मुंबई : सध्या सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक व्हिडीओ आणि पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो सिख धर्मगुरु श्री गुरु नानक यांच्या रूपात दिसतो. या पोस्टरमध्ये 'लवकरच ट्रेलर येणार' अशी देखील घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकांनी हा आमिरचा आगामी चित्रपट समजून चर्चा सुरू केली. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
आमिर खानच्या टीमनं या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण देत या पोस्टरचा खंडन केलं आहे. त्यांच्या स्पोक्सपर्सननं स्पष्ट केलं की हे पोस्टर पूर्णपणे फेक असून AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात आलं आहे. "आमिर खानचा या प्रकारच्या कोणत्याही चित्रपटाशी काहीही संबंध नाही. तो गुरु नानक यांचा प्रचंड सन्मान करतो आणि कधीही असा काही कृती करणार नाही जी त्यांचा किंवा कुणाचाही अपमान करेल," असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
चाहत्यांना आणि सामान्य नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करत, त्यांनी विनंती केली आहे की अशा फेक आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या बनावट पोस्ट आणि अफवा वारंवार पसरवल्या जातात, आणि त्यामुळं चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते.
हे पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधी देखील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात तो राजकीय घोषणांपासून दूर राहण्याबद्दल बोलत होता. त्यावेळी देखील त्याच्या टीमनं पुढे येत या व्हिडीओचं खंडन केलं होतं.
सध्याच्या AI युगात, फेक कंटेंट सहज तयार होतो आणि पसरतो. त्यामुळे अशा व्हायरल पोस्टकडे पाहताना सतर्क राहणं आणि अधिकृत खात्यांकडून खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.