रामकथेचे मूळ हिंदुस्थानात असले तरी भारतीय व्यापारी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारातून रामायण अगदी पूर्वेकडील जपानपर्यंतही पोहोचले. साहजिकच, रामायणाची कथा जपानच्या संस्कृतीरंगात न्हाहून निघाली, वेगळ्या पद्धतीने विकसितही झाली आणि तितकीच लोकप्रियही ठरली. त्यानिमित्ताने जपानी साहित्य, संस्कृती आणि सिनेमासारख्या नवमाध्यमांतही रामायणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या जपानी रामायणाच्या संपन्न परंपरेचा सविस्तर आढावा घेणाराहा लेख...
उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखला जाणारा जपान हा अनेक वैशिष्ट्ये असलेला महत्त्वपूर्ण आशियाई देश. पूर्वेकडील इतर देशांप्रमाणे, जपानलाही प्राचीन परंपरा व इतिहास लाभलेला आहे. भूकंप, अणुहल्ला, त्सुनामी यांसारख्या आघातांना झेलून पुनःपुन्हा उभे राहण्याची आंतरिक शक्ती असलेला हा अद्भुत देश. एकाचवेळी कला, संस्कृती, परंपरा जपणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा हा देश, बाहेरून आलेल्या उत्तम गोष्टी स्वीकारतो. परंतु, त्या स्वीकारातही एक गोष्ट असते, ती म्हणजे प्रत्येक गोष्ट जपानी परंपरा संस्कृतीला अनुकूल करून घेऊन ती स्वीकारली जाते.
रामायण हे आपले ‘आर्ष महाकाव्य.’ आपल्या साहित्य परंपरेने, ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ या दोनच ग्रंथांना ‘आर्ष महाकाव्य’ म्हटले आहे. त्यापैकी रामायण जरी सनातन संस्कृती आणि भारतीय जीवनाशी संबंधित असले, तरी त्याचा प्रभाव जगभरात दिसून येतो. पौर्वात्य देशांमध्ये तर हा प्रभाव विशेष जाणवतो. जवळपास सगळ्या पौर्वात्य देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात रामायणाची कथा आढळून येते. अगदी जपानही याला अपवाद नाही.
अशी मान्यता आहे की, बौद्ध धर्माच्या आगमनासोबत रामायण जपान देशात पोहोचले. परंतु, काही इतिहासकारांच्या मते, रामायणाची कथा जपानमध्ये बौद्ध धर्म येण्याच्याही आधीपासून अस्तित्वात होती. काहीही असले तरी हे खरे की, जपानवर प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीचा एक विशेष प्रभाव होता. तेथील लोकांनी भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांना आपलेसे केले होते. त्यामुळे इसवी सन पूर्व दुसर्या शतकापासूनच रामायण व इतर पौराणिक कथा जपानमध्ये सांगितल्या जात होत्या. या कथा-कहाण्या कोरिया आणि चीन यांच्याशी असलेला भारतीय व्यापार्यांचा संबंध यांच्या माध्यमातून त्या जपानमध्ये पोहोचल्या, असे काही संशोधक मानतात.
अर्थात हे लक्षात ठेवले पाहिजे की, जपानमध्ये रामायणाची जी कथा सांगितली जाते, ती पूर्णपणे जपानी पद्धतीने विकसित केलेली आहे. जपानी रामायणामध्ये भारतीय संस्करणापेक्षा वेगळ्या प्रकारची कथा सांगितले जाते.
इतिहासाच्या पाऊलखुणा पाहिल्यावर दिसते की, चीनमधून कोरिया आणि तिथून जपानमध्ये बौद्ध धम्म गेला. कोरियाच्या राजाने इसवी सन पाचव्या शतकांमध्ये दूत पाठवून जपानच्या राजापाशी बौद्ध धर्माविषयी माहिती पाठवली. त्याचबरोबर काही बौद्धग्रंथ, काही तसबिरी आणि काही मूर्तीदेखील पाठवल्या. त्यापूर्वीही काही काळ धम्म जपानमध्ये गेलेला होता. परंतु, त्याचा तेवढा प्रसार झालेला नव्हता. पाचव्या शतकानंतरही तो प्रचार थोडा मंद गतीने होता. कारण, जपानमध्ये असलेल्या शिन्टो धर्माचा तेथे खूप कडवा विरोध होता. नंतर मात्र शिन्टो धर्मातील देवतांची बोधिसत्वामध्ये गणना करून, त्यांनी त्यांची पूजा सुरू केली. त्यामुळे स्वाभाविकपणे बौद्ध धम्म हा तेथे प्रसारित झाला आणि बौद्ध जातकातून रामाच्या कथा जपानमध्ये पोहोचल्या.
जपानच्या रामायणाचे नाव आहे ‘रामाएन्शो’ किंवा ‘रामेंन्ना.’ अशा या रामाच्या कथेने जपानी संस्कृतीवर आपली छाप पाडली. जपानी लोकांनी रामायणातील शाश्वत मानवी मूल्ये अबाधित ठेवून आपल्या पद्धतीने या कथेला विकसित केले.
