नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन
05-Apr-2025
Total Views | 24
नागपूर : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या सर्वाना नियमाप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
शनिवार, ५ एप्रिल रोजी त्यांनी नागपुर येथे माध्यमांशी संवाद साधला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिली असून त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात बैठक आणि पंचनामा करणे सुरू झाले आहे. राज्यातसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कुठल्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले ते माहित नाही. मात्र, सरकार म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतो. देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे," असे त्यांनी सांगितले.
"आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील लोकांना विचारायची काहीही गरज नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असून आम्हाला तुमची गरज नाही. उलट त्यांच्या पक्षाचे लोक आमच्याकडे येत आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली आहे. उद्धव ठाकरेंनी ज्यांची मते घेतली त्या मतांशी बेइमानी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी घेतलेले हे पाऊल आहे. उद्धव ठाकरे यांना जनता माफ करणार नाही. त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पतन केले आहे," अशी टीकाही त्यांनी केली.
वडेट्टीवारांनी बालिशपणा सोडावा
"विजय वडेट्टीवार यांनी बालिशपणा सोडून अभ्यास करून बोलले पाहिजे. मंगेशकर हॉस्पिटबाबत आम्ही चौकशीचे आदेश दिले आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेली अनियमिता मान्य नाही, त्याबाबत कारवाई करू. राज्यातील कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पैशाची मागणी केल्यामुळे कुणाचा जीव गेल्याचे आढळल्यास कायद्याने त्यांचे परवाना रद्द केले जाईल," असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.