मुंबई : (Disha Salian Case) दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियान यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आधीच्या एसआयटीला चौकशीदरम्यान हा डेटा मिळाला होता. या डेटामुळे, दिशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागे तिच्या वडिलांशी झालेला वाद कारणीभूत होता का, या दिशेने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दिशा सालियनने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली होती का, याचा तपास करताना पहिल्या एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, दिशाला तिचे वडील सतीश सालियन एका महिलेशी बोलत असल्याचा संशय होता, त्यानंतर दिशाने तिच्या लॅपटॉपमध्ये तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपचा ॲक्सेस त्यांच्या नकळत घेतला होता, जेणेकरून तिचे वडील कोणाशी बोलतात आणि काय करतात हे तिला कळू शकेल. यावेळी दिशाच्या लक्षात आले की, तिच्या वडिलांनी तिच्या नकळत एका महिलेला ३००० रुपये पाठवले होते. वडिलांनी हे पैसे पाठवल्याने तिला खूप वाईट वाटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २ जून २०२० रोजी दिशाने त्या चॅटच्या आधारे तिच्या वडिलांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर ४ जून २०२० रोजी दिशा घर सोडून मालाड मालवणी येथे गेली. याबाबत दिशाने तिच्या मैत्रिणींशी चर्चाही केली होती.
सतीश सालियन यांनी जबाबात काय म्हटलंय?
दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या मित्रांची चौकशी केली, त्यादरम्यान मित्रांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. दिशाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असेल, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी दिशाचे वडिल सतीश सालियन यांचाही जबाब नोंदवला होता. हाच जबाब आता समोर आला आहे. ज्यात त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा आणि त्यांच्या एका मित्राचा लोणचे बनवण्याचा व्यवसाय होता, त्याचदरम्यान त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला. लोणची बनवण्याचा व्यवसायही फायदेशीर नव्हता आणि सतीश यांच्या मित्राची पत्नी आर्थिक अडचणींमध्ये होती.मित्राची पत्नी असल्याने सतीश सालियान यांना त्या महिलेची खूप काळजी वाटत होती आणि त्यांनी दिशाला तिला पैश्यांची मदत करण्यास सांगितले होते, त्यावर दिशाने आर्थिक अडचण असल्याचे सांगितले होते. पुढे जबाबात सतीश सालियान यांनी म्हटले आहे की, त्यांचे आणि त्यांच्या मित्राच्या पत्नीमध्ये कुठलेही संबंध नव्हते, फक्त माणुसकीच्या नात्याने ते तिला मदत करत होते. यामागे त्यांचा कुठलाही चुकीचा हेतू नव्हता.
पण दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियान यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे आणि डेटा हा चौकशीचा भाग आहे. मात्र, यामुळे दिशा देखील निराशेत असल्याचा दावा पूर्वीच्या एसआयटीने केला होता. मात्र, आत्ता एसआयटीद्वारे पुन्हा एकदा तपास व्हावा, यासाठी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आमदार आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\