नासदीय सूक्तात सृष्ट्यारंभीचे सुंदर शब्दातीत, परंतु प्रत्यक्ष अनुभूतीला धरून केलेले वर्णन वैदिक ऋषिंशिवाय कोण करणार? अवस्थारहित अवस्थेत, म्हणजेच ब्रह्मावस्थेकडे घेऊन जाणारी व त्यातच साधकाला ठेवणारी अवस्था म्हणजे ब्रह्मास्त्र होय. अस्त्र या शब्दात रक्षण करणे, असा भावार्थ आहे. असे असता ब्रह्मास्त्र म्हणजे विद्ध्वंसक अस्त्र अशी कल्पना करून, ब्रह्मास्त्रामुळे सर्व सृष्टीचा नाश होतो, अशी कल्पना करणे चुकीचे आहे. भौतिक अर्थाने मात्र खरे आहे. कारण ब्रह्मास्त्र लागलेला साधक म्हणजे, ब्रह्ममय झालेल्याला भौतिक जीवनात मुळीच रस राहात नाही. असा श्रेष्ठ ब्रह्मविद् साधक संसारातून उठून जातो. भगवंत भागवतातील दुसर्या अध्यायात म्हणतात, ॥यस्यानुग्रहमिच्छामि तस्य वित्तं हराम्यहम्॥
आशय असा की ज्यावर मी अनुग्रह करतो, त्याचे सर्वस्व मी हरण करतो. धन, धान्य, पुत्र, कीर्ती, मान इत्यादी. म्हणूनच सर्व खरे साधुसंत, महात्मे, योगी आयुष्यभर दैन्यात, कष्टात, कीर्तीरहित व अवहेलनेत राहतात. परमेश्वराची कृपा आणि वित्त, कीर्ती, सुखोपभोग यांची एकत्र प्राप्ती शक्य नाही. असल्या श्रेष्ठ अवस्थेत साधकाला घेऊन जाणारे ब्रह्मास्त्र, त्याच्या सर्वस्वाचा (भौतिक मायेचा) नाश करेलच!
अस्त्रांचा खरा अर्थ
महाभारत वा रामायणातील सर्व अस्त्रांचा खरा आशय आपण समजतो, त्यापेक्षा भिन्न आहे. अस्त्र याचा अर्थ संहार नसून, त्या अवस्थेचे रक्षण करणे होय. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्ममय अवस्थेचे रक्षण, अगन्यास्त्र म्हणजे अग्नि तत्त्व वा तेजस तत्त्वाच्या साधनेचे सातत्य होय. वायव्यास्त्र म्हणजे, वायू तत्त्व वा प्राणांचे रक्षण करणारी अवस्था, तर पर्जन्यास्त्र म्हणजे, आप अर्थात जल तत्त्व अवस्थेचे साधकात अधिक काळ सातत्य ठेवणे होय. सर्वसाधारण कल्पना अशी आहे की, युद्धात या अस्त्रांचा प्रयोग केल्याने सर्वनाश (ब्रह्मास्त्र), वायव्यास्त्र म्हणजे वायूचा प्रकोप, अगन्यास्त्र म्हणजे अग्नीचे तांडव व पर्जन्यास्त्र म्हणजे पावसाचे भयानक नर्तन होय. परंतु, हा त्याचा खरा अर्थ नाही. मध्यंतरीच्या काळात केवळ पांडित्याच्या मागे लागून योगसाधनेकडे, ध्यानधारणेकडे पाठ फिरविल्यामुळे या महान योगशास्त्राच्या राज्यातील रहस्य कळणे कठीण झाले. मग ज्यांच्या बुद्धीला जे तर्क सूचतील, तसे ते अर्थ लावले गेले. अस्त्र म्हणजे रक्षण करणे होय, विद्ध्वंस नव्हे. सर्व अस्त्रांचा अर्थ आध्यात्मिक यौगिक आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ब्रह्मास्त्र म्हणजे सर्व वस्तुजात नष्ट करून, त्यापलीकडील चिरंतन ब्रह्मपद देणारी अक्षय गती! मग ती सर्वच नष्ट करणारी उलट गती राहणारी नाही काय? संत मीराबाई त्या ब्रह्मास्त्राचे आपल्या भाषेत वर्णन करतात, “उलट भई मोरे नयनन की। मोरी लागी लटक गुरू चरनन की।” त्या अक्षय ब्रह्मगतीला गेल्यावर, या जडसंसाराकरिता कोणी शिल्लक राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे न ये परते। तुझ्या दर्शने मागुते॥” भगवद्गीता त्या ब्रह्मास्त्राचे वर्णन करते, “यद्गत्वा न निवर्तते तद्धाम परमं मम।” तेथे गेल्यावर मग कोणी परत येत नाही. सर्वस्वाचा होम म्हणजे ब्रह्मास्त्र होय.
मृत्यू का येतो?
