परंपरा इंडोनेशियातील रामायणाची...

    05-Apr-2025
Total Views | 10

Shree Ram
 
भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडोनेशियात पदोपदी जाणवतात. या लेखातून इंडोनेशियातील समृद्ध रामायण परंपरेचा घेतलेला हा मागोवा...
 
आपल्याला असे आढळते की, प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे परदेशगमन होत असे. तसेच, आपल्या राज्यात प्रत्यक्ष कार्यभाराची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी प्रात्यक्षिक ज्ञान मिळविण्यासाठी, क्षत्रिय कुमार साहसी सफरींवर जाऊन देशाटन करून अनुभव संपन्न होत असत. त्याचप्रमाणे भारतातील बौद्ध भिक्खूंनीदेखील धर्मप्रसारासाठी परकीय देशांना भेटी दिल्याचेही अनेक उल्लेख सापडतात. अशा प्रकारे विविध कारणांनी आणि विविध मार्गांनी, भारतीय संस्कृती आशिया खंडातील अन्य देशांमध्ये जाऊन पोहोचली. ज्या ज्या ठिकाणी भारतीय संस्कृती पोहोचली, त्या त्या ठिकाणी असलेल्या मूळ परंपरांशी ती एकरूप होऊन गेली. इंडोनेशिया हा असाच एक देश, जिथे सुमारे दोन हजार ते दीड हजार वर्षांपूर्वी भारतीय संस्कृती पोहोचल्याचे दिसून येते.
 
भौगोलिक पार्श्वभूमी
 
इंडोनेशिया हे द्वीपराष्ट्र. हा देश हजारांहून अधिक बेटांनी बनलेला. बोर्नियो आणि सुमात्रा ही बेटे आकाराने महाकाय असली, तरी जावा या तुलनेने बर्‍याच लहान असलेल्या बेटावर पूर्वीपासूनच घनदाट मनुष्यवस्ती पाहायला मिळते. जकार्ता हे आतापर्यंत इंडोनेशियाच्या राजधानीचे असलेले शहरही जावा या बेटावरच वसलेले आहे.
 
प्राचीन काळी इंडोनेशियामध्ये मिळणारी खनिजे, मसाल्याचे विविध पदार्थ यांमुळे रेशीममार्गाच्या माध्यमातून, चीनपासून रोमपर्यंत चालणार्‍या व्यापाराशीदेखील जावाचा संबंध आला. संस्कृत साहित्यामध्ये आढळणारी हेमकूट, रुप्यकद्वीप, कर्पूरद्वीप, शंखद्वीप, तक्कोला इत्यादी नावे मलेशिया आणि इंडोनेशियामधील विविध ठिकाणांची असल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. ‘यवद्वीप’ या नावाने पूर्वी ओळखले जाणारे ठिकाण, काळाच्या ओघात ‘य’ अक्षराचा ‘ज’ होऊन (‘यव’ऐवजी ‘जव’ होऊन) पुढे ‘जावा’ या नावाने प्रसिद्धीस आले. या बेटाचा आकार खरोखरच ‘यव’ या धान्याच्या दाण्यासारखा किंचित लंबगोलाकृती आहे.
इंडोनेशियामधील रामायण
 
रामकथेची विविध रूपे भारतात आढळतात. संस्कृत भाषेमध्ये महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण, हे वेदोत्तर काळातील पहिले काव्य असल्याने त्याला ‘आदिकाव्य’ म्हणतात. त्यामध्ये सुमारे 24 हजार श्लोक आहेत. नंतरच्या काळात अनेक कवींनी आणि नाटककारांनी रामकथेतील त्यांना भावलेला कथाभाग घेऊन, त्यावर महाकाव्ये रचली आणि नाटके लिहिली. प्रादेशिक भाषांमध्येही ही रामकथा सांगितली गेल्याचे दिसून येते. वाल्मिकी रामायणाइतकाच ‘रामचरितमानस’ हा संत तुलसीदासांनी रचलेला प्रासादिक ग्रंथही महत्त्वाचा मानला गेला आहे.
 
