पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षणमंत्र्यांसह तिन्ही सेनादलप्रमुखांशी चर्चा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशीही पंतप्रधानांची चर्चा
30-Apr-2025
Total Views | 10
नवी दिल्ली: (Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल, सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग उपस्थित होते. ही बैठक सुमारे दीड तासांहून अधिक काळ चालली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादाला योग्य उत्तर देणे हा आपला दृढ राष्ट्रीय संकल्प आहे.
पंतप्रधान मोदींनी भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र दलांना प्रतिसादाची पद्धत, लक्ष्यांची निवड आणि वेळेसह ऑपरेशनल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितल्याचे समजते.पंतप्रधानांच्या निवासस्थानी सायंकाळी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतदेखील दाखल झाले होते. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालकांमध्येही साधारणपणे अर्धा तास चर्चा झाली, असे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयातही मंगळवारी दुपारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला ‘सीमा सुरक्षा दला’चे (बीएसएफ) महासंचालक दलजित सिंग चौधरी, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) प्रमुख भृगु श्रीनिवासन, ‘आसाम रायफल्स’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा, सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) अतिरिक्त महासंचालक अनुपमा नीलेकर चंद्रा यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’चे (सीआयएसएफ) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहसचिवांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोठा धडा शिकवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला आहे. भारताने पाकची पाणीकोंडी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरही राजनैतिक दृष्टिकोनातून पाकला एकटे पाडण्यात भारतास यश आले आहे. त्यानंतर आता पाकविरोधात कोणती लष्करी कारवाई होणार, याकडे संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत सध्या उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे.
आज ‘सीसीएस’, ‘सीसीईए’ आणि ‘सीसीपीए’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारीदेखील एका पाठोपाठ एक उच्चस्तरीय बैठकांच्या अध्यक्षस्थानी असतील. आज प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची (सीसीए) बैठक होईल. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थविषयक समितीची (सीसीईए) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीचीही (सीसीपीए) बैठक होणार असल्याचे समजते.