नवी दिल्ली (Rafale Marine deal):भारत आणि फ्रान्सने सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ६३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात हा करार करण्यात आल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने या महिन्याच्या सुरुवातीला या कराराला मंजुरी दिली होती.
भारतातील फ्रेंच राजदूतांनी त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व केले, तर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी भारतीय बाजूचे प्रतिनिधित्व केले. तसेच इतर अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते. दोन्ही देशांचे संरक्षणमंत्रीदेखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
‘राफेल’ लढाऊ विमान सध्या सेवेत असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात केले जाण्याची अपेक्षा आहे. सरकार-ते-सरकार करारामध्ये २२ सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर ‘राफेल एम जेट्स’चा समावेश आहे, जे भारतीय गरजांसाठी आणि वाहक एकत्रीकरणासाठी सानुकूलित केले आहेत.
भारताच्या स्वतःच्या लढाऊ विमानाचा विकास पूर्ण होईपर्यंत हे लढाऊ विमान स्टॉपगॅप उपाय म्हणून खरेदी केले जात आहे. या करारात देखभाल,लॉजिस्टिक्स, प्रशिक्षण आणि स्वदेशी घटकांच्या निर्मितीसाठी व्यापक पॅकेजचा समावेश आहे. ‘राफेल एम जेट्स’ ‘आयएनएस विक्रांत’ येथून चालवले जातील आणि विद्यमान ‘मिग-29के’ ताफ्याला आधार देतील. भारतीय हवाई दलाकडे २०१६ मध्ये स्वाक्षरी केलेल्या वेगळ्या करारानुसार खरेदी केलेल्या ३६ ‘राफेल’ विमानांचा ताफा आहे. ही विमाने अंबाला आणि हासीमारा येथे आहेत. या नवीन करारामुळे भारतातील ‘राफेल जेट्स’ची एकूण संख्या ६२ होईल, ज्यामुळे देशाच्या ४.५ पिढीच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात लक्षणीय वाढ होईल.
राफेल एम.’ची वैशिष्ट्ये
• ५० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाणाची शक्ती
• अणुहल्ला आणि जहाजविरोधी हल्ला करणे शक्य
• हवेत इंधन भरण्याची सुविधा आणि प्रगत रडार तंत्रज्ञान
• ‘राफेल मरीन’ हे सध्याच्या ‘राफेल’ लढाऊ विमानांपेक्षा अधिक प्रगत
• १० तासांपर्यंतचा फ्लाईट डेटा रेकॉर्ड करण्याची क्षमता
• ९ टनांपर्यंत (वजनाची) शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम
• हवेतून हवेत मारा करणारी, जहाजविरोधी आणि ‘एससीएएलपी प्रिसिजन स्ट्राईक क्षेपणास्त्रे’ समाविष्ट
• पाकिस्तानच्या ‘एफ-१६ आणि चीनच्या ‘जे-२०’पेक्षा जास्त शक्तिशाली
कमी जागेतही उतरणे शक्य
‘राफेल एम.’ एका मिनिटात १८ हजार मीटर उंची गाठू शकते. ते पाकिस्तानच्या ‘एफ-१६’ आणि चीनच्या ‘जे-२०’पेक्षा अधिक क्षमता दर्शवत आहे. ते उड्डाण केल्यानंतर ३ हजार, ७०० किमी अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यात ३० मिमी ‘ऑटो कॅनन गन’ आणि १४ ‘हार्ड पॉईंट्स’ आहेत. त्याचप्रमाणे अगदी कमी जागेतही हे विमान उतरू शकते.