धक्कादायक! दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा; दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू
03-Apr-2025
Total Views | 117
पुणे : आधी १० लाख रुपये भरा मगच रुग्णाला दाखल करून घेऊ, अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ३ मार्च रोजी घडली.
मोनाली सुशांत भिसे असे या महिलेचे नाव असून त्या आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. ७ महिन्याची गर्भवती असलेल्या या महिलेला रक्तस्त्राव झाल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले. दरम्यान, आधी १० लाख रुपये भरा मगच रुग्णाला दाखल करू असे त्यांना रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली असतानाही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्या दुसऱ्या रुग्णालयात गेल्या. तिथे उपचारानंतर महिलेने दोन जुळ्या मुलींचा जन्म दिला. परंतू, रक्तस्त्राव झाल्याने दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, अशा भावना महिलेच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.
"माझ्या स्वीय सहायकांची पत्नी मोनाली सुशांत भिसे गर्भवती असल्याने डिलिव्हरीसाठी दीनानाथ रुग्णालयात गेली. तिच्या पोटात दोन जुळी मुले होती. तिथे तिला तात्काळ १० लाख रुपये भरा, अन्यथा आम्ही दाखल करून घेणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यांची ३ लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही गंभीर शस्त्रक्रिया असल्याने आम्ही दाखलच करून घेऊ शकत नाही, असे सांगितले गेले. त्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही तिथल्या प्रशासनाने ते झुगारून त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे त्यांना धावपळीत दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले. त्या रुग्णालयात उपचारानंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. परंतू, दुर्दैवाने त्या आईचा मृत्यू झाला. दीनानाथ रुग्णालय हे गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवले जाते. पण या रुग्णालयाने अत्यंत गंभीर गुन्हा केला असून अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. माझ्या स्वतःच्या स्वीय सहायकासोबतच असे होत असेल, तर इतर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? येणाऱ्या अधिवेशनात मी हा विषय मांडणार असून मुख्यमंत्री आणि प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे."