देव ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे आहे. वेद, शास्त्रेे, पुराणेही देवाचे वर्णन करू शकत नाहीत, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले. परमात्मतत्त्व सर्वत्र संचरले आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, असे आपण म्हणतो. यासंबंधी काही प्रश्न, समर्थ मनाचे श्लोक सांगत असताना, त्यांच्या शिष्याच्या, साधकाच्या मनात निर्माण झाले, असे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
वसे हृदयीं देव तो कोण कैसा।
पुसे आदरें साधकु प्रेष्ण ऐसा।
देहे टाकितां देव कोठें रहातो।
परी मागुता ठाव कोठें पहातो॥194॥
दासबोध हा गुरूशिष्याचा संवाद आहे, असे स्पष्टपणे स्वामींनी दासबोधाच्या सुरुवातीसच नमूद केले आहे. “ग्रंंथा नाम दासबोध। गुरूशिष्यांचा संवाद।” (1.1.2) परंंतु, तसा प्रकार मनाच्या श्लोकांच्या बाबतीत नाही. मनाच्या श्लोकांत समर्थांनी मनाला केलेला उपदेश आहे. अर्थात, तो सर्वांच्या मनासाठी आहे, त्यात समर्थशिष्यही आले. समर्थशिष्य साधक असल्याने, मनात आलेल्या आध्यात्मिक शंका ते गुरूशिवाय आणखी कोणाला विचारणार? तेव्हा श्रोत्यांपैकी एका साधकाने आदरपूर्वक आपली शंका स्वामींना विचारली. साधकाची शंका अशी आहे की, “स्वामी, आतापर्यंत आपण परब्रह्म परावाणीच्याही पलीकडे आहे, त्याला माया, भ्रम स्पर्श करू शकत नाही. ते निर्गुण, निराकार असले तरी भक्ताने त्याला गुणात पाहावे आणि दृश्याच्या कल्पनेचा त्याग करावा, असे सांगितले. ते खरे आहे. पण मग माणसाच्या हृदयात राहातो, तो देव कोण आहे? तो देव म्हणजेच परब्रह्म, तर मग मरणान्ती देह सोडल्यावर, देव कोठे जाऊन राहातो? आणि नंतर पुन्हा दुसर्या देहाच्या आश्रयाने कसा येतो?” साधकाच्या या प्रश्नाचे सामान्य रूप पाहता, त्याला तत्त्वज्ञानातील काही प्रश्नांची उकल हवी आहे. तत्त्वज्ञानातील जे प्रश्न तत्त्वज्ञांना सोडवावे लागतात, ते म्हणजे जन्माला येणारा जीव कोठून येतो आणि मृत्यूनंतर नंतर तो कोठे जातो? थोडक्यात, देवरूपी प्राण कोठून येतो आणि मृत्यूपश्चात कोठे निघून जातो? हा देव, देह सोडून गेल्यावर पुन्हा नव्या देहात कसा जन्म घेतो, इत्यादी.
या प्रश्नांची तर्कशास्त्रीय उत्तरे शोधण्याअगोदर परमात्मतत्त्व, परब्रह्म याच्या साक्षीरूपाने विश्वाचा कारभार कसा चालतो, हे समजून घेतले पाहिजे. परब्रह्माच्या अलिप्तपणातच आत्मतत्त्वाचे रहस्य दडलेले आहे. तथापि, लिप्त-अलिप्त हे शब्द भौतिकतेशी निगडित असल्याने, परब्रह्म स्वरुपाचा भाव त्यातून स्पष्ट होत नाही. उदाहरणादाखल दृष्टान्त द्यायचा, तर सूर्याचे साक्षीत्व सांगावे लागेल. सूर्याच्या उजेडात जगातील व्यवहार होत असले, तरी सूर्याचा त्यांच्याशी संबंध असत नाही. त्याचप्रमाणे परब्रह्म साक्षीभावाने विश्वाचा आधार असले, तरी भौतिक व्यवहारांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असत नाही. आता साधकाच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी पुढील श्लोकातून देत आहेत.
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा।
नभाचे परीं व्यापकु जाण तैसा।
सदा संचला येत ना जात कांहीं।
तयावीण कोठें रिता ठाव नाहीं॥195॥
ह्रदयामध्ये देव राहातो, हे साधकाचे म्हणणे प्रथम स्वामींनी मान्य केले. परंतु, तो देव कसा आहे हे नीट समजले पाहिजे, हे स्वामींनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या हृदयात असणारा देव वेगवेगळा आहे असे मानले, तर मोठीच पंचाईत होईल. श्रीमंताच्या हृदयातील वैभवसंपन्न देव, गरिबाच्या हृदयातील साधासरळ देव, खेळाडूंच्या हृदयातील चपळ देव, राजकारण्यांच्या हृदयातील कावेबाज देव अशी चमत्कारिक स्थिती निर्माण होईल. त्यासाठी समर्थ सांगतात की, हृदयातील देव आकाशाप्रमाणे व्यापक आहे. तोच सर्वत्र संचरला आहे. त्यामुळे त्याला येणे अथवा जाणे संभवत नाही. तो आहे तसाच आहे, त्या ठिकाणीच राहातो. तत्त्वज्ञानाच्या भाषेत याला ‘घट-मठ सिद्धांत’ असे म्हणतात. घट म्हणजे मातीचा घडा. त्याच्या आत आणि बाहेरही आकाश तत्त्व आहे. हा घट फुटला, तर त्याच्या आतील आकाश तत्त्वाचे काय झाले? घटाच्या आतील व बाहेरील आकाश तत्त्व एकच असल्याने, घट फुटला म्हणून आतील वा बाहेरील आकाश तत्त्वावर काहीही परिणाम होत नाही. तद्वत् मठाच्या आतील बाहेरील आकाश तत्त्वावर, मठ पडल्याचा परिणाम होणार नाही. आकाश तत्त्व येत नाही किंवा बाहेर जात नाही. त्याप्रमाणे परमात्म तत्त्वाचा संचार सर्वत्र असल्याने ते हृदयात, तसे बाहेरही आहे.