प्राचीन काळी भारतीय संस्कृतीचा प्रसार भारताबाहेर होत असताना, भारतीय संस्कृतीचे एक महत्त्वाचे संचित असलेले रामायणही भारताबाहेर गेले नसते, तरच नवल. भारताप्रमाणेच भारताबाहेरही ही रामकथा पोहोचली. इतकेच नव्हे, तर त्या त्या देशांमध्ये तिचे निरनिराळे आविष्कार उत्पन्न झाले. वडिलांच्या आज्ञेवरून रामाने स्वीकारलेला वनवास, सुवर्णमृगाची शिकार, रावणाने सीतेचे अपहरण करणे, नंतर सीतेचा शोध घेताना रामाची सुग्रीवाशी भेट होऊन, त्याने वालीचा नाश करून सुग्रीवाला राज्य देणे, मग सीतेचा हनुमानाने लंकेत जाऊन लावलेला शोध, समुद्र ओलांडून लंकेत जाणे आणि रावणासह अन्य राक्षसांचा वध करणे, या रामाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आहेत.
 
भारतीय सीमा ओलांडून पलीकडे गेलेल्या रामाच्या कथानकातदेखील, या महत्त्वाच्या घटनांचा समावेश असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी त्यामध्ये थोडे-फार बदल केल्याचेही दिसते. त्यामुळे भारताप्रमाणेच भारताबाहेर सुद्धा वाल्मिकी रामायणापेक्षा थोडी वेगळी रामकथा कधीकधी पाहावयास मिळते. या परदेशांमध्ये रामकथा नुसती सांगितली जात नसे, तर तेथील धार्मिक स्थापत्यांमध्ये रामायणातील प्रसंगांचे शिल्पांकनही केले जात असे. प्रस्तुत लेखात आपण रामायणाच्या इंडोनेशियातील स्वरूपाची माहिती घेत आहोत.
 
रामायण स्वर्णद्वीप
 
सुमात्रा या विशालकाय बेटावर उपलब्ध असलेली रामायणाची परंपरा, ‘रामायण स्वर्णद्वीप’ या नावाने ओळखली जाते. यशस्वीरितीने शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडल्याने, राम आणि सीता यांचा झालेला विवाह, कैकयीच्या सांगण्यावरून दशरथाने रामाला वनात पाठविणे, सोबत सीता आणि लक्ष्मण यांनीही गमन करणे, लक्ष्मणाकडून अपमानित झालेल्या शूर्पणखेकरवी, रावणाला सीतेच्या अपहरणासाठी प्रोत्साहन दिले जाणे, सुवर्णमृगाच्या निमित्ताने रावणाने सीतेचे अपहरण करणे, नंतर हनुमानाच्या मदतीने, लंकेचा आणि पर्यायाने सीतेचा शोध, सेतूची निर्मिती आणि राम-रावण यांचे युद्ध हे या रामायणातीलही महत्त्वाचे प्रसंग आहेत.
 
योगेश्वर आणि ‘ककविन रामायण’
 
जावानीज भाषेमध्ये ‘काव्य’ या अर्थाने ‘ककविन’ हा शब्द वापरला जातो. संस्कृत भाषेतील प्रचलित वृत्तांमध्ये रचली गेलेली स्थानिक भाषेतील रामकथा म्हणजेच ‘ककविन रामायण’ होय. मध्य जावामध्ये मतराम नावाचे साम्राज्य असताना, हे काव्य रचले गेल्याचे मानले जाते. हा काळ साधारणपणे इसवी सनाचे नववे अथवा दहावे शतक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात, भारतामध्ये ‘भट्टी’ नावाचा एक प्रख्यात संस्कृत कवी होऊन गेला. ‘रावणवध’ हे त्याने रचलेले, रामकथेवर आधारित महाकाव्य होय. हे ‘भट्टीकाव्य’ या नावानेदेखील ओळखले जाते. संशोधकांच्या मते, ‘ककविन रामायणा’वर या भट्टीकाव्याचा प्रभाव पडला आहे. याच प्रकारे ‘योगेश्वर रामायण’ या नावाचेदेखील काव्य जावामध्ये उपलब्ध आहे.
 
