मुंबई, महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने चर्चा केल्यावर सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे श्रीचक्रधर स्वामींच्या सत्य, अहिंसा, मानवता आणि समानता या जागतिक मूल्यांचा गौरव होणार असून, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि जागर संपूर्ण विश्वभर होण्यास प्रोत्साहन मिळेल.
परिपत्रकानुसार, मंत्रालयासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘अवतार दिन’ म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जातील. या निर्णयामुळे श्रीचक्रधर स्वामींच्या मानवतावादी कार्याला आणि अलौकिक मराठी साहित्याला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ, स्थापन केले. श्रीचक्रधर स्वामींच्या कार्याशी संबंधित पाच देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मान्यता दिली होती.
विश्वाला प्रेरणा देणारा वारसा
श्रीचक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान आणि कार्य कायम प्रेरणा देणारे आहे. त्यांचे कार्य विश्वाला प्रेरणा देणारा वारसा आहे. ‘अवतार दिन’ साजरा करण्याचा निर्णय केवळ एक उत्सव नसून, सत्य व मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्याचा संकल्प आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री आणि पालकमंत्री अमरावती, नागपूर.