काल फ्रान्सबरोबर झालेला ‘राफेल-एम’ विमानांसाठीचा करार, हा भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित करणाराच म्हणावा लागेल. भारत-पाक दरम्यान केव्हाही संघर्षाला तोंड फुटेल, अशी परिस्थिती असताना, भारताने हा करार प्रत्यक्षात आणत, आधीच बिथरलेल्या पाकला पुरते हादरवले. त्यामुळे एकीकडे युद्ध लढण्यासाठी चीनकडे मदतीची भीक मागणारा पाकिस्तान आणि दुसरीकडे संघर्षकाळात युद्धसज्जतेची डरकाळी फोडणारा भारत, अशी ही सर्वस्वी सुखावणारी तफावत...
भारत आणि फ्रान्स यांच्यात काल झालेला ‘राफेल-एम करार’ हा केवळ एक व्यवहार नाही, तर भारताच्या सागरी सुरक्षेचे दीर्घकालीन भवितव्य सुनिश्चित करणारा तो करार आहे. भारतीय नौदलाला बळ देणारा हा निर्णायक टप्पा. ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात होणारी अण्वस्त्रे डागण्यास सक्षम अशी ही 26 सागरी राफेल विमाने, हिंद महासागरात भारताची निर्विवाद मक्तेदारी निर्माण करणारी आहेत. विशेष म्हणजे, हा करार भारत-पाकिस्तान संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झाल्यामुळे त्याला आणखीनच महत्त्व.
रविवारीच भारतीय नौदलाने क्षेपणास्त्रांच्या ज्या चाचण्या घेतल्या, त्यानेही पाकच्या पोटात गोळा उठला आहे. आता तर थेट सागरी राफेल विमानांचा करार पूर्णत्वास नेत, भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. यापूर्वी 2016 साली भारताने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती. तथापि, त्या करारातील विमाने ही पूर्णपणे वायुदलासाठी होती. यात विमानांचा वापर करत भारताने बालाकोटमध्ये अतिशय अचूक हवाई कारवाई केली होती, हे पाक विसरला नसेल, अशी अपेक्षा अर्थातच आहे. आजचा करार यापेक्षा वेगळा असला, तरी तो राफेल संबंधितच आहे. या वेळेस राफेलची नौदलासाठी खास डिझाईन केलेली ‘सागरी आवृत्ती’ (राफेल एम) विमाने भारत खरेदी करत आहे. ‘आयएनएस विक्रांत’सारख्या स्वदेशी विमानवाहू नौकेसाठी अत्याधुनिक आणि विश्वासार्ह लढाऊ अशी विमाने नौदलाला हवी होती. ती उणीव आता भरून निघाली आहे.
या करारामुळे भारतीय नौदलाला हवा असलेला ‘ब्लू वॉटर नेव्ही’चा दर्जा पूर्णत्वास जाणार असून, पाकिस्तानसारख्या देशाच्या नौदलाची तुलना केली, तर भारताकडे दोन विमानवाहू नौका, दहा हल्लेखोर पाणबुड्या, 150 हून अधिक लढाऊ जहाजे आहेत. त्याचवेळी पाकिस्तानी नौदलाकडे केवळ आठ पाणबुड्या आणि 14 जहाजेच आहेत. भारताच्या वायुदलात 32 लढाऊ विमानांच्या ‘स्क्वॉड्रन्स’ असून, पाकिस्तानकडे फक्त 22 आहेत. त्यातही पाकच्या ताब्यातील बहुसंख्य विमाने ही जुनी व कालबाह्य झालेली. भारतीय लष्करही आधुनिकतेकडे झेपावत असताना, पाकिस्तानी लष्करी मात्र आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. चीनकडून दहा अब्ज युआनच्या जास्तीच्या कर्जाची मागणी करून पाकने स्वतःची दुर्दशा जगजाहीर केली आहे.
भारतीय सैन्यदलात वेळोवेळी शस्त्रास्त्रांचे आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण घडवून आणणार्या केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेसमोर, पाकिस्तानची स्थिती ही अत्यंत दयनीय अशीच. पाक आपल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बँकेचे उंबरठे झिजवत असताना, भारत सैन्यदलासाठी विक्रमी तरतूद करतो, हा विरोधाभासच सर्वकाही अधोरेखित करणारा. पाक स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी संघर्ष करत असताना, भारत मात्र स्वतःला संरक्षणसिद्ध करत असून लष्कराला बळकटी देत आहे.
त्यातच पाकिस्तानी लष्करातल्या अनेक अधिकार्यांनी व सैनिकांनी राजीनामा देण्याचा सपाटा लावल्याचे वृत्त मागेच आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अशा घटनांना वेग आला आहे. जनरल असीम मुनीरने स्वतःच्या कुटुंबीयांना विदेशात इतरत्र हलवल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. यावरूनच स्पष्ट होते की, युद्ध सुरू होण्याआधीच पाकिस्तान मानसिक आणि सामरिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे.
भारताच्या वाढत्या शक्तीसमोर आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात घेऊनच तेथील लष्कर तसेच राजकीय नेते आज स्वतःच्याच सरकारविरोधात टिप्पणी करताना दिसून येतात. भारताच्या युद्धसज्जतेच्या वृत्तांनी पाकी लष्कराची झोप उडाली आहे, हे मात्र नाकारता येत नाही. इतिहासही भारताने पाकला नेहमीच पराभूत केले आहे, याचा साक्षीदार आहेत. 1947, 1965, 1971 आणि 1999, असे जेव्हा जेव्हा भारत-पाक युद्ध झाले, तेव्हा तेव्हा भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. दरवेळी भारताच्या संयमित पण, निर्णायक कारवाया पाकिस्तानला पराभूत करणार्या ठरल्या आहेत.
आज भारताने पाऊल उचलले तर काय होईल, हे कोणीही सांगू शकणार नाही. मात्र, ते स्पष्ट आहे जे होईल, ते ‘न भूतो न भविष्यति’ असेच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना पृथ्वीच्या अंतापर्यंत शोध घेऊन संपवू, त्यांना आश्रय देणारी भूमीही शिल्लक ठेवणार नाही, हा दिलेला इशारा पाकिस्तानसाठी पुरेसा आहे.
दुर्दैवाने, पाक काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असूनही, देशातील काही धृतराष्ट्री वृत्ती डोके वर काढताना दिसतात. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने तर पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांना हातही लावला नाही, असे धक्कादायक विधान केले. विजय वडेट्टीवार, सिद्धरामय्या यांसारखे काँग्रेसी नेतेही अशीच पाकच्या पथ्यावर पडणारी भूमिका घेत असून, पाकी माध्यमे ते प्राधान्याने रंगवत आहेत. यापूर्वीही राफेल कराराच्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी भारत सरकारवर टीका करून राष्ट्रहिताला बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता. अशा राष्ट्रद्रोही, राष्ट्रघाती वृत्तीच्या नेत्यांपासून भारतीय जनतेने सावध राहिले पाहिजे. राष्ट्रहिताच्या प्रत्येक निर्णायक क्षणी राष्ट्रीय एकात्मतेला पाठिंबा देणे, हीच काळाची गरज.
एकूणच आजचा राफेल करार ही भारताच्या सागरी सामर्थ्याची भक्कम पायाभरणी करणारा आहे. हा केवळ एक करार नाही; हा भारताच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि भविष्यातील वर्चस्वाचा प्रारंभबिंदू आहे. शांतीसाठी सामर्थ्य हे सूत्र लक्षात ठेवून, भारताने आपली ताकद मजबूत केली आहे. युद्धाची शक्यता, ही काही काळासाठी भीती निर्माण करू शकते. परंतु, युद्ध टाळण्याची ताकद ही दरारा कायम राखणारी असते. ‘भारत-फ्रान्स राफेल एम करारा’ने हेच अधोरेखित केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे.