पाकिस्तानप्रेमींसाठी भारतात एक इंचही जागा नाही!: मंत्री नितेश राणे
29-Apr-2025
Total Views |
मुंबई: ( Nitesh Rane ) “ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदू नावे वापरून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र आणि देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही,” असा इशारा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी दिली.
काही मुसलमानांना नाहक मारहाण केल्याच्या घटनांवरून समाजवादी पक्षाद्वारे अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले, “पहलगाम येथील घटनेवरून सर्वसामान्यांच्या मनात चीड आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत.
अबू आझमीसारख्या मुसलमानांच्या नेत्याने औरंगजेबासारख्या जिहाद्यांचे उदात्तीकरण केले, त्याचाच परिणाम सर्व मुसलमानांना भोगावा लागत आहे. त्याने जे पेरले, ते आता उगवत आहे. अबू आझमीसारख्या मुसलमान नेत्याच्या कर्माची ही फळे आहेत.”
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्म विचारून गोळ्या घालायला दहशतवाद्यांना वेळ कुठे असणार? दहशतवादाला धर्म नसतो, या वक्तव्याविषयी पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले “यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनीच ‘भगवा आतंकवाद’ असा आरोप केला होता. त्या काँग्रेसचे नेते दहशतवादाला रंग नसतो हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत.
दहशतवादाचा रंग हिरवा आहे आणि काँग्रेसचा रंगही हिरवा आहे. काँग्रेसच्या नेत्यांची भाषा ही पाकिस्तानप्रेमींची भाषा आहे. दहशतवादी आणि काँग्रेस यांचा ‘डीएनआय’ एकच आहे.”