नवी राजधानी वसविण्याची संधी हा दुर्मीळ योग. आता चंद्राबाबूंनी अमरावती येथे नवी राजधानी वसविण्याचा आपला लाडका प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला आहे. अमरावतीला भारतातील ‘एआय’ क्षेत्राची राजधानी बनविण्याची जिद्द त्यांनी बाळगली आहे. तसे झाल्यास उर्वरित आंध्र प्रदेशचे प्रामुख्याने ग्रामीण स्वरूप बदलू शकेल. त्याविषयी...
ध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे एक नशीबवान नेते आहेत. काही वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडल्यानंतर त्यांच्या पक्षाची साथ जनतेनेही सोडून दिली होती. चंद्राबाबू हे आंध्र प्रदेशच्या राजकारणातून जवळपास हद्दपार झाले होते. त्यांचा तेलुगू देसम हा पक्ष पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्राबाबूंनी एक योग्य निर्णय घेतला. तो म्हणजे, भाजप आणि पवन कल्याण यांच्या पक्षाशी निवडणूकपूर्व युती केली आणि नंतर लोकसभा आणि विधानसभेत त्यांना भरघोस यश मिळाले. एकेकाळी राज्याच्या राजकारणात संदर्भहीन बनलेले चंद्राबाबू चक्क पुन्हा मुख्यमंत्री बनले! आता त्यांचे नशीब पुन्हा जोरावर आहे. कारण, मुख्यमंत्री बनल्यामुळे त्यांना त्यांचा लाडका प्रकल्प पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरविता येणार आहे. हा प्रकल्प म्हणजे आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती प्रस्थापित करणे.
राजधानीचे शहर वसविण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळणारी संधी. अशी संधी सहसा कोणाला मिळत नाही. पण, चंद्राबाबू यांना ती दुसर्यांदा मिळत आहे. ते मुख्यमंत्री असतानाच आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण हे नवे राज्य निर्माण झाले. एकत्रित आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद हे शहर होते. पण, ते तेलंगण राज्यात मोडत असल्याने पहिली तीनच वर्षे आंध्र प्रदेशला हैदराबादचा वापर राज्याची राजधानी म्हणून करता आला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या व्हायएसआर काँग्रेसच्या सरकारचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नवी राजधानी वसविण्यात फारसे स्वारस्य नव्हते. चंद्राबाबूंनी आपल्या कारकिर्दीतच अमरावतीला राजधानी वसविण्यास प्रारंभ केला होता. पण, त्यानंतर त्यांची सत्ता गेली आणि पुढील मुख्यमंत्र्यांनी नव्या राजधानीत स्वारस्य दाखविले नाही. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर चंद्राबाबूंनी पुढील तीन वर्षांत अत्याधुनिक अमरावती उभी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
आंध्र प्रदेशचे स्वरूप हे प्रामुख्याने ग्रामीणच होते. हैदराबाद, विशाखापट्टणम अशी दोन-चार शहरे सोडल्यास बहुतांशी आंध्र प्रदेशात विकसित प्रदेशच नव्हते. पण, चंद्राबाबूंकडे व्हिजन आहे. त्यांना आंध्र प्रदेशला देशातील सर्वात विकसित राज्य बनवायचे होते. त्यासाठी त्यांनी हैदराबादला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग प्रस्थापित करण्यास जोरदार प्रयत्न केला. वास्तविक तोपर्यंत बंगळुरु या शहराने भारताची ‘आयटी राजधानी’ हा बहुमान प्राप्त केला होता. इतक्या तगड्या स्पर्धेपुढेही चंद्राबाबूंनी हार मानली नाही आणि हैदराबादमध्ये अनेक ‘आयटी’ कंपन्यांची कार्यालये थाटली. ‘सत्यम’सारखी कंपनी तेथेच होती. तसेच, त्यांनी ‘इंडियन बिझनेस स्कूल’ ही नामांकित शैक्षणिक संस्थाही उभारली. आता हैदराबाद तेलंगणला मिळाल्याने चंद्राबाबूंनी अमरावती येथे नवी राजधानी उभारण्यास प्रारंभ तर केलाच आहे. पण, त्या शहराला भारताच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) क्षेत्राची राजधानीही बनविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
