( artical about promotion ) मार्च आणि एप्रिल महिना म्हटले की कर्मचार्यांना वेध लागतात ते पगारवाढीचे, बढतीचे. आपल्याला घसघशीत पगारवाढ यंदा मिळाली पाहिजे, अशी प्रत्येक कर्मचार्याचीच अपेक्षा असणे साहजिकच. अशावेळी व्यवस्थापनाबरोबरच कर्मचार्यांनीही आपल्या कामाचा, प्रगतीचा मागोवा घेणे क्रमप्राप्त ठरते. त्याविषयी सविस्तर...
द्रीय अर्थसंकल्प सादर होऊन नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या सुमारास उद्योग-व्यवसाय क्षेत्रात त्यावर विश्लेषण-चर्चा सुरू होती. त्यानंतर उद्योग-व्यवसाय क्षेत्रात तयारी सुरू होते, ती नव्या आर्थिक वर्षातील नव्या आर्थिक गणितांसह नव्या व्यवसाय नियोजनाची व त्यानुसार योजना आखणीची. याच काळात कंपनी व कर्मचारी स्तरावर पण एका महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा सुरू होते व हा विषय असतो कर्मचार्यांची पगारवाढ व बढतीचा. कंपनीच्या दृष्टीने हा मुद्दा व्यावसायिक धोरणात्मक निर्णयांसह व्यावसायिक व व्यक्तिगत स्तरावर विविध संदर्भातील गुंतवणुकीचा असतो, तर कर्मचार्यांच्या दृष्टीने त्यांनी वर्षभर केलेल्या कामकाजाचे नेमके मूल्यमापन करून त्यानुसार त्यांच्या पगारवाढ व बढतीच्या संदर्भात जिव्हाळ्याचा ठरतो. म्हणूनच कर्मचार्यांच्या पगारवाढ व बढती, पदोन्नती हे मुद्दे उद्योग-व्यवसायात उभयपक्षी महत्त्वाचे ठरतात.
यासंदर्भात मूलभूतदृष्ट्या पाहता असे लक्षात येते की, कंपनीतील कर्मचार्यांची त्यांचे कामकाज, कामाच्या संदर्भातील जबाबदारी, भविष्यातील कामाचे स्वरूप व त्यातून संबंधित कर्मचार्याची करिअर विकासासह आर्थिक प्रगती इत्यादीचा थेट व प्रत्यक्ष संबंध त्यांच्या कामाचे मोजमाप व बढती व पदोन्नतीशी असतो, तर कंपनी व्यवस्थापनाला दुहेरी मापदंडांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. एक म्हणजे, गेल्या वर्षातील व सध्याची व्यापार-व्यवसाय स्थिती, आर्थिक परिस्थिती, शासकीय व व्यावसायिक धोरणाचे होऊ घातलेले प्रमाण आणि परिणाम महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच व्यवस्थापनाला या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांची पगारवाढ व बढती याबद्दल साधक-बाधक विचार करून निर्णय घ्यावे लागतात.
कर्मचार्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे व मोठे मुद्दे म्हणून व्यक्तिगत स्तरावर कर्मचार्यांची पगारवाढ व त्यांची बढती-पदोन्नतीकडे पाहिले जाते. ते स्वाभाविकपण आहे. मात्र, त्यासंदर्भात संबंधित कर्मचार्याने आपल्या कामाचा मागोवा घ्यायला हवा. यासाठी खालील मुद्दे उपयुक्त ठरू शकतील.
प्रगतीची मानसिकता : यासंदर्भात सर्वांत मोठा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचारी म्हणून संबंधित व्यक्तीमध्ये आपल्या करिअर-प्रगतीची वाढ कितपत आहे? ही बाब यासंदर्भात अधिक महत्त्वाची ठरते. कारण, कंपनी व्यवस्थापनाकडून कर्मचार्याच्या कामकाजासंदर्भात उद्दिष्टपूर्तीची अपेक्षा असते.