जडशरीराला मृत्यू का येतो? हा एक स्वतंत्र आणि विशाल विषय आहे. जे जे जन्माला आले अथवा उत्पन्न झाले, ते नष्ट होणार हा प्रकृतीचा नियम आहे. कवी कालिदास तर अगदी उलट सांगतात की, मृत्यूच प्राकृतिक आहे आणि जिवंत राहाणे विकृती आहे. “मरणं प्रकृतिः शरीराणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधै। (रघुवंश 8/87)” नारद म्हणतात, “स्वयंकृत्वा प्राणहरा प्रजानां मृत्युं ज्ञात्वा निश्चयं ब्रह्मसृष्टम्। (द्रोणपर्व)” त्यामागील विज्ञान काय असावे? बंदुकीतून निघणारी गोळी ज्या आवेगाने बंदुकीतून बाहेर पडेल, त्या आवेगानुसार ती काही काळ अंतर कापून जाईल. पण तो आवेग कमी झाला की, ती हळूहळू कर्षणामुळे खाली येणार आणि पृथ्वीवर पतन होणार. हा जसा सृष्टीनियम आहे, तद्वत् या जडशरीराचे आहे. पूर्व जन्मातील कर्मांचा भार, इहजन्मातील आवेग आणि प्रकृतीतील योगसंयोगामुळे जडशरीर योग्य तितका काळ टिकते, जिवंत राहते. तो आवेग ती भरपाई पूर्ण झाली की, शरीरस्थ जीवात्म्याला त्याच मार्गाने त्याच्या गतीने परत जावे लागते. या परतीच्या प्रवासाला मरण म्हणतात. एखादा दगड वर हवेत फेकल्यावर तो परत येणारच आणि पृथ्वीवर पडणारच; तद्वत् शरीराचे आहे. सर्व गती मंडलाकार असल्याने, ती उलटमार्ग केव्हा ना केव्हा स्वीकारणारच!
साधारणांचा मृत्यू त्यांची जीवनगती मंद झाल्यामुळे होते. शरीर झगडून झगडून हळूहळू क्षीण होत जाते. जगात इतर गतीसुद्धा असल्याने, त्या गतीच्या विरोधामुळे व्यक्तीची गती क्षीण होऊन मृत्यू येऊ पाहतो. अशांचे शरीर अतिशय क्षीण बनून थकते, अपघाती बनते आणि ते मृत्यूची शिकार होते. अज्ञानामुळे अशांना त्यांचे मृत्यूनंतर जीवन कळत नसते. कवी तांबे म्हणतात, “अशास ये मृत्यूही मृत्यूहीन?” बरेच लोक अशा तर्हेने मृत्यूहीन मृत्यू मरतात. आकाशात सैनिक विमानातून छत्री (पॅराशुट) घेऊन उडी मारतात. काही काळ हवेत कोलांटी उड्या घेतल्यावर, ते हळूच आपली छत्री (पॅराशुट) उघडतात व त्या छत्रीच्या भरवशावर आरामात खालची सुंदर दृश्ये पाहात, पृथ्वीवर पाय ठेवतात. पण जे त्या कोलांटी उडी मारताना बेशुद्ध होतात व त्यांना छत्री उघडण्याचे भान न राहिले नाही, तर ते मूर्च्छावस्थेत म्हणजे अज्ञानातच पृथ्वीवर पतन पावतात आणि मरतात. अज्ञानी माणूस मृत्यूनंतर जीवन आणि मृत्यूचे कारण न जाणताच मरतो, तर ज्ञानपूर्ण साधक मरताना व मेल्यानंतर सावध असल्यामुळे, त्यातील ज्ञान जाणतो.
श्रेष्ठ पुरुष त्यांच्या जीवनाचे रहस्य जाणत असल्यामुळे, ते विशिष्ट कार्याकरिताच जगतात. कार्य संपल्यावर स्वेच्छेने ते परत जातात. 100 वर्षे जगणे ज्यांचे ध्येय नसते, तर नियत कार्य लवकर संपवून ते लवकरात लवकर निघून जातात. त्यांचे मरणाचे बाह्य कारण मग कोणाला काहीही दिसो. योगेश्वर ज्ञानेश्वर महाराज तर अवघ्या 21व्या वर्षी, सर्वांसमक्ष आपले जडशरीर पाषाण समाधीत ठेवून समाधिस्थ झाले. आद्य शंकराचार्य 32व्या वर्षी गुहेत गेले व ब्रह्मरूप झाले. संत तुकाराम 42व्या वर्षी आपला देह पंचमहाभूतात विलीन करून, स्वतः वैकुंठात स्थिर झाले. ‘विगतः कुण्ठः अस्य वैकुण्ठः।’ म्हणजे जेथे गतीच कुंठित झाली, ते वैकुण्ठ होय. सर्व श्रेष्ठ पुरुष साधारणतः अल्पजीवी असतात. अल्पसंतुष्ट लोक अल्पजीवी राहणार नाहीत काय?
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357