प्रभू श्रीरामांचे जीवन म्हणजे जीवन मूल्यांचा सर्वोच्च बिंदू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजोग सोसायटीच्या वतीने आयोजित प्राणप्रतिष्ठा

    05-Apr-2025
Total Views | 12
 
Devendra Fadanvis Sanjog Society
 
मुंबई : प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावीत याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ५ एप्रिल रोजी केले.
 
मानखुर्द येथे संजोग सोसायचीच्या वतीने आयोजित संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर, मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, संजोग सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ बन, सिद्धिविनायक देवस्थानचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांच्यासह संजोग सोसायटीचे सेक्रेटरी उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राम नवमीच्या पूर्वसंध्येला संजोग सोसायटीमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याचा योग आला याचा आनंद आहे. प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावीत याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे. त्यामुळेच आपण अतिशय उत्साहात रामनवमी साजरी करतो. त्यानिमित्ताने प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांवर चालण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी, यासाठी प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न आपण करतो."
 
"प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. त्यांनी एक युग प्रवर्तित करण्याचे काम केले. प्रभू श्रीराम यांना आपण देवाचा अंश मानतो. ते देव होते तर कदाचित रावणाशी चमत्कारानेसुद्धा लढू शकले असते. पण त्यांनी ते केले नाही तर समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून, त्यांच्यातील पौरुष जागृत केले आणि असूरी शक्तीला परास्त करण्याची भावना त्यांच्यात तयार झाली. त्यामुळेच छोट्या छोट्या नर वानरांनी एकत्रित येऊन त्याकाळी जगातील सगळ्यात बलाढ्य शक्ती असलेल्या रावणाचा निःपात केला."
 
सत्याच्या मार्गाने असत्याचा निःपात करता येतो
 
"ज्यावेळी सामान्य माणूसदेखील सत्याच्या मार्गाने चालतो त्यावेळी असत्य कितीही मोठे आणि असूरी असले तरी त्याचा निःपात ते करू शकते. संपूर्ण रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी आपल्याला हा धडा दिला आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांनी आम्हा सगळ्यांना योग्य मार्गावर चालण्याचा आशीर्वाद द्यावा. त्यांनी तयार केलेल्या उच्च मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा द्यावी," असेही ते म्हणाले.
 
 
देवेंद्रजींच्या नेतृत्वात मानखुर्द परिसराचा विकास होणार!
 
याप्रसंगी बोलताना संजोग सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ बन म्हणाले की, "रामनवमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संजोग मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यामुळे हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. सर्वांचे लाडके देवाभाऊ आमच्या संजोग सोसायटीमध्ये आले ही भाग्याची गोष्ट आहे. मानखुर्दसारख्या परिसरात देवेंद्रजीसारखे मुख्यमंत्री येणे ही अभिमानाची बाब आहे. मानखुर्द हा हातावर पोट असलेल्या गरीब लोकांचा परिसर आहे. अशा भागांचा विकास व्हावा, असे स्वप्न भारतीय जनता पक्ष सातत्याने बघत असते. भाजप आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात या परिसराचा विकास होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121