अमेरिकेत कॅलिफोर्निया हे सर्वांत मोठे राज्य. त्यात लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को यांसारखी जगभर नावाजलेली शहरे आहेत. पण, यापैकी कोणतेच शहर हे कॅलिफोर्नियाची राजधानी नाही. ती आहे सॅक्रामेंटो येथे. तीच गोष्ट फ्लॉरिडा राज्याची. तेथे मायामी हे प्रसिद्ध शहर आहे. पण, त्या राज्याचे राजधानीचे शहर आहे तलहस्सी. अमेरिकेने पूर्वीपासूनच प्रस्थापित आणि प्रसिद्ध शहरांना राज्याच्या राजधानीचा दर्जा न देण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यामागे आर्थिक विचार होता. नव्या, अविकसित शहराला राजधानीचा दर्जा दिल्यावर तेथे सर्व आधुनिक सुख-सुविधा आपोआपच निर्माण कराव्या लागतात. सरकारी कार्यालये, विधानसभा, न्यायालये, दळणवळणाची आणि दूरसंपर्काची साधने वगैरे अनेक पायाभूत सुविधा तेथे उभ्या कराव्या लागतात. पाठोपाठ विशाल गृहसंकुले उभी राहतात. मग शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे वगैरेही बांधली जातात. एकूणच त्या साध्या शहराचे रूपांतर एका महानगरात होते. रोजगाराच्या असंख्य संधी तेथे उपलब्ध होतात. लवकरच विकासाची ही गंगा मूळ शहराला लागून असलेल्या आजूबाजूच्या प्रदेशापर्यंत पोहोचते आणि तेथेही नागरिकरणाची प्रक्रिया वेग घेते.
अमरावतीच्या स्थापनेनंतर हीच सारी प्रक्रिया आंध्र प्रदेशच्या अन्य जिल्ह्यांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुळात अमरावती उभी करतानाच लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. पूर्णपणे नव्याने एखादे शहर उभे करण्याचे बरेच फायदे असून, अनेक चुका आपोआपच टाळल्या जातात. रस्ते हे भावी वाहतूक लक्षात घेऊन पहिल्यापासूनच रुंद केले जातात. वाहने उभी करण्याच्या सुविधाही प्रत्येक इमारतीच्या बांधकामात अंतर्भूत होतात. शहराची आखणीही नियोजनपूर्वक केली जाते. निवासी आणि कामाचे विभाग स्वतंत्र केले जातात. नव्यानेच या सुविधा उभ्या राहात असल्याने त्या अत्याधुनिक आणि पुढील 50 वर्षे तरी टिकाऊ राहतात. चंद्राबाबूंना येत्या तीन वर्षांत अमरावती उभी करायची आहे. ती अत्याधुनिक असावी, यासाठी तिच्या नियोजनासाठी त्यांनी सिंगापूर सरकारची मदत घेतली आहे. तेथे त्यांना जागतिक दर्जाचे ‘एआय’ विद्यापीठही स्थापन करायचे आहे. अमरावतीच्या विकासासाठी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे.
चंद्राबाबू हे नशिबवान यासाठी आहेत की, केंद्रात त्यांनी युती केलेल्या भाजपचेच सरकार आहे आणि नेमके या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. परिणामी, त्याला तेलुगू देसमच्या 16 खासदारांचा मोठा आधार वाटतो. चंद्राबाबूंच्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांना त्यांच्या राज्यात हवे ते प्रकल्प राबविण्याची मुभा मिळाली आहे. त्यासाठी केंद्राकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, हे उघड आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अमरावतीच्या उभारणीला हिरवा कंदील दाखविण्यासाठी या महिनाअखेरीस त्या राज्यात जात आहेत.
हिंदू पुराणांमध्ये देवाधिदेव इंद्राच्या राजधानीचे नाव अमरावती आहे. महाराष्ट्रातही अमरावती नावाचे शहर आहे. पण, चंद्राबाबूंना आपल्या राज्यातील अमरावती ही इंद्राच्या अमरावतीपेक्षा ऐश्वर्यसंपन्न करायची आहे. अमरावतीच्या उभारणीचा प्रयत्न गेल्या वेळी त्यांना अर्धवट सोडावा लागला होता. यावेळी तरी त्यांचे नशीब त्यांना साथ देते का, ते पाहायचे!
राहुल बोरगावकर