‘ककविन रामायणा’ची कथा थोडक्यात अशी आहे. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दसरत नावाच्या राजाचे चार राजपुत्र होत. विस्वामित्र नावाचे ऋषी आपल्या आश्रमाचा विद्ध्वंस करणार्‍या राक्षसांचा संहार करण्यासाठी, दसरत राजाकडे मदतीची याचना करतात. मग राम आणि लक्ष्मण यांना राजा मदतीसाठी धाडतो. आश्रमातील अडचणी दूर केल्यावर, ऋषींसोबत हे दोन राजकुमार मिथिला नावाच्या नगरीत जातात. तिथे सिंता या राजकन्येचे स्वयंवर चालू असते. धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण यशस्वीरित्या पूर्ण करून, राम सिंतेशी विवाह करतो.
 
त्यानंतर वडिलांकडे परत आल्यावर, रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरते. पण, कैकयी राजाला गळ घालून, आपल्या भरत या पुत्राकरिता राज्य मागून घेते आणि रामाला वनवासात पाठविते. राम, सिंता आणि लक्ष्मण वनगमन करतात, त्यावेळी शोकाकुल झाल्याने राजाचा मृत्यू होतो. भरत अर्थातच हे राज्य स्वीकारत नाही आणि रामाला परत (पान 9 वर)


आणण्यासाठी प्रयत्नशील होतो. परंतु, त्याला नकार देऊन वनवासाचा ठरलेला कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपण राजधानीत येणार नसल्याचे राम स्पष्ट करतो. मात्र, तो आपल्या पादुका भरताला देतो. रामातर्फे तो परत येईपर्यंत भरत राज्य चालवेल, असे ठरते.
वनवासात असताना एकदा सुर्पानाका ही राक्षसी लक्ष्मणाच्या मागे लागते. तेव्हा तो तिच्या नाकाचे टोक कापून टाकतो. अपमानित झालेली सुर्पानाका, तिचा भाऊ असलेल्या रावणाकडे तक्रार करते आणि सिंतेचे अपहरण करण्याविषयी सूचविते. मग सुवर्णमृगाच्या निमित्ताने, रामाला सिंतेपासून दूर करून रावण तिचे अपहरण करतो. पुढे शिवाचा अवतार असलेल्या हनुमानाच्या साहाय्याने, राम आणि लक्ष्मण रावणापर्यंत पोहोचतात आणि त्याचा राक्षससेनेसह वध करून सिंतेला घेऊन येतात. अयोध्येत परत आल्यावर रामाचा राज्याभिषेक होतो.
 
ही रामकथा भारतीय परंपरेपेक्षा फारशी भिन्न नाही. परंतु, या कथेच्या उत्तरार्धात, जावामधील स्थानिक लोकदेव सेमार आणि त्याच्या मुलांची कथा येते. ही मूळ रामायणाशी अर्थातच पूर्णपणे विसंगत आहे. ’वायांग कुलित’ आणि ’वायांग पूर्व’ यांसारख्या चामड्यापासून बनविलेल्या बाहुल्यांच्या छायानाट्य प्रकारच्या सादरीकरणात ही उत्तरार्धातील कथा आवर्जून दाखविली जाते. तसेच रामायणाच्या ‘बॅले’ स्वरूपातील सादरीकरणात, हनुमानाने केलेले लंकेचे दहन हे विशेष रितीने दाखवले जाते.
 
रामकवच आणि केचक नृत्य
 
आता इंडोनेशियाचा राष्ट्रधर्म इस्लाम आहे. परंतु, तेथील बाली या बेटावर आजही हिंदू धर्म टिकून आहे. बाली येथे ‘रामकवच’ या नावाने, पारंपरिक रामकथा उपलब्ध होते. ‘केचक’ या नावाने जे पारंपरिक नृत्य सादर केले जाते, त्यामध्येही रामकथा येते. ‘चक चक चक चक....’ असा आवाज करत, नट या नृत्यात सादरीकरण करतात. त्यावरून या नृत्याला ‘केचक’ असे नाव पडले. या रामायणातही रामाचे सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वनगमन, सीतेचे अपहरण आणि नंतर हनुमानाच्या मदतीने सीतेचा घेतलेला शोध ही कथा महत्त्वाची आहे. राम आणि रावण यांच्या युद्धातही, हनुमानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे या रामायणात दाखविले जाते.
 
