मुंबई - ( first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. या स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची पहिली बैठक शुक्रवार, २ मे रोजी दुपारी १२.३० वा. वांद्रे पूर्व कलानगर येथील गृहनिर्माण भवन, गुलझारीलाल नंदा सभागृह, ३ रा मजला येथे होणार आहे.
राज्यातील जुन्या व जीर्ण झालेल्या शासकीय/निमशासकीय/खाजगी जमिनीवरील सर्व नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता द्यावयाच्या सवलतींचे प्रमाण व स्वरूप कसे असावे, याबाबत शासनाला शिफारसी करण्याकरिता गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापना करण्यात आली होती.
या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने शासनाने सवलतींबाबतचा शासन निर्णय १३ सप्टेंबर २०१९ ला निर्गमित केला होता. या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात तसेच स्वयंपुनर्विकासासाठी पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध होण्याकरिता, स्वयंपुनर्विकास प्रकल्पांची व्याप्ती वाढवून ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, शासकीय, महापालिका यांच्या भूखंडावरील संस्थांकरिता स्वयंपुर्विकास योजना राबविणे, अर्धवट व रखडलेल्या प्रकल्पांचा स्वयंपुनर्विकास, याबाबत हा अभ्यास गट शासनाला शिफारशी करणार आहे.