यासाठी व्यवस्थापन स्तरावर व त्याचप्रमाणे कर्मचार्यांसाठी वैयक्तिक स्तरावर संबंधित कालावधी व आर्थिक वर्षात गाठण्यासाठी काही उद्दिष्टे विविध पातळींवर व विविध स्वरूपात निश्चित केली जातात. आपल्याशी व आपल्या कामाशी संंबंधित उद्दिष्टे कर्मचारी कशी, कितपत व कशाप्रकारे वा पद्धतीने पूर्ण करतात, यावरच संबंधित कर्मचार्याच्या कामाचे वार्षिक मूल्यमापन केले जाते. हे सारे होण्यासाठी कर्मचारी म्हणून प्रत्येकाचे आपले मुख्य उद्देश व कामकाजाचे टप्पे समजून घेणे आवश्यक असते. यालाच जर प्रयत्न, जिद्द व प्रयोगशील धडपडीची जोड दिली, तर त्यातून कर्मचार्याची प्रगतीविषयक मानसिकता तयार होऊ शकते.
करिअरविषयक प्रगतीची गती : वर नमूद केल्याप्रमाणे कर्मचार्याच्या वैयक्तिक प्रगतीविषयक इच्छा, आकांक्षांना गतिमानतेची जोड मिळायला हवी. सध्याच्या स्पर्धात्मक व गतिमान काळात प्रत्येकाचे प्रयत्नसुद्धा गतिमान असायला हवे. त्यासाठी कर्मचारी स्तरावर आपल्या प्रयत्नांना प्रयोगशीलता, कौशल्यवृद्धी, संशोधन, सक्षम कामकाज इत्यादींची जोड दिल्यास कर्मचार्यांची करिअर वाढीसह प्रगतीसुद्धा तुलनेने लवकर होऊ शकेल.
कामात पुढाकार : प्रत्येकाच्या कामाकाजाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात व्यक्तिगत स्तरावर कर्मचार्याने पुढाकार घेण्यावर बर्याच बाबी अवलंबून असतात. यामध्ये वाढत्या व नव्या प्रकारच्या कामाचा समावेश असू शकतो. या नव्या व प्रसंगी आव्हानपर कामांचा स्वीकार करून प्रसंगी त्यासाठी पुढाकार घेणार्यांची व्यवस्थापक व व्यवस्थापनातर्फे वेगळ्या पद्धतीने नोंद घेतली जाते. यातून वरिष्ठांना विश्वास व स्वतःचा आत्मविश्वास वाढत असल्याने व्यक्तीच्या पुढाकार घेण्याची पद्धती व मानसिकतेवरच बर्याच गोष्टी अवलंबून असतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
कामाची नोंद आणि दखल : कर्मचारी म्हणून आपल्या नित्याच्या व दैनंदिन कामाशिवाय नवी व विशेष उल्लेखनीय कामे करणार्यांच्या कामगिरीची नोंद वेळेत, योग्य प्रकारे व योग्य स्तरावर घेतली जाणे महत्त्वाचे ठरते. यासाठी व्यक्तिगत स्तरावर प्रयत्न पूरक ठरतात. त्यामुळे विशेष कामगिरी वा उद्दिष्टपूर्तीची वा यशस्वी प्रयोग प्रयत्नांची मांडणी करण्याचे व त्यासंदर्भात आपल्या वरिष्ठांना वेळेत सूचित करणे फायद्याचे ठरते. त्यासाठी विशेष प्रयत्न वा परिश्रम करावे लागतात. या सार्याची योग्यप्रकारे नोंद आणि दखल कर्मचार्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरते.
