भगवती जगदंबेच्या लीलेमध्ये अष्टमातृकांचा उल्लेख येतो. त्यात वाराही देवतेचे स्थान महत्त्वाचे असेच. भगवान साधकाच्या सर्व पीडांचे हनन करून, त्याची अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी वाराही देवता साहाय्य करते. अशा वाराही देवतेचे माहात्म्य आणि तिच्या उपासनेने होणारे लाभ यांचा घेतलेला परामर्श...
विद्या अर्थात शक्ती उपासनेच्या प्रस्थानत्रयीपैकी एक ग्रंथ ‘श्री दुर्गा सप्तशती’मध्ये, शुंभ आणि निशुंभ या राक्षसांशी लढताना महासरस्वतीला साहाय्य करण्यासाठी म्हणून अष्टमातृका आल्याचा उल्लेख आहे. या ‘अष्टमातृका’ म्हणजे माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, ऐन्द्री, कौमारी, नारसिंही, वाराही, चामुंडा. या मातृका या त्या त्या देव अवतारांच्या पत्नी आहेत. शुंभ-निशुंभाशी लढताना देवसुद्धा पराभूत झाले, त्यावेळी महासरस्वती प्रकट झाली. महासरस्वती म्हणजे पार्वतीचे चेतना रूपच होते.
यांपैकी ‘वाराही’ ही देवता, भगवान विष्णूंच्या वराह रूपाचे चेतना तत्त्व अर्थात पत्नी आहे. वराह या अवतारात, पृथ्वी जलमग्न होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून, पृथ्वी आपल्या नाकासामोरील सुळ्यावर तोलून धरली आणि जीवसृष्टीचे संरक्षण केले, असे मानले जाते. वराह हा प्राणी आकाराने छोटा, परंतु अफाट ताकद आणि प्रचंड धाडसी असतो. हा प्राणी सिंहाशीसुद्धा लढायला सहज तयार होतो. याने जर जमिनीत त्याचा सुळा गाडला, तर तो शेतात सरळ खणत जाऊ शकतो. जर वराहाने भुईमुगाच्या शेतावर हल्ला केला, तर सगळी रोपेच उपसून टाकण्याची ताकद त्याच्यात असते. त्याच्या मार्गात येणार्या आव्हानाला थेट धडक देऊन, नेस्तनाबूत करणारी शक्ती म्हणजे वराह. अशा शक्तिशाली प्राण्याला भगवान विष्णूंच्या अवतारात स्थान दिले आहे, ते त्याच्या याच अत्यंत दुर्मीळ गुणांमुळेच. या वराह प्राण्याचे मुख असणारी देवता म्हणजे वाराही. वाराही देवतेला, यमाचे चेतना तत्त्वसुद्धा समजले जाते. हिचे वाहन सुद्धा रेडा असून, ही मृत्यूची देवता म्हणून मानली जाते.
मानवी शरीरात चेतना स्वरूप असणारी कुंडलिनी, निद्रिस्त रूपात मूलाधार चक्रात स्थित असते. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्त्व प्रदर्शित करते. ज्याप्रमाणे वराहाने पृथ्वी आपल्या सुळावर तोलून धरली, त्याचप्रमाणे वाराही देवतेची उपासना मूलाधार चक्र भेदण्यास, जागृत करण्यास साहाय्यभूत होते. एकदा कुंडलिनीला मूलाधार चक्रात जागृत केले की, ती थेट सहस्त्रार चक्राला भेदूनच परत येते. अर्थात, साधकाची उपासना फलित होते. ‘श्रीविद्या-ललिता त्रिपुर सुंदरी’ उपासनेला निर्विघ्न करणारी आणि तत्काळ फलित होण्यास साहाय्यभूत ठरणारी देवता म्हणजे वाराही. सामान्य साधकाने कधीच हिची एकटीची साधना करू नये. ‘श्री ललिता त्रिपुरसुंदरी’च्या उपासनेचा मार्ग निष्कंटक राहावा, म्हणून गुरूच्या मार्गदर्शनाखालीच हिची उपासना करावी.
आध्यात्मिक साधना करणारा साधक नित्य उपासना करत असेल, तर त्याला त्याची आध्यात्मिक प्रगती होत आहे याची जाणीव होऊ लागते. परंतु, त्याचवेळी त्याला वैयक्तिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो. किंबहुना अशा असंख्य नकारात्मक शक्ती, त्याची साधना पाहूनच त्याच्याकडे आकर्षित होतात. हा त्रास मुख्यत्वे श्रीविद्या उपासकांना जाणवतो.
उपासनेच्या मार्गावर असताना, नकारात्मकतेचा किंवा वैयक्तिक आयुष्यात निर्माण होणार्या समस्यांचा कसा सामना करावा? या विवंचनेमुळे तो साधक पथभ्रष्ट झाल्याने, त्याच्या साधनेत खंड पडू शकतो. त्याचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो आणि तो साधना अर्धवट सोडतो. मी अंतःकरणपूर्वक इष्टदेवतेची उपासना करत आहे आणि ती माझा मार्ग प्रशस्त करण्याऐवजी माझ्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे; यामुळे वैफल्यग्रस्त होऊन क्वचित प्रसंगी अशा घटनांमुळे साधक नास्तिकसुद्धा होऊ शकतो. श्रीविद्या उपासकाला गुरूचे पाठबळ असेल, तर गुरूला शिष्याच्या या समस्यांची जाणीव असते. त्यामुळे तो शिष्याला या नकारात्मकतेवर मात करायला शिकवतो.