प्रम्बानन येथील शिल्पांकन
 
मध्य जावामध्ये असणार्‍या योग्यकर्ता प्रांतात, प्रम्बानन नावाचा प्राचीन मंदिर समूह आहे. जावामध्ये इसवी सनाच्या आठव्या शतकात, मतराम नावाचे साम्राज्य उदयाला आले. या राजवंशामधील सहावा राजा राकाइ पिकटन लिंगेश्वर याच्या कारकिर्दीत, प्रम्बानन या नावाने आज प्रसिद्ध असलेले मंदिर बांधायला प्रारंभ झाला. पुढे त्याचा मुलगा राकाइ कायुवांगी लोकपाल सज्जनोत्सवतुंग याने, इ.स. 855 मध्ये राज्य ग्रहण केल्यावर या देवालयाचे बांधकाम पूर्णत्वाला नेले. देवालयाच्या परिसरात सापडलेल्या शिलालेखानुसार, देवालयाचे नाव ‘शिवग्रह’ असे येते. हे मंदिर ब्रह्म, विष्णू आणि शिव या तीन देवतांचे आहे. त्या तिघांपैकी शिव ही देवता या मंदिरात प्रधान असल्याने, ती मध्यभागी आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतींवर, रामायणातील प्रसंगांचे शिल्पांकन केल्याचे आढळते.
 
जनकाने आयोजित केलेल्या सीतास्वयंवरात सहभागी होऊन राम शिवधनुष्य उचलून वाकवतो, या प्रसंगाचे अंकन या ठिकाणी आहे. कैकयी दशरथाकडे हट्ट करून आपल्या मुलाला, म्हणजेच भरताला राज्य द्यावे आणि रामाला 14 वर्षांचा वनवास मिळावा, असा वर मागून घेते. दशरथाने पूर्वीच तिला दोन वर देण्याचे कबूल केले असल्याने, आता त्याला होकार देण्यावाचून पर्याय नसतो. पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून, रामही लगेच वनवास स्वीकारतो. यावेळी सीता आणि लक्ष्मण त्याच्यासह वनात जाण्याचे ठरवितात. येथील एका शिल्पात, रथात बसून नगरीबाहेर पडणारे राम, सीता आणि लक्ष्मण अंकित केले आहेत. याच प्रमाणे मारीच वध, सीताहरण, रावणाने केलेला जटायूचा वध, वाली-सुग्रीव युद्ध, हनुमानाचे लंकागमन, सीताभेट इत्यादी प्रसंग कोरल्याचे दिसून येते. पुढील सेतूबंधन आणि राम-रावण युद्धाचे प्रसंगदेखील इथे अंकित केले गेले आहेत. कुंभकर्णाला युद्धासाठी झोपेतून उठवतानाचे शिल्पही वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे.
 
अशा प्रकारे आपण इंडोनेशियामधील रामायणाच्या परंपरेची तोंडओळख करून घेतली आहे. यावरून आपल्या लक्षात येते की, भारतामधून केवळ रामकथा इंडोनेशियामध्ये पोहोचलीच असे नाही, तर त्याठिकाणी या कथेचे विविध पैलूही दृग्गोचर होत गेले. काव्य, नाट्य आणि शिल्प अशा कलेच्या विविध स्वरूपांमध्ये, इंडोनेशियातील नागरिकांनी रामायणाचे जतन केले. हा सांस्कृतिक वारसा ते आजही जपत आहेत आणि तसाच तो भविष्यातही जपण्याची त्यांची इच्छाही दिसून येते.

डॉ. अंबरीष खरे
(लेखक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे साहाय्यक प्राध्यापक (संस्कृत) आहेत.)
9420081965
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121