परिश्रमांची परिणामकारकतेशी सांगड : सध्याच्या काळात कामाच्या ठिकाणी केवळ परिश्रम घेणेच पर्याप्त नसते, तर त्याला परिणामकारक बनविणे तेवढेच आवश्यक असते. यामध्ये कामाच्या अचूकतेतून आत्मविश्वास निर्णयक्षमतेतून नेतृत्व निर्मिती, चोखंदळपणा वापरून दर्जात्मक काम बनविणे, संवादातून प्रभावी सादरीकरण, वारंवारचे वादविवाद टाकून आपली स्वीकारार्हता वाढविणे, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असणे, अंतर्गत विवादांमध्ये अनावश्यक गुंतवून न घेणे हे मुद्दे लक्षात ठेवून त्यानुरूप काम करणारे कामाच्या संदर्भात इतरांच्या तुलनेत अधिक परिणामकारक ठरतात व ही बाब त्यांच्या प्रगतीला पूरक ठरते.
परस्पर संबंध व संपर्क : कामाची प्रक्रिया व प्रत्यक्ष कामकाज यामध्ये परस्पर संबंधांना फार महत्त्व असते. कार्यालयीन कामकाज असो, सेवा क्षेत्र अथवा उत्पादन प्रक्रिया असो, तेथील ज्ञान-तंत्रज्ञानाला परस्परपूरक संबंधांची जोड फार गरजेची असते. हे काम सोपे वाटत असले, तरी सहजशक्य नाही. त्यामुळे ज्या निवडक व्यक्ती आपले व इतरांचे कामकाजी संबंध चांगले ठेवतात व त्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या कामाचे व काम साकारण्याच्या पद्धतीचे उजवेपण उठून दिसते, सर्वांनाच जाणवते व त्याचा फायदा अशा व्यक्तींना त्यांच्या प्रगतीसाठी पूरक ठरतो.
उपस्थितीचा फरक : विशिष्ट व्यक्ती वा कर्मचारी कामावर असल्याने काय होते, हे तर सर्वांना सहजगत्या कळते. मात्र, अशी व्यक्ती नसल्याने काय होऊ शकत नाही, याचा अनुभव सर्वांना येण्यावरच कर्मचार्यांची व्यक्तिगत स्तरावरील विशेष उपयुक्तता सिद्ध होते. अशा व्यक्तींना केवळ वरिष्ठ वा व्यवस्थापनाकडूनच नव्हे, तर सर्वच स्तरांवर विशेष पसंती वा मान्यता स्वाभाविकपणे मिळते व त्यांच्या बढती प्रगतीच्या संधी पण वाढत जातात.
कामाचा व्याप आणि व्यापकता : कर्मचारी म्हणून व्यक्तिगत स्तरावरच नव्हे, तर व्यवस्थापकांकरवी प्रत्येकाच्या कामाच्या व्यापाची मोजमाप केली जाते. प्रसंगी त्यावर चर्चा करून त्याचे मूल्यांकन केले जाते. मात्र, कर्मचार्यांचा अनुभव जसजसा वाढतो, त्यांची जबाबदारी वाढते व त्यानंतर त्यांच्या कामाच्या व्यापाचीच नव्हे, तर व्यापकतेची चर्चा केली जाते व त्यावरसुद्धा त्यांची पगारवाढ व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलध होतात.
यासंदर्भात थोडक्यात पण तेवढेच महत्त्वाचे म्हणजे, अपेक्षित पगारवाढ असो की, प्रतीक्षित बढती, पदोन्नती ही बाब प्रत्येकासाठी महत्त्वाची व तेवढ्याच जिव्हाळ्याची असली, तरी ती मागून मिळत नाही. त्यासाठी स्वतःच्या परिश्रम-प्रयत्नांना संबंधितांची साथ, मार्गदर्शन घ्यावेे लागते. त्याला पण कर्मचार्याची काम करण्याची पद्धत व विशेष उल्लेखनीय उद्दिष्टपूर्ती यांची वेळेत जोड द्यावी लागते व असे झाल्यास बढतीच्या संधी मिळू शकतात.
दत्ताञय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
9822847886