कला आणि आयुर्वेद यांच्या सहकार्याने देशाचे काम करण्याचे स्वप्न पाहणार्या डॉ. तेजस लोखंडे यांच्याविषयी...
गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची ज्यांच्यापाशी एकीकडे पारंपरिक औषधशास्त्रातील निपुणता, तर दुसरीकडे मनाला भुरळ घालणारी कला आहे. आयुर्वेदाशी नातं जोडलेले आणि रंगरेषा, अभिव्यक्तीच्या माध्यमातून रुग्णांच्या वेदना समजून घेणारा एक संवेदनशील वैद्य. कला आणि वैद्यकशास्त्र या दोन्ही प्रवाहांचे सुंदर संगमस्थान म्हणजेच, डॉ. तेजस लोखंडे होय. डॉ. तेजस यांनी उपचार या संकल्पनेला केवळ औषधांपुरती मर्यादा न घालता, ती एक अनुभवात्मक प्रक्रिया म्हणून साकारली आहे.
तेजस यांचा जन्म मूळचा मुंबईतील गिरगावचा. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गिरगावातील ‘मित्तल आयुर्वेद महाविद्यालया’त तेजस यांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मापासूनच त्यांची आयुर्वेदाशी नाळ जोडली गेली, ती कायमचीच. नऊ महिने आईवडिलांबरोबर बाललीला केल्यानंतर, आजोबांच्या सल्ल्याने उल्हासनगर इथे तेजस यांना आत्याकडे पाठवण्यात आले. पुढे शालेय शिक्षण आत्याकडेच पूर्ण झाले. आत्याच्या मुलांमध्येच तेजस बाळसे धरत होते.
तेजस यांच्यातील कलेची आवड बालपणापासूनच दिसत होती. शालेय अभ्यासामध्ये कायमच 80 टक्क्यांच्या वर गुण कमावणार्या तेजस यांच्यातील कलेला, शालेय जीवनापासूनच गती मिळाली. शाळेमध्ये फळ्यावर लिहिणार कोण? असा प्रश्न निर्माण होताच तेजस यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे, फळ्यावर लिहिण्याची उत्तम तयारी शालेय जीवनातच झाली. कलाकारासाठी आवश्यक असणारे गुण तेजस यांच्यापाशी होतेच, त्यामुळे अल्पावधीतच वर्गातील फळा ते शालेय कार्यक्रमातील माहितीफलक सजवणे ही मजल मारली. तसेच, तेजस यांना रांगोळी काढण्याचीही आवड होती. तेजस यांची बहीण उत्तम रांगोळी काढते असे.
त्यावेळी तेजस ताईकडे रांगोळी काढण्याचा हट्ट करत. म्हणून तेजस यांना त्यांच्या ताईने, त्यांची स्वतंत्र रांगोळीची लादी दिली. तिथे तेजस यांना रांगोळीमध्ये, स्वतःची हक्काची जागा मिळाली. त्यानंतर तेजस यांनी गालिचा रांगोळी, सुलेखन रांगोळी, थ्रीडी रांगोळी अशा रांगोळीमधील अनेक प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले.
इयत्ता दहावीच्या पूर्वपरीक्षेदरम्यान तेजस यांना पितृशोक झाला. त्यामुळे, दहावीनंतर अकरावीसाठी तेजस पुन्हा स्वगृही परतले. अकरावीमध्ये गेल्यावर तिथल्या वातावरणात कसे जमवून घेता येईल? असा प्रश्न तेजस यांच्या मनामध्ये होता. मात्र, हा प्रश्न फारच किरकोळ होता, हे महाविद्यालयात गेल्यावर तेजस यांच्या लक्षात आले. तिथे गेल्यावरही, अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. तसेच दोन एकांकिकांमध्येही काम करण्याचा अनुभव तेजस यांना आहे. पुढे तेजस यांनी आवड म्हणून, वैद्यकीय शिक्षण घेण्याचे निश्चित केले. पहिल्या फेरीत त्यांना सातार्याचे आयुर्वेदिक महविद्यालय मिळाले. पण, ते नाकारून आधुनिक वैद्यकीय क्षेत्रासाठी तेजस यांनी पुन्हा वर्षभर अभ्यास केला.