देह नष्ट झाला, म्हणून ते कुठेही जात नाही किंवा परत येत नाही. त्याच्याशिवाय रिकामे असे ठिकाणच सापडणार नाही. स्वामींनी येथे व्यापकपणासाठी, नभाचा म्हणजे आकाश तत्त्वाचा दृष्टान्त दिला आहे. तथापि, आकाश म्हणजे ब्रह्म नव्हे. सृष्टीत आकाशाचा संचार सर्वत्र असतो. वस्तूच्या आत-बाहेर आकाश असते, हे खरे आहे. तथापि, आकाश पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ब्रह्म पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे. दुसरे, आकाश पंचमहाभूतांपैकी एक असल्याने त्याची घनता, विरलता, कार्यक्षमता सर्व ठिकाणी सारखी नसते. आकाश तत्त्व पृथ्वीपासून शेकडो मैल अंतरावर राहात नाही पण, ब्रह्म तत्त्वाचे तसे नाही. ते सर्वच असतेच असते. त्याच्याशिवाय रिकामी अशी जागा असूच शकत नाही.
वरील श्लोक क्रमांक 194 मध्ये साधकाने प्रश्न विचारला होता की, “देहे टाकिता देव कोठे रहातो। परी मागुता ठाव कोठे पहातो।” या प्रश्नाचे उत्तर स्वामींनी श्लोक क्रमांक 195 मध्ये, अप्रत्यक्षरित्या नभाचे व्यापकत्व सांगून दिले आहे. साधकाच्या प्रश्नाचे थेट उत्तर हवे असेल, तर ते दासबोधात शोधता येते. मनाच्या श्लोकांची रचना, दासबोधाचे काही समास लिहून झाल्यानंतरची आहे. त्यामुळे समर्थांनी असे गृहीत धरले असावे की संप्रदायातील शिष्यांनी, साधकांनी दासबोध वाचला असेल. साधकाच्या प्रश्नांच्या थेट उत्तरासाठी, दासबोधातील दशक 17, समास 8 ‘तत्त्वज्ञान निरुपण’ हा समास वाचला पाहिजे. त्यात सांगितलेले पिंडाचे देह माहीत हवे. पहिला देह पंच महाभूतांपासून बनणारा स्थूलदेह. त्याचे 25 विषय आहेत. (1) पृथ्वीतत्त्व-हाडे, मांस, त्वचा, नाडी, रोम. (2) आपतत्त्व-रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम. (3) तेजतत्त्व-भूक, तहान, आळस, झोप, मैथुन. (4) वायुतत्त्व-चळण, वळण, प्रसारण, निरोधन, आकुंचन (5) आकाशतत्त्व-काम, क्रोध, शोक, मोह, भय. हे सारे मिळून, स्थूल देह बनतो. पुढे वासनामय सूक्ष्मदेह, अज्ञानभय कारणदेह, ज्ञानमय महाकारण देह हे सारे मिळून, जीवाचा पिंड तयार होतो. जीवाच्या मृत्युसमयी त्याचा स्थूल देह निचेष्ट, अकार्यक्षम, मृत होऊन वासनामय सूक्ष्मदेह जीवाच्या बाहेर पडतो. पुढे तो वासनातृप्तीसाठी अनुकूलता पाहून, त्या ठिकाणी पुन्हा जन्म घेतो. हे ज्ञान झाल्यावर, जीवाच्या मृत्युनंतर हृदयातील देव कोठे राहातो व पुन्हा कसा जन्म घेतो? हा प्रश्नच उद्भवत नाही. तो देव सर्वत्र भरून आहे. त्याला जाणे-येणे नाही.
नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं।
रिता ठाव या राघवेंवीण नाहीं।
तया पाहतां पाहतां तेंचि जालें।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडालें॥196।
या भूमीवरील नव्हे, तर आकाशातील सूक्ष्मातिसूक्ष्म कणांमध्येही परमात्मस्वरूप भरून राहिले आहे. या राघवाशिवाय रिकामी अशी जागाच कोठे नाही. ते ब्रह्मतत्त्व शोधायचा अभ्यास करीत जावे, तरच शोधक ब्रह्मतत्त्व होऊन जातो आणि त्या ब्रह्मतत्वात विलीन होतो. ब्रम्ह पाहता पाहता पाहणाराच ब्रह्म, असा प्रत्यय येतो. दृश्य, अदृश्य सारेच ब्रह्मतत्त्वात, राघवात बुडून जाते. ही अनुभूती विलक्षण असते. तिचे शब्दांत वर्णन करता येत नाही.
(क्रमशः)
7738778322