावळ्यांची भाषा येत असते. ती कावळ्याबरोबर फुल्हूला निरोप पाठवते. फुल्हू पराक्रमाने तिला सोडवतो आणि दोघे राजापासून लपून दुसर्‍या एका बेटावर जातात. पण, शेवटी राजाला त्यांचा सुगावा लागतो. हियालला आपलेसे करण्यासाठी तो राजा त्या बेटावर दाखल होतो. तेव्हा राजाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी शेवटी हियाल समुद्रात उडी मारून आपले प्राण देते. त्यावर फुल्हूसुद्धा आपले प्राण देतो.
 
अनेकांना या कथेचे रामायणाशी साम्य दिसते. फार पूर्वी रामायणापासून सुरू होऊन त्यामध्ये बदल होत होत आताचे रूप आले आहे, असे मानले जाते. ते साम्य असे - एक दुष्ट राजा नायिकेला पळवून नेतो. सीतेचा जन्म पृथ्वीतून होतो; तसे धोन हियाला तळघरात ठेवली जाते. अली फुल्हूला हुल्हुधेलीमधून हद्दपार केले जाते; रामाला त्याच्या राज्यातून निर्वासित करून वनवासात पाठवले जाते तसे. हाव्वा फुल्हू आणि अली फुल्हू यांचे नाते शूर्पणखेच्या रामाशी असलेल्या नात्यासारखे आहे. अली फुल्हू आणि धोन हियालाची एकमेकांप्रति असलेली निष्ठा आणि प्रेम रामायणासारखे आहे. ल्हैमागु अलीने राजाला हियालाच्या सौंदर्याचे केलेले वर्णन हे शूर्पणखेने रावणापुढे केलेल्या सीतेच्या वर्णनासारखे वाटते. अली फुल्हूने राजावर केलेला प्रारंभीचा हल्ला रामाच्या पराक्रमाची आठवण करून देतो. धोन हियालला राजाच्या मागण्यांना नकार देते, जसे सीतेने रावणाशी लग्न करण्यास ठाम नकार दिला होता. या जोडप्याला मदत करणारा पांढरा कावळा जटायूची आठवण करून देतो. त्या दोघांना राम आणि सीतेप्रमाणे दैवीस्थान मालदीवमध्ये प्राप्त झाले. त्यांच्या नावाची बेटे, रस्ते मालदीवमध्ये आहेत. आजही, मालदीवच्या लोकगीतातून ही कथा गुणगुणली जाते, अमर प्रेमाची, निःस्वार्थ समर्पणाची आणि त्यांच्या धैर्याची!

दीपाली पाटवदकर


 9822455650
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121