मात्र, नशिबाला काही वेगळेच मान्य होते. दुसर्या वर्षीही त्यांना आयुर्वेदाचाच पर्याय उपलब्ध होता. आयुर्वेदाविषयी मनामध्ये अनेक प्रश्न असल्याने, सुरुवातीला मन कचरत होते. मात्र, आयुर्वेदाच्या शक्तीचा अनुभव तेजस यांना काविळ झाली तेव्हा आला. त्यानंतर तेजस यांनी, पूर्णकाळ आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. आज तेजस उत्तम आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. एकीकडे अंगामध्ये असणारी कला आणि दुसरीकडे वैद्यक शास्त्राचे ज्ञान, यांचा उपयोग तेजस यांना त्यांच्या रुग्णचिकित्सेमध्ये होऊ लागला. शरीरस्वास्थ्यामध्ये आत्मा आणि मन यांच्या आनंदाचाही समावेश आहे. म्हणून औषधोपचारांबरोबर रुग्णाला आनंदी करेल, असे आवडीचे काही करण्याचा सल्ला तेजस रुग्णांना देऊ लागले. त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम त्यांना दिसून आले.
स्वतःमधील कला जपण्यासाठी, तेजस गिरगावच्या गुढीपाडवा शोभायात्रेमध्ये रांगोळी काढण्याचे गेली कित्येक वर्षे कार्य करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सल्ल्याने आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने, ’गालिचा रांगोळी’चे देशातील पहिले प्रदर्शन तेजस यांनी यशस्वी करून दाखवले. ‘कोविड’ काळात तेजस यांनी ‘डिजिटल दिंडी’ या उपक्रमाद्वारे अभंग आणि सुलेखनाच्या माध्यमातून, घरात राहूनच सर्वांना कलेतून भगवंताचे दर्शन घडवले होते. या उप्रक्रमालादेखील मोठा प्रतिसाद मिळाला. याच ‘कोविड’काळामध्ये तेजस यांनी, ऑनलाईन पद्धतीने मोडी लिपीचे ज्ञान घेतले. मात्र, नित्याचा सराव नसल्याने कालौघात त्याचे विस्मरण झाले.
मोडी लिपीमुळे आपला इतिहास समजायला छान मदत होते, हे लक्षात आल्याने तेजस यांनी पुन्हा मोडीचे ज्ञान घेत, महराष्ट्र पुरातत्त्व विभागाची मोडी विषयाची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मोडी लिपीच्या मदतीने तेजस यांनी सध्या बाजारामध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील चुका शोधून, खरी राजमुद्रा देवनागरी आणि मोडी अशा दोन्ही लिपींमध्ये विक्रीसाठी आणली आहे. विशेष म्हणजे, हे सारे ते व्यवसाय म्हणून न करता विक्रीतून होणारा नफा, विविध गडसंवर्धन मोहिमा किंवा इतिहासाच्या प्रसारासाठी कार्य करणार्या संस्थांना देणगी देण्यासाठी वापरतात. तेजस यांनाही गडमोहिमांची प्रचंड आवड आहे. जशी गडमोहिमांची आवड तेजस यांनी जपली आहे, तशी आयुर्वेदाच्या माध्यमातून जनसेवादेखील ते करतात.
‘वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून वारी असो वा अन्य धार्मिक क्षेत्रांमध्ये समाजसेवेचे कार्यही, तेजस मोठ्या तन्मयतेने करतात. ‘या भारतभूमीचे आपण सारेच देणे लागतो’, हा स्वातंत्र्यवीर सावकरांचा विचार अमलात आणून, कला आणि आयुर्वेद यांच्या सहकार्याने देशाचे काम करण्याचे स्वप्न पाहणार्या डॉ. तेजस लोखंडे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर