दीनानाथ रुग्णालयासारख्या घटना टाळण्यासाठी विशेष नियमावली तयार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    05-Apr-2025
Total Views | 29
 
Devendra Fadanvis
 
पुणे : भविष्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारख्या घटना घडू नये यादृष्टीने विशेष नियमावली तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ५ एप्रिल रोजी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी आमदार अमित गोरखे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
 
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे यादृष्टीने एसओपी तयार करणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन
 
"दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार अतिशय असंवेदनशील आहे. धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य विभाग यांच्या समितीचे याप्रकरणी प्राथमिक निष्कर्ष आलेले असून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या अधिवेशनात कायद्यात बदल करून धर्मादाय आयुक्तांना काही अधिकार दिले आहे. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षसुद्धा याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत," असेही त्यांनी सांगितले.
 
विनाकारण शोबाजी करणे बंद व्हावे
 
"दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारले आहे. ते एक नावाजलेले रुग्णालय असून तिथे अनेक उपचार होतात. त्यामुळे रुग्णालयाचे सगळे काही चूक आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. परंतू, कालचा प्रकार असंवेदनशील होता. जिथे चूक आहे ती सुधारावी लागेल आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याचा आनंद आहे. जोपर्यंत आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे अर्धवट आहे. रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. याप्रकरणाची दखल घेतली असून त्यासंदर्भातील कायदेशीर कारवाई पूर्ण करू. पण विनाकारण शोबाजी करणे बंद झाले पाहिजे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121