उद्योग आणि कृषी क्षेत्राचा उत्तम मिलाफ साधत मुंबई, पुण्यानंतर नाशिक वेगाने आपला विकास साधत आहे. इथल्या ग्रामीण भागानेही चांगलीच कात टाकायला सुरुवात केली असून द्राक्षे, टोमॅटो आणि कांदा पिकाने शेतकरी वर्गाला आर्थिक समृद्ध केले, तर मधल्या काळात आलेल्या अनेक उद्योगांनी नाशिकच्या विकासाची चाके गतिमान केली.
त्यामुळे नाशिकच्या कृषी मालाबरोबरच इतरही वस्तू जगाच्या बाजारपेठेत दाखल झाल्या. हे अर्थचक्र फिरण्यासाठी नाशिकचे दळणवळणही चांगलेच सुधारले आहे. नाशिकला जोडणारे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने नाशिक समृद्धीकडे वाटचाल करत आहे. त्यात महायुती सरकारचा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गही लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे.
महाराष्ट्रदिनी राज्याच्या दळणवळणाला समृद्ध करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर हा 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे. या महामार्गाचा अखेरचा इगतपुरी ते ठाण्यातील आमणे हा टप्पा महाराष्ट्रदिनी खुला केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नाशिक मुंबईच्या आणखी जवळ म्हणजेच अवघ्या अडीच तासांवर येणार आहे. त्यातही केवळ आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येईल, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-3 नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला समृद्धीचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक जलद होईल. त्याचा फायदा नाशिकच्या दळणवळणाला अधिक होईल.
‘रस्ते विकास महामंडळा’ने 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून 701 किमी लांबीचा 24 जिल्ह्यांना जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ उभारून राज्याचे दळणवळण गतिमान केले. त्याचा अधिकाधिक फायदा नाशिक जिल्ह्याला होणार असून, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता नाशिकहून अवघ्या अडीच तासांत गाठता येईल.
मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिकला स्थान असले, तरी मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिक दळणवळणामुळे काहीसे मागे होते. मात्र, समृद्धीमुळे नाशिक मुंबईच्या अधिक जवळ जाणार आहे. वाढवण बंदरावरून व्यापाराला सुरुवात झाल्यानंतर नाशिकचे महत्त्व वाढून विकासाची गंगा खळाळून वाहील, यात तीळमात्र शंका नाही.
हवाहवाईत नाशिकची भरारी
नाशिकमध्ये दि. 23 डिसेंबर 2017 रोजी हवाईसेवेची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘एअर डेक्कन’ कंपनीचे पहिले विमान नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावले आणि विमानसेवेसाठी नाशिकचे नाव देशाच्या नकाशावर कोरले गेले. धार्मिक व सांस्कृतिक ठेवा अंगाखांद्यावर खेळवणार्या नाशिकने जगाशी स्पर्धा करण्यासाठी लागणार्या सर्व उपाययोजना करण्यात मागे नाही, हेही दाखवून दिले. नाशिकमध्ये खरं तर विमानसेवा सुरू होऊन आठ वर्षे उलटली असून, या आठ वर्षांत विमानसेवेचा आलेख सतत उंचावत आहे. मागील मार्च महिन्याच्या तुलनेत 54 टक्के प्रवासी संख्याही वाढली.
यासोबतच कार्गो सेवेतून मालवाहतुकीमध्येही प्रचंड वाढ होऊन कार्गोसेवेत 100 पटीने वाढ करण्यात नाशिकची विमानसेवा यशस्वी झाली. त्यामुळेच प्रवासी, उद्योजक आणि व्यापाराच्या दृष्टीने नाशिक विमानतळ दिवसेंदिवस उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. 2023-24 साली 2 लाख, 42 हजार, 372, तर 2024-25 साली 3 लाख, 41 हजार, 112 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. ही वाढ 40 टक्के इतकी आहे. यासोबतच 2023-24 साली 463 मेट्रिक टन 2024-25 साली 4 हजार, 280 मेट्रिक टन माल देश-विदेशातील बाजारपेठेत पाठवला गेला. त्यामुळेच झपाट्याने विकास करणार्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा लागतो.
त्यातच मागील काही वर्षांत पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला गेल्याने, इथे व्यवसायवृद्धी होताना दिसते. येत्या काळात वाढवण बंदराचा वाहतुकीच्या दृष्टीने नाशिकला मोठा फायदा होईल. हा फायदा करून घेण्यासाठी नाशिकमध्ये रस्ते, रेल्वे आणि विमान अशा दळणवळणाच्या तिन्ही गोष्टी परिपक्व होत असून, कार्गो सेवेच्या माध्यमातून देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर माल पाठवला गेला. वाढणार्या विमानसेवेचा नाशिकच्या विकासावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. मागील महिनाभरात अनेक देशांतील प्रतिनिधींनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले. हे उद्योग कार्यान्वित झाल्यास नाशिकच्या विमानसेवेला अधिक बळकटी प्राप्त होईल.
यासोबतच नाशिकच्या कृषी मालाला आखाती देशात चांगली मागणी आहे. हा माल कार्गो सेवेने पाठविण्यावर भर दिल्यास शेतकरी अधिक समृद्ध होईल. विमानसेवेचा हा चढता आलेख भविष्यातील नाशिकच्या विकासाची नांदी ठरणार आहे, हे निश्चित!
- विराम गांगु्र्डे