जपानच्या रामकथेत काही वेगळी तत्त्वेदेखील आहेत, जी वाल्मिकी रामायणातील कथानकापेक्षा भिन्न आहेत. जसे की, जपानच्या रामकथेत हनुमान हे पात्र नाही. खरं म्हणजे, भारतीय समाज हनुमानाशिवाय रामायणाची कल्पनाही करू शकत नाही. पण, इथे तसे आहे खरे. कदाचित समुद्रात असलेले बेट, श्रीलंका हनुमानाने जाळून टाकले, म्हणून तर त्याला रामायणात स्थान दिले नसेल? कारण, काहीही असो, अंजनीपुत्र नाही एवढे खरे! दुसरे म्हणजे, जपानी रामायणात रावण एक जटिल आणि बहुआयामी पात्र आहे. तो केवळ दुष्ट राजा नाही, तर मानसिक द्वंद्व असलेली एक व्यक्ती आहे.
जपानमध्ये दोन प्रकारच्या रामकथा प्रचलित आहेत. एक ‘होबुत्सुशू’ संग्रहात आहे. जी नेहमीची कथा भारतात सांगितली जाते तशीच आहे. फक्त त्यात हनुमान नाही.
दुसरी कथा बौद्ध धम्म जातकातून आलेली आहे. त्यात राम राजा आहे, पण तो शाक्य मुनी आहे.अहिंसक आहे. शेजारच्या राज्यात दुष्काळ परिस्थितीमुळे लोक आपल्या देशावर आक्रमक करणार आहेत, हे लक्षात आल्यावर शाक्य मुनी पत्नीला घेऊन वनात जातात. युद्ध न होता, दोन राज्ये एकत्र होतात.
इकडे वनात एक ब्राह्मण वेषधारी शाक्य मुनींची सेवा करून मन जिंकून घेतो, विश्वास संपादन करतो.थोड्या काळाने मुनी नसताना त्यांच्या पत्नीला पळवून नेतो. एक पक्षीराज त्याला अडवतो; पण तो त्याचे पंख कापून राणीला नेतो. पक्षी मुनीला सर्व सांगून प्राण सोडतो. पुढे शाक्य मुनींना वानर सेना भेटते. त्यांचे राज्य हिरावले गेलेले असते. युद्ध टाळण्यासाठी राजा शाक्य प्रयत्न करतो. परंतु, वानर त्याच्या हातात धनुष्यबाण देतात. अखेर तो त्यांना त्याचे डोंगराचे राज्य मिळवून देतो. नंतर त्यांच्या मदतीने वेषधारी ब्राह्मणाकडून (जो मूळ नागराजा असतो) आपली पत्नी सोडवून आणतो. या दरम्यान शेजारच्या राज्याचा राजा मृत होतो. आता दोन्ही राज्ये शाक्य मुनींना मिळतात. ते सुखाने राज्य करतात.
या काव्यात राजाने अहिंसा धर्माचे पालन करताना स्वतःची वाईट अवस्था करून घेतली, हे पाहून ब्रह्मदेव कपी वेषात येऊन राजाला पूल बांधण्यात मदत करतात वगैरे गोष्टी, जशा आपल्या पुराणांमध्ये असतात तशा आहेत. एकूणच रामाची वचनबद्धता, मूल्यनिष्ठा या बाबी जपानी रामायणात पण दिसून येतात.
रामायण, महाभारत यांना ‘महाकाव्य’ म्हटले जाते. कारण, या साहित्यावर आधारित अनेक प्रकारच्या कलाकृती व साहित्याची निर्मिती होत असते. त्या अर्थाने रामायण व महाभारत ही ‘उपजिव्य’ काव्ये आहेत.
चौदाव्या शतकात कोगा साबुरो योरीकाता यांनी लिहिलेल्या ‘सुवा एंगी नो कोतो’ या कथेवर रामायणाची छाप स्पष्टपणे दिसून येते. कोगा साबुरो यांची ही रचना रामायणावर आधारित आहे, हे त्यातील सीतेच्या कथेतून लक्षात येते. सीतेची कथा सांगताना यात जपानी संस्कृती व परंपरांचा सुंदर मेळ घातला आहे.
‘ओन्जोशी शिमावतारी’ या कथेमध्ये श्रीरामाच्या अवताराची कथा आहे. ही कथा जपानी संस्कृतीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. ‘किफुने नो होंजी’सारख्या कथांमध्ये रामायणातील कथाभाग घेण्यात आलेला आहे. ‘बुक्कीगून’ (बुद्धाचे सैन्य)यातही वेगळी रामकथा वर्णन केली आहे.
‘होबुत्सुशू’ या साहित्यकृतीमध्येदेखील रामकथेचे वर्णन विशेष पद्धतीने केले गेले आहे. ‘होबुत्सुशू’ ही एक जपानी कथाशैली आहे. ज्यात पुष्प, निसर्ग आणि मनुष्य यांच्या परस्पर अनुबंधाचे चित्रण असते. या लोकप्रिय कथासंग्रहात, ‘होबुत्सुशू’मध्ये रामकथा संकलित केली आहे. या साहित्याची रचना ‘तैरानो यसुयोरी’ याने 12व्या शतकात केली. ही कथा चीनमधील बौद्ध साहित्यावर आधारित आहे.
एकूणच जपानमध्ये विकसित रामकथेत जपानी संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांतील सहसंबंध विविध प्रकारे वर्णन केलेले दिसतात. तसेच, रामकथा ही संपूर्ण मनुष्यजातीची आहे, तिला वैश्विक महत्त्व आहे, हेदेखील यातून समजते.
जपानमध्ये रामकथेला वेगवेगळ्या स्वरूपात प्रस्तुत केलेले आढळते. त्यात विशेषतः नाटक, कविता, चित्रकला आणि जपानी परंपरेत महत्त्व असलेल्या ‘मंगा और एनिमें’ (जपानी चित्रशैली व विशेष प्रस्तुतीकरण शैली)मध्येही प्रस्तुत केले जाते.
टोमिओ मिझोकामी या मानद प्राध्यापकांनी हिंदी भाषा शिकवताना, ‘ओसाका विद्यापीठा’त एक प्रयोग केला. ‘रामायण’ ही रामानंद सागर यांची गाजलेली मालिका त्यांनी अभ्यासक्रम म्हणून विद्यार्थ्यांना दाखवली. तसेच, विद्यार्थ्यांना मालिका रामायणमधील संवादाची पुस्तके उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे मुलांचे हिंदी शिक्षण तर झालेच; पण विद्यार्थ्यांना रामायणाचे मूळ स्वरूपदेखील लक्षात आले. या प्राध्यापकांनी ‘गुरू ग्रंथसाहिब’मधील प्रार्थनादेखील जपानी विद्यार्थ्यांना शिकवल्या आहेत.
प्रा. टोमिओ मिझोकामी (ओसाका विद्यापीठ, जपान) यांना 2018 साली दि. 2 एप्रिल 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी समारंभपूर्वक साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले.
जगभरात जपानी अॅनिमेशन मालिका व चित्रपट आवडीने पाहिले जातात.जपानमध्ये ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ (Ramayana: The Legend of Prince Rama) नावाचा एक प्रसिद्ध अॅनिमेटेड चित्रपट आहे, जो भारतीय रामायणावर आधारित आहे. हा चित्रपट युगो साको यांनी दिग्दर्शित केला होता. ‘रामायण-द लेजेंड ऑफ प्रिन्स राम’ हा 1993 साली जपान आणि भारत यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला अॅनिमे चित्रपट आहे; जो युगो साको यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. हा भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोइची सासाकी आणि राम मोहन यांनी केले होते, तर त्याला संगीत वनराज भाटिया यांनी दिले होते. हा चित्रपट पहिल्यांदा भारतात 24व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. बाबरी ढाँचा प्रकरणामुळे त्यावेळी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु, हा चित्रपट लहान पडद्यावर सगळीकडे प्रसारित झाला होता. दि. 18 ऑक्टोबर, 2024 रोजी हा चित्रपट भारतीय सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
यातील संवाद, गीते सर्वांनाच खूप आवडली आहेत. एकूणच रामायणाची मांडणी एक अॅनिमेशनपटदेखील किती सुंदर पद्धतीने करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
समारोप
रामायण हे मानवी मूल्यांचे, शाश्वत सत्याचे आणि रंजन-प्रबोधन करणारे जगमान्य साहित्य आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येकाला रामायणाची मोहिनी पडते. अर्थातच, ते जेथे जाते तिथल्या स्थानिक प्रथा, परंपरा आणि रितीरिवाजांनुसार ते थोडेफार बदलून जाते. ज्या प्रदेशात रामायण पोहोचते, तेथील रितीरिवाज, परंपरांना स्वतःमध्ये गुंफून घेत आपल्या गाभ्यातील मानवी मूल्यांचे शिक्षण तेथे देते. थोडाफार ते खूप सारा बदल केला आहे. काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली ही साहित्यकृती सगळीकडे आपली छाप पाडते. सगळ्या मानव समूहांना, या ग्रंथाला आपले मानणे, त्याचा आपल्या परीने अन्वयार्थ लावणे व वेगवेगळ्या पद्धतीने या कथेचे प्रस्तुतीकरण करावे वाटते, यातच रामायणाचे महत्त्व सामावलेले आहे. रामकथेची ही सौम्यशक्ती अशीच विकसित होत जाणार, कारण हे ‘कालजयी महाकाव्य’ आहे.
रमा गर्गे
(लेखिका योगशास्त्र, इतिहास व तत्वज्ञान विषयांच्या अभ्यासक आहेत.)
9421219859