नवी दिल्ली : उबाठा गटाला हिंदूत्वासोबतच हिंदूंचीही ॲलर्जी होत आहे. आज बाळासाहेब असते तर उबाठा गटाचे भाषण ऐकून त्यांना वेदना झाल्या असत्या, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवार, २ एप्रिल रोजी संसदेत केली. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उबाठा गटाने घेतलेल्या भूमिकेला त्यांनी उत्तर दिले.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "आज सर्वात महत्वपूर्ण दिवस आहे. आधी कलम ३७०, ट्रिपल तलाक, सीएएए आणि आता गरीब मुस्लिम बंधूंच्या उद्धारासाठी वक्फ सुधारणा विधेयक संसदेत आणले आहे. याठिकाणी अरविंद सावंत यांचे भाषण ऐकून खूप वेदना झाल्या. त्यांचे भाषण धक्कादायक होते. आज बाळासाहेब असते तर ते असे भाषण करू शकले असते का? हा प्रश्न उबाठा गटाने आपल्या आत्म्याला प्रश्न विचारायला हवा. गैरमुस्लीम सदस्य वक्फ बोर्डमध्ये नसावे, अशी भूमिका उबाठा गटाने घेतली. मला वाटले होते की, त्यांना फक्त हिंदुत्वाची ॲलर्जी होती. पण आता त्यांना हिंदूंचीही ॲलर्जी होत आहे."
"उबाठा गट कोणती विचारधारा मानतो हे आज स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे आपली चूक सुधारण्याचा आणि आपली विचारधारा जिवंत ठेवण्याची सुवर्णसंधी होती. परंतू, उबाठा गटाने ती संधी गमावली आहे. हिंदूत्वाचे रक्षण करणे आणि इतर धर्माच्या लोकांचा सन्मान करणे ही बाळासाहेबांची भूमिका होती. परंतू, आज बाळासाहेब असते तर उबाठा गटाचे भाषण ऐकून त्यांना वेदना झाल्या असत्या," असे ते म्हणाले.