रामायणाची विश्वयात्रा

    05-Apr-2025
Total Views | 23

Lord Shri Ram
रामायण ही केवळ कथा नाही, तर तो एक प्रवाह आहे. प्रवाह संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा. प्रभू रामचंद्रांची चरणरज भारतभूमीत पडली असली, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने आणि मर्यादेच्या मोहिनीने सारे विश्वच मोहित झाले. रामनवमीनिमित्ताने ‘रामायणाचा जागतिक वारसा’ या विशेषांकात आपण रामकथेच्या या जागतिक प्रवासाचा वेध घेत आहोत. विशेषांकात रामकथेच्या प्रवासाची सुरुवात भारताच्या सीमेलगतच्या देशांपासून केली असून, मग हा प्रवास आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतींपर्यंत कसा पोहोचला, त्याचे विविध लेखांतून विवेचन केले आहे. थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडियातील भव्य मंदिरांमध्ये, लोककथांमध्ये, नृत्यांत आणि चित्रशिल्पांमध्ये प्रकटतो आणि अखेरीस तो युरोपीय भूमीपर्यंत पोहोचतो, जिथे रामायण केवळ कथा न राहता, विचारधारेचा भाग होते. या सार्‍या आठवणींनी हा प्रवास अधिक संस्मरणीय होतो. रामायण हा केवळ परंपरांचा भाग नाही, तर मानवी मनाला जोडणारा सेतू आहे. सातासमुद्रापलीकडेही प्रभू श्रीरामांचे तेज झळाळत आहे आणि आपण त्याच्या प्रकाशात नव्याने प्रवास करत आहोत!
त्तरायण आणि दक्षिणायन हा जसा सूर्याचा आकाशातील प्रवास आहे, तसा रामायण हा सूर्यवंशी रामाचा पृथ्वीवरील प्रवास आहे. रामाने प्रसन्नतेने स्वीकारलेला आणि स्वपराक्रमाने तेजस्वी केलेला हा प्रवास आहे. साहित्यात अनेक प्रवासकथा प्रसिद्ध आहेत, जशा ‘सिंदबादच्या सात सफरी’, ‘गलीव्हर ट्रॅव्हल्स’ किंवा प्राचीन काळातील - मेसोपोटामियाची ‘गील्गामेश’ वा ग्रीसची ‘ओडेसी’. ऐतिहासिक अंश असावा असे मानल्या गेलेल्या ‘ओडेसी’मध्ये उल्लेखलेल्या गावांचा, नद्यांचा, डोंगरांचा, समुद्रांचा शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण, त्यातील प्रवासाचा मार्ग लोकांच्या स्मृतीत नाही आणि त्याच्या भौगोलिक खुणासुद्धा मिळत नाहीत.
 
रामाचा प्रवास मात्र वेगळा आहे. रामाची पाऊले जिथे जिथे लागली, तिथे तिथे त्याच्या स्मृती ताज्या आहेत, तसेच उत्खननात, स्थानमाहात्म्यात, मौखिक परंपरांत आणि साहित्यात त्या सापडतात. त्याशिवाय, जन्मस्थळ, विवाहस्थळ, भरत मिलाप मंदिर, सीताजी की गुंफा, सीताजी की रसोई, जानकी कुंड, राम घाट, लक्षमण चौकी, लक्ष्मण रेखा, नल सेतू, रामेश्वर आदि अनेक गावे, अरण्ये, नद्या, पर्वत यांच्या रुपात नेपाळपासून श्रीलंकेपर्यंत त्या प्रवासाच्या खुणा पसरल्या आहेत.
रामाने प्रवास केला, तसा त्याच्या कथेने रामायणानेसुद्धा प्रवास केला. रामायणाचा प्रवाससुद्धा सूर्यासारखा तेजस्वी आणि प्रकाशदायीच आहे. विविध देशांच्या भाषांतील रामायणामध्ये रामकथा प्रवासाच्या खुणा जिवंत आहेत. आज रामायण वेगवेगळ्या देशांत, विविध भाषांत, तेथील संस्कृती लेवून सजले आहे.
 
