नवी दिल्ली : अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या आयातशुल्क लादण्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे देशातील उद्योगक्षेत्रात खळबळ माजली आहे. अमेरिकेकडून भारतीय मालावर २७ टक्के आयातशुल्क आकारणी करण्यात येणार आहे. केंद्रीय व्यापार मंत्रालयाने याबाबत अभ्यास करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यातून होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल.
व्यापार मंत्रालय हे सध्या भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाच्या निर्यातदारांच्या संपर्कात असून, त्यांच्याकडून यावर अभिप्राय मागवले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या आव्हांनांबरोबरच संधींचादेखील व्यापार मंत्रालय अभ्यास करणार आहे. याआधीही सरकारच्या वतीने देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या आयातशुल्कवाढीमुळे भारत आणि अमेरिका यांच्या द्वीपक्षीय संबंधात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही असे जाहीर केले होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी २०३० सालपर्यंत भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार हा ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यानुसार त्यांनी मिशन ५०० ची घोषणा देखील केली होती. भारत अमेरिकेतील व्यापार वाढावा आणि त्यातून पुरवठी साखळी अधिक मजबूत करावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, त्यानुरुप दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी देखील सुरु आहेत. हे संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
या व्यापारातील काही महत्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा सुरु आहेत, अमेरिका आणि भारत हे जागतिक पातळीवर महत्वाचे व्यापारी भागीदार देश आहेत. त्यामुळे त्याचा फायदा दोन्ही देशांतील जनतेला जास्तीत जास्त करुन देण्यासाठी दोन्ही देश कटीबध्द आहेत असे व्यापार मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.