वाराही ही अष्टमातृकांपैकी पाचवी मातृका आहे. तिला ‘पंचमी’ असेही संबोधले जाते. ती विष्णूच्या वराह अवताराचेच चेतना तत्त्व आहे. ती ललिता त्रिपुर सुंदरी देवीच्या सैन्याची प्रमुख आहे. या देवतेचा वेद, वैष्णव आणि बुद्ध तत्त्वज्ञानातसुद्धा उल्लेख आहे. साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी, या देवतेची उपासना अत्यंत लाभप्रद आहे. या देवतेच्या उपासनेने साधक व्यसनमुक्त होतो, त्याचे चित्त शुद्ध होते.
वाराही देवता वराहमुखी, नीलवर्ण आणि वीरासनस्थित आहे. तिच्या चतुर्हस्त, अष्टहस्त आणि 18 हस्ती स्वरूप प्रतिमासुद्धा आहेत. तिच्या चतुर्हस्त रूपात तिच्या एका हातात नांगर, दुसर्या हातात मुसळ आहे आणि तिच्या इतर दोन हातांची अनुक्रमे अभय आणि वरद मुद्रा आहे. दश महाविद्यांमध्ये, वाराही ही बगलामुखी स्वरूप आहे. ती मानवी शरीरात आज्ञाचक्रात स्थित असते. ती दक्षिण दिशेची स्वामिनी असून, मृत्यूची देवता आहे. तिच्या उपासनेने साधकाचा अहंकार लयाला जातो. साधक निगर्वी, आत्मत्याग करण्याससुद्धा प्रेरित होईल या पातळीवरील त्यागमूर्ती होतो. ती मंत्ररक्षण करणारी देवता आहे. ती मंत्रग्रंथांचे आणि ज्या गोष्टींचे मंत्रांनी संरक्षण होते, अशा सर्व साधनांचेसुद्धा रक्षण करते.
वाराही देवतेची सात रूपे आहेत. उन्मत्त वाराही (तामसी रूप), बृहत वाराही (राजसी रूप), स्वप्न वाराही (सात्विक रूप), किराट वाराही (तामसी रूप), श्वेत वाराही (सात्विक रूप), धुम्र वाराही (तामसी रूप), महा वाराही (सात्विक रूप). अजून दोन फारशी प्रसिद्ध नसणारी, परंतु अत्यंत प्रभावी रूपे आहेत ती म्हणजे, वर्थाली महाविद्या आणि दंडीनी महाविद्या.
स्वप्न वाराही देवता प्रसन्न झाल्यास त्रिकाळ ज्ञान स्वप्नांच्या रूपाने देते. बृहत् वाराही उपासनेने, साधक अत्यंत असाध्य आणि मोठी उद्दिष्टे साध्य करू शकतो. श्वेत वाराही उपासनेने चित्त शुद्ध होते आणि सद्गती प्राप्त होते. महावाराही उपासनेने, अष्ट ऐश्वर्य आणि अष्टसिद्धी प्राप्त होतात. वाराही देवतेच्या उपासनेने कुंडलीतील दोषसुद्धा लय पावतात. ज्या लोकांना प्रसारमाध्यमे, प्रशासन, समाजसेवा अर्थात लोकांशी संबंध येईल अशा क्षेत्रात कार्यरत राहायचे असेल, त्यांनी वाराही देवतेची उपासना करावी. या देवतेच्या उपासनेने, मुख्यत्वे प्रापंचिक पिडांचे हरण होते आणि प्रापंचिक चिंता मिटल्या की, माणूस अधिक ईश्वरसन्मुख होतो. वाराही देवता मेंदूच्या तळाशी असणार्या ‘पिट्युटरी’ ग्रंथीवर नियंत्रण ठेवते. ही ग्रंथीच शरीराला आवश्यक असणारे स्राव-हार्मोन निर्माण करत असते.
या देवतेची उपासना दक्षिणाचार आणि वामाचार या दोन्ही मार्गांनी होऊ शकते. तिला कोणताही नैवेद्य चालतो. बुधवारी तिला धोतर्याचे फुल वाहून पूजन करणे इष्ट. तिचा होम करताना सूर्यफुलाच्या बिया, पांढरी मोहरी आणि तिळाचा वापर करतात. ती वंध्यत्वहारक आहे. त्यासाठी तिला लोणी, डाळिंब, बटाटा आणि तिळाचा वापर केलेले अन्नपदार्थ अर्पण करायला हवे. तिच्या उपासनेचा इष्ट कालावधी, रात्री 12 ते 4चा आहे. वाराही ही एक उग्र देवता आहे. तिची उपासना गुरूच्या मार्गदर्शनाखाली करणे इष्ट. केवळ ललिता देवीच्या उपासनेत विघ्न येऊ नये, या भावनेतून तिची आराधना केल्यास हरकत नाही.
वाराही उपासनेचा अजून एक फायदा सांगतो. आपल्याकडील श्रीविद्या उपासना लोप पावली, तसा इस्लामचा प्रभाव वाढत गेला. आपण परत श्रीविद्या उपासनेकडे जास्तीत जास्त प्रेरित होऊ लागलो, तर आपोआप इस्लाम निष्प्रभ होऊ लागेल. अगदी नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही जिथे दांडिया आयोजित करता, तिथे एक वाराही देवतेची मूर्ती ठेवा आणि आत येणार्या प्रत्येकाला तिचे दर्शन घेतल्याखेरीज दांडिया खेळता येणार नाही, अशी घोषणा करा. तुम्हांला तपासायची गरज नाही.
वाराही देवता ही सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करते. वाराहीची उपासना साधकाभोवती वज्रपंजर निर्माण करून, त्याचे रक्षण करते. वाराही देवता ही समस्त दुष्ट प्रवृत्तींचा संहार करणारे शक्ती तत्त्व आहे. तिच्या चरणी लीन असणार्या साधकांच्या रक्षणाचे कार्य ही देवी करते.
सुजीत भोगले
9370043901