पाकिस्तानचे सायबर हल्ले अपयशी, भारतीय यंत्रणांचे चोख प्रत्युत्तर
29-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली, पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगारांना पुन्हा एकदा भारतीय सायबर सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यात अपयश आले आहे. भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी पाकचा नापाक इरादा धुळीस मिळवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (एलओसी) पाकच्या गोळीबारास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकची पाण्यासह अन्य सर्व प्रकारची कोंडी करण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाककडून भारतावर सायबर हल्ले करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, मिशन-क्रिटिकल राष्ट्रीय नेटवर्क अभेद्य आढळल्यानंतर