भारतीय लोक फार पूर्वी, आग्नेय आशियाई देशांत पोहोचले होते. त्यांच्याबरोबर रामायण, महाभारत, पुराणे, सूर्यसिद्धांत, स्थापत्यशास्त्र, रघुवंश इत्यादी अनेक ग्रंथ तिथे पोहोचले. भारतात जसे प्रत्येक भाषेत रामायण लिहिले गेले, तसेच इथेसुद्धा स्थानिक भाषांमध्ये रामायणे लिहिली गेली. लाओसमध्ये ‘फ्रा लक फ्रा लाम’, मलेशियामध्ये ‘हियाकत सेरी राम’, इंडोनेशियामध्ये ‘काकविन रामायण’, कंबोडियामध्ये ‘रामकेर्ती’, ब्रह्मदेशात ‘यामजातो’, फिलीपाईन्समध्ये ‘महारादीय लावण’ आणि थायलंडमध्ये ‘रामाकीयन’ लिहिले गेले.
 
बौद्ध धर्माबरोबरच रामकथा तिबेट, चीन, मंगोलिया आणि जपानमध्येही पोहोचली. चिनी रामकथेतील पात्रांनी चिनी नावे धारण केली आहेत. लोमो (राम), लोमन (लक्ष्मण), नालोयेन (नारायण) इत्यादी. चीनमध्ये हनुमान या ‘सुपर हिरो’च्या नवीन कथा लिहिल्या गेल्या. चीनमध्ये हनुमान लोकप्रिय झाला, तर जपानच्या रामायणात हनुमान हे पात्रच नाही! मंगोलियामध्ये पोहोचलेल्या रामायणात, लक्ष्मणाऐवजी भरतच रामाबरोबर वनवासात गेला आहे!
 
या सर्व देशांचा मुख्य धर्म बौद्ध अथवा इस्लाम असूनसुद्धा त्यांचे रामायणावर विलक्षण प्रेम आहे. रामायण हा त्यांचा सांस्कृतिक ठेवा असून तो त्यांनी जीवापाड जतन केला आहे. मध्ययुगात थायलंडमध्ये आयुथ्या (अयोध्या) नावाचे राज्य भरभराटीस आले होते. आजसुद्धा थायलंडचे राजे ‘राम’ हेच नाव धारण करतात. मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये नौसेनाधीपतीला ‘लक्ष्मण’ ही पदवी दिली जाते. कम्बोडियाचा राजा यशोवर्मा एका शिलालेखात लिहितो, माझी राजधानी रामाच्या अयोध्येसारखी आहे. दहाव्या शतकातील राजेन्द्रवर्मा हा रामासारखा प्रजावत्सल राजा होता, असेही एका शिलालेखात लिहिले आहे. रामायण हे म्यानमार आणि थायलंडचे ‘राष्ट्रीय महाकाव्य’ (National Epic) मानले जाते आणि रामाचे शब्द ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि’ हे नेपाळचे ब्रीदवाक्यच आहे.
 
रामायणाचा पश्चिमेकडचा प्रवास 15व्या-16व्या शतकात सुरू झाला. मुघल सम्राट अकबराने रामायणाचा फारसी भाषेत अनुवाद केला, तेव्हापासून 19व्या शतकापर्यंत फारसी भाषेमध्ये रामायणाचे 90हून अधिक अनुवाद केले गेले. जहांगीरने काशीमध्ये 12 वर्षे संस्कृत शिकलेल्या मुल्ला साद उल्लाहकडून, एक अनुवाद करवून घेतला. ‘दास्तान-ए-राम-ओ-सीता’दारा शिकोहने ‘योग वसिष्ठ’चे फारसीमध्ये ‘जुग-बसिष्ठ’चे भाषांतर करवले. हा ग्रंथ पर्शियामध्ये लोकप्रिय ठरला.
 
