वैचारिक गुलामगिरी कुठपर्यंत जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण...; केशव उपाध्येंचा हल्लाबोल
03-Apr-2025
Total Views | 39
मुंबई : वैचारिक गुलामगिरी कुठपर्यंत जाऊ शकते याचे ताजे आणि जिवंत उदाहरण म्हणजे उबाठा गट आहे, असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. उबाठा गटाने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यानंतर केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर टीका केली.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, "२८८ विरुद्ध २३२ अशा मतांनी वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. वक्फ बोर्डाच्या कारभारात सुधारणा करणारे आणि मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणणारे वक्फ सुधारणा विधेयक काल रात्री २ वाजता लोकसभेत मंजूर झाले. पण दुर्दैवाने २३२ पैकी ९ मते हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहून राजकारण करणाऱ्या ठाकरे गटाची आहेत. वक्फ दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात त्यांनी मतदान केले. वैचारिक गुलामगिरी कोणत्या सीमेपर्यंत जाऊ शकते याचे ताजे आणि जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेना उबाठा आहे," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या रचनेत महिलांचा तसेच विविध मुस्लिम पंथाचा समावेश करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसेच वक्फ मालमत्तेच्या नोंदणी, ऑडिटिंग आणि खात्यांसाठी केंद्र सरकारला नियम बनवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, ज्यामुळे व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल. वक्फ न्यायाधिकरणांच्या निर्णयांविरुद्ध उच्च न्यायालयात ९० दिवसांच्या आत अपील करण्याची तरतूद करण्यात आली आहे," असे त्यांनी सांगितले.
हा तर उबाठाचा पराभव!
"या विधेयकाला केवळ राजकारणाचे हत्यार म्हणून विरोधक बघत आहेत. यात मुस्लिमांच्या वैयक्तिक कायदे आणि मालमत्तेच्या अधिकारांवर आघात करणारे काहीही नाही, तर वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात सुधारणा होणार आहे. या विधेयकाच्या विरोधात मतदान म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी विचारांचा शिरच्छेद करून आपली विचारधारा काँग्रेसच्या पायावर ठेवणाऱ्या शिवसेना उबाठाचा पराभव आहे आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.