मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भारतीय बाजारात देखील सोन्याच्या भावांनी ९३ हजार प्रतितोळ्याचा दर गाठला आहे. भारतातील सर्वच प्रमुख शहरांत ही दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही दरवाढ झाल्याने यंदा सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार अशी शक्यता तयार झाली आहे.
दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याचे दर ९३ हजार ५३० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट ८५ हजार ७५० रुपयांवर दर पोहोचले आहेत. मुंबईतील दर देखील ९० हजारांच्या पार गेले आहेत. २२ कॅरेट सोन्याचा दर ८५ हजारांच्या पार गेला आहे, त्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर मुंबईत देखील ९३ हजार ५०० रुपये भाव झाला आहे. तिसरे महत्वाचे शहर म्हणजे बंगळूरु शहरात २४ कॅरेट सोन्याच्या दरांनी ९३ हजार तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. सर्वच प्रमुख शहरांत कमीअधिक प्रमाणात हेच भाव आहेत
भारतीय बाजारांत सोन्याच्या भावांनी मोठाच पल्ला गाठला आहे. अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीमुळे सोन्याला ही दरवाढीची झळाळी चढली आहे. त्यामुळे आता ही भाववाढ कमी होणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.