श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा चित्ररथ श्री पोद्दारेश्वर राममंदिराच्या शोभायात्रेत सहभागी होणार
05-Apr-2025
Total Views | 12
नागपूर : श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा चित्ररथ प्रथमच श्री पोद्दारेश्वर राममंदिराच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. येत्या ६ एप्रिल रोजी श्री पोद्दारेश्वर राममंदिराची ५९ वी भव्य शोभायात्रा मोठ्या भक्तिभावाने निघणार आहे. यावर्षी प्रथमच या शोभायात्रेत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे.
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा हे विदर्भातील एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. देवीची मूर्ती अत्यंत तेजस्वी, प्रसन्न आणि मनोहर असून, नवरात्रोत्सव, विजयादशमी आणि विविध सणांमध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या या देवीच्या चित्र रथ नागपूरच्या सर्वात मोठ्या शोभायात्रेत समावेश होणे, हे निश्चितच एक भक्तीपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी हे केवळ धार्मिक केंद्र न राहता, सामाजिक आणि सेवाभावी कार्यातही सातत्याने अग्रेसर आहे. आरोग्य शिबिरे आणि शैक्षणिक मदतीद्वारे संस्थान विविध स्तरांवर समाजसेवा करत असते. या वर्षी आई जगदंबा नागपूरकरांना आशेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी येत आहे, ही भावना प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात एक नवा प्रकाश फुलवणारी ठरेल. या निमित्ताने सर्व नागपूरकर भाविकांनी या भक्तीमय पर्वात सहभागी व्हावे, शोभायात्रेत देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या पावन प्रसंगाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तर्फे करण्यात येत आहे.