विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी मिळणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग यांच्यात सामंजस्य करार
03-Apr-2025
Total Views | 12
मुंबई : विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने उच्च शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी हा सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ प्रमोद नाईक, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ एप्रेंटिसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभागाचे संचालक पी.एन. जुमले,उपसंचालक एन.एन.वडोदे उपस्थित होते. दरम्यान, हा करार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार रुपये मिळणार
नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना एप्रेटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, त्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.