वास्को-द-गामाकडून भारतात येण्याचा समुद्री मार्ग मिळाल्यावर, युरोपीय प्रवाशांनी त्यातही विशेष करून जेसुईट मिशनरींनी रामकथेची भाषांतरे केली. डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश आदी भाषांमध्ये अनेक रामकथा लिहिल्या गेल्या. रामाची कथा एकदा सांगून, एकदा लिहून तहान भागत नाही. युरोपमधील लेखक अजूनही रामाची कथा लिहीत आहेत. 2016 मध्ये अमेरिकेच्या रोबर्ट गोल्ड्मन व सुली गोल्ड्मन यांनी ’The Ramayan Of Walmiki’ हे रामायणाचे इंग्रजी भाषांतर पूर्ण केले. जवळपास 40 वर्षे त्यांनी संस्कृत भाषा, वाल्मिकी रामायण व रामायणाच्या अनेक भाषांतरांचा अभ्यास करून, सात कांडे असलेले इंग्रजी भाषेतील रामायण लिहिले. रामायणाविषयी त्यांनी म्हटले आहे की, ग्रीक कवी होमर यांच्या ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ या महाकाव्यांत जर ‘बायबल’मधील कथा मिसळल्या तर काय रसायन तयार होईल, याचा विचार करा. त्यावरून तुम्हाला रामायण काय आहे, याची थोडीशी कल्पना येऊ शकेल.
 
केवळ गोल्डमनच नाही, तर रामायण वाचणार्‍या कुणाचीही अवस्था अशीच होते. अगदी हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी आलेल्या कैक युरोपियन मिशनरींवर रामायणाने अशी भुरळ घातली की, ते स्वतः रामकथा लिहून गेले. संत कबीरांचा दोहा इथे बरोबर लागू पडतो,
 
कोई पिवे मगन हो जावे,रामरस ऐसो रे मोरे भाई
कोई कहे उंचा, कोई कहे गींचा,नीचा न माने कोई
एक बार नीचा माने तो, सबसे उंचा बन जावे
रामरस ऐसो रे मोरे भाई
कोई कहे मिठा, कोई कहे गिठा,कडवा न माने कोई
एक बार कडवा माने तो, सबसे मिठा बन जावे
रामरस ऐसो रे मोरे भाई
 
‘साहित्य अकादमी’ने प्रकाशित केलेल्या ‘द क्रिटिकल इन्व्हेंटरीज ऑफ रामायण स्टडीज’ खंड 1 आणि 2 (1991)च्या प्रस्तावनेत नमूद केले आहे की, रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर सर्व पौराणिक कथा आणि आदर्श नैतिक आचरणाचा राष्ट्रीय झरा आहे. हा ग्रंथ वटवृक्षासारखा देशात-परदेशांत असंख्य मुळे आणि फांद्यांसह पसरला आहे. विविध भाषांमध्ये रामायणावर झालेल्या हजारो संशोधनपर साहित्याची, या खंडांतून यादी दिली आहे. विविध भाषांमधून जसे अरबी, फारसी, ब्राझीलियन, झेक, तिबेटियन, व्हिएतनामी, इटालियन, जपानी, रशियन आणि इतर बर्‍याच भाषांमध्ये झालेल्या संशोधनांची, भाषांतरांची आणि भाषांची जंत्री आहे. ही यादी करायला दोन खंडांची आवश्यकता भासते. यावरून जगभरात रामायणावरील साहित्य अफाट सागराप्रमाणे आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
सहजच असा प्रश्न पडतो की, रामायणात असे काय आहे, की ज्यामुळे ते देशोदेशी पसरले? वाल्मिकींचे रामायण एक ऐतिहासिक महाकाव्य आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या प्रवासाचे चित्रण त्यामधून आले आहे. त्या प्रवासात त्यांच्यावर कोसळलेली संकटे, त्या संकटांचा त्यांनी कसा सामना केला? याची कथा आहे. या महाकाव्यात श्रीरामाचे जीवन व पराक्रम, सीतेचा करारीपणा, लक्ष्मणाचे शौर्य यांचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे, भरताची निष्ठा, हनुमानाची शक्ती, भक्ती आणि युक्ती, सुग्रीवाची मैत्री आणि दशरथाची कर्तव्यनिष्ठादेखील सांगितली आहे. जटायूसारखा साधा पक्षीसुद्धा, धर्माच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करतो. रामायणातील प्रत्येक पात्राकडून, प्रत्येक प्रसंगातून शहाणपणाचे धडे दिले आहेत. या महाकाव्यातून अनेक संस्कृतींना अधिष्ठान मिळाले आहे. म्हणूनच रामकथेने भौगोलिक, भाषिक, सांप्रदायिक आणि धार्मिक सीमा पार केल्या आहेत.
 
राजदरबारापासून अरण्यातील वनवासींपर्यंत सगळ्यांनीच रामायण सांगितले, यात आश्चर्य ते काय? रामायणातील घटना या राजदरबारात आणि अरण्यात घडल्या होत्या. रामकथा गंगेच्या तीरापासून लंकेच्या किनार्‍यांपर्यंत लिहिली गेली, यातसुद्धा काही अनपेक्षित नाही. कारण, हा रामाच्या प्रवासाचाच मार्ग होता. परंतु, रामायणाचे प्रभावक्षेत्र इथे थांबत नाही. भारताच्या सीमांच्या पलीकडे, चीन, मंगोलिया, जपान आणि आग्नेय आशियाई देशांपर्यंत पोहोचते, हे आश्चर्य आहे. भारतीय प्रवाशांनी आणि भारतात शिकायला आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी, तिथे रामायण नेले. या सर्व ठिकाणी रामकथेचे स्थानिक भाषांमध्ये अनुवाद झाले. रामायणावर आधारित नवीन साहित्यनिर्मिती झाली आणि मोठ्या भक्तिभावाने तेथे रामायण सांगितले गेले आणि ऐकलेही गेले.
 
कोणत्याही संस्कृतीसाठी एखादे महाकाव्य हजारो वर्षे टिकवणे, ही काही साधी गोष्ट नाही. अनेक सुलतानी आणि अस्मानी संकटांचा सामना करून, भारतीय उपखंडातील संस्कृतींनी तो ठेवा जतन केला. त्याचा प्रचार-प्रसार केला. मुद्रणाचा शोध लागायच्या आधी, हजारो श्लोक मुखोद्गत करून हा ठेवा मौखिक परंपरेने जपला. तसेच कथाकार, लोककलाकार, चित्रकथाकार, गायक आदींनी संगीत, नाटक, कठपुतलीचे खेळ आदि माध्यमांतून, रामकथा गावोगावी पोहोचवली. रामायणाची शिल्पे मंदिरांच्या भिंतींवर कोरली गेली. वेरूळपासून कंबोडियाच्या अंगकोरवाटपर्यंतच्या शिल्पांमधूनही, रामायणाचे विविध प्रसंग जिवंत केले गेले. अशा उपक्रमांमुळे साक्षर नसलेल्यांनाही रामकथा पाहता, ऐकता आली.
 
भारतासह कंबोडिया, थायलंड आणि इंडोनेशियातील अनेक राजांनी रामायणातील तत्त्वांना आपलेसे करून, ते आपल्या प्रशासनात अमलात आणायचा प्रयत्न केला. अनेकांनी राममंदिरे बांधली, रामायणाच्या पोथ्या लिहिण्यास प्रोत्साहन दिले आणि सादरीकरणालासुद्धा प्रोत्साहन दिले. रामायणाला ‘उपजीव्य काव्य’ म्हटले आहे. या ग्रंथामुळे पिढ्यान्पिढ्या हजारो कलाकार, लेखक, पुष्पविक्रेते, पुजारी, कारागीर, गायक, नर्तक, नट, चित्रकार, शिल्पकार, कथाकार, वास्तुशास्त्रज्ञ, संशोधक, इतिहासकार आदींना रोजगार मिळाला आणि आजही मिळत आहे.
 
महर्षि वाल्मिकींनी रचलेले हे महाकाव्य नंतर महाभारत आणि पुराणांमध्ये पुन्हा सांगितले गेले. त्याचे रूपांतर जैन आणि बौद्धधर्मीय ग्रंथांत, तसेच शिखांच्या दशम ग्रंथामध्येही आढळते. संस्कृतमध्ये कालिदासाच्या ‘रघुवंश’पासून ते श्रीलंकेच्या ‘जानकीहरण’पर्यंत, लोकभाषेतील तुलसीदासांच्या भक्तिपूर्ण काव्यापासून थायलंडच्या ‘रामाकीन’पर्यंत, कवयित्री चंद्रावतीच्या काव्यापासून वनवासी परंपरेतील मौखिक रामायणापर्यंत, कोकणातील ‘दशावतार’पासून कंबोडियाच्या ‘लाखनखोल’पर्यंत, अयोध्येच्या ‘रामलीले’पासून इंडोनेशियाच्या ‘रामायण बॅले’पर्यंत आणि काश्मीरच्या ‘रामायणमंजरी’पासून जावाच्या ‘रामायण काकावीन’पर्यंत रामायण वेगवेगळे रूप घेऊन सजले. चारही वर्णांतील स्त्री-पुरुषांनी, शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध, शीख इत्यादी पंथांनी सांप्रदायिक रामायणे लिहिली.
 
इथे क्षणभर थांबून विविध लोकांना एकत्र बांधणार्‍या रामायणाच्या शक्तीला जाणले पाहिजे. हिंदू समाजातील एकतेची, सर्वसमावेशकतेची आणि समरसतेची नोंद घेतली पाहिजे. हिंदू समाजातील स्वातंत्र्य असे आहे की, इथे प्रत्येकाला आपापल्या भाषेत आणि आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थाने रामकथा सांगण्याची मोकळीक मिळाली. चौथ्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत, युरोपमध्ये बायबलचे भाषांतर करणार्‍यांना चर्चने मृत्यूदंड दिला होता. त्यांनी लिहिलेली भाषांतरे जाळून टाकली होती. चर्चला मान्य नसलेल्या ‘गोस्पेल्स’वर बंदी आणली होती. अशा इतरत्र होणार्‍या गोष्टी लक्षात घेतल्या असता, भारतातील रामायणाचे स्थानिक भाषेत रूपांतर करणार्‍यांचा सन्मान केला जाणे, हा हिंदू धर्माचा उदारमतवाद लक्षात घ्यायलाच हवा.
रामायण चिरपुरातन आहे. प्रत्येक पिढी त्यात आपले प्रतिबिंब पाहात असल्याने, ते नित्य नूतन आणि त्यातील मूल्ये वैश्विक आहेत. म्हणूनच विदेशातसुद्धा, आजही रामकथा ऐकणे, सांगणे आणि लिहिणे चालू आहे. कथा सांगणारी, ऐकणारी माणसेसुद्धा येतील-जातील, पण रामकथा शिल्लक राहील. ब्रह्मदेवाने वाल्मिकींना आशीर्वाद दिल्याप्रमाणे,
यावत्स्थास्यन्ति गिरयः
सरितश्च महीतले।
तावद्रामायणकथा
लोकेषु प्रचरिष्यति॥ 1-2-36
जोपर्यंत पृथ्वीवर नद्या आणि पर्वत आहेत, तोपर्यंत रामायणाची कथा तिन्ही लोकांत प्रसिद्ध राहील!
  
दीपाली पाटवदकर
9822455650
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121