पुणे: (Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे ही नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य उपसंचालकानी स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीमध्ये नीना बोराडे यांचा समावेश आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर प्रकरणाचा खुलासा मागवणार असल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
गर्भवती तनिषा भिसे या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली. पैशांअभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबियांचे आरोप फेटाळले असून सदर प्रकाराची रुग्णालयाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\