दुधाने तोंड पोळले की, ताकदेखील फुंकून पिले जाते. पण, उद्धव ठाकरे त्याला अपवाद! कारण, लांगूलचालन करून अनेकदा तोंड पोळल्यानंतरही त्यांना शहाणपण आलेले नाही. लोकसभेत ‘व्होट जिहाद’ करून नऊ जागा काय मिळवल्या, त्यांना हिंदू नकोसेच झाले. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या बळावर शिवसेनेचा डोलारा उभा केला, त्यांच्या पुत्राने हिंदुत्व सोडणे, मतदारांना मानवेल कसे? त्यांनी विधानसभेत ‘उबाठा’ला धडा शिकवला. विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील उद्धव ठाकरेंना जाग येत नाही, याचा अर्थ ते ‘सोंग’ घेत असावेत! किंवा हिरव्या मतांशिवाय आपण राजकारणात टिकूच शकत नाही, अशी त्यांची धारणा झाली असावी, अन्यथा वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान करण्याचे आदेश त्यांनी दिले नसते.
असो, त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ. पण, वक्फविषयीच्या भूमिकेवरून तत्काळ स्पष्टीकरण देण्यासाठी मीडियात जावे लागणे, हा त्यांच्या राजकीय नीतीचा पराभव नव्हे काय? बरे, ‘अमेरिकेने आयात शुल्क लावले हे कळू द्यायचे नाही म्हणून वक्फचा विषय आणला गेला’ असाही हास्यास्पद दावा त्यांनी केला. मुळात वक्फ विधेयकावर निर्णय घेण्यासाठी वर्षभरापूर्वी संसदेच्या संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली, त्यात यांच्या पक्षाच्या खासदाराचाही समावेश होता, हे सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. ‘वक्फ बोर्ड आणि हिंदुत्ववाचा काय संबंध?’ असा सवालही त्यांनी विचारला. पण, ते ज्या मातीत जन्मले, त्या महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी एक लाख एकर क्षेत्रावर वक्फने अवैधरित्या कब्जा केल्यानंतरही त्यांना असे प्रश्न पडणे, म्हणजे मूर्खपणाचे लक्षण.
मुख्यमंत्रिपदावर असताना हिंदू मंदिरांना टाळे लावणार्या, पण लांगूलचालनापोटी मशिदींना मोकळीक देणार्यांकडून अपेक्षा तरी काय करणार? वक्फवाल्यांनी ‘मातोश्री’वर दावा केला असता, तर यांचे डोळे उघडले असते. पण, त्यांच्या नशीबाने मोदी-शाहंनी तसे होऊ न देण्यासाठी वेळीच खबरदारी घेतल्यामुळे ते निर्धास्त असावेत. मात्र, ज्या गरीब हिंदूंच्या जमिनी ‘वक्फ’च्या आडून लाटण्यात आल्या, त्यांच्या आसवांची किंमत उद्धव ठाकरेंच्या लेखी शून्य असल्याचे यानिमित्ताने उघड आले. असल्या बेगडी राजकारण्यांपासून सावधान!
राऊतांची पोपटपंची
एक खोटे लपवण्यासाठी हजारवेळा खोटे बोलावे लागते, असे म्हणतात. हल्ली उबाठाचे नेते दररोज तेच करताना दिसतात. आतापर्यंत त्यांच्यावर हिंदुत्व त्यागल्याचा आरोप होत होताच, ‘वक्फ विधेयका’विरोधात मतदान करून त्यांनी त्याला पुष्टी दिली. त्यांच्या या कृतीमुळे पक्षात पूर्णतः असंतुष्टी पसरली. लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. पक्षप्रमुखांच्या भूमिकेविरोधात अनेकांनी संताप व्यक्त करीत थेट राजीनाम्याची भाषा सुरू केली. त्यामुळे सारवासारव करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंना माध्यमांसमोर यावे लागले. हे होते ना होते तोच, संजय राऊतांनी माती खाल्ली. काँग्रेसने मिळवून दिलेले स्वातंत्र्य भाजपला चालते का? असा सवाल करीत, त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला बेदखल केले.
‘वक्फ’बाबत ‘उबाठा’ची भूमिका कशी योग्य आहे, हे पटवून देण्याच्या नादात राऊतांनी समस्त भारतवासीयांच्या आस्थेचा अपमान केला. भारताला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिल्याचा दावा त्यांनी केला. वसाहतवादी राजवटीविरोधात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान ते विसरले. बहुदा ‘हायकमांड’ला खुश करण्याच्या नादात त्यांनी मुद्दाम हे विधान केले असावे. झाशीच्या राणीपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अगदी महात्मा गांधींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान त्यांनी दुर्लक्षित केले. राऊतांच्या बोलण्याने या महनीय व्यक्तींचे कर्तृत्व झाकोळले जाईल, अशातला भाग नसला, तरी एखाद्या खासदाराने, त्याउपर एखाद्या संपादकाने असे विधान करताना तारतम्य बाळगायला हवे.
बरे, राऊतांची लाडकी काँग्रेस ज्या महात्मा गांधींना आदर्श मानते, त्यांनी तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस बरखास्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने प्रामुख्याने सामाजिक कार्यावर भर द्यावा, या मताचे ते होते. पण, सत्तेच्या हव्यासापोटी गांधी यांचा आदेश धुडकावण्यात आला. तब्बल 60 वर्षे राज्य करून ज्यांनी भारत पोखरून काढला, त्यांची भलामण करण्यासाठी संजय राऊत स्वातंत्र्यसैनिकांचा उपमर्द करीत असतील, तर उबाठा सैनिकांनीच त्यांना धडा शिकवायला हवा, अन्यथा हे प्रकरण स्वतःसोबत उरला सुरला पक्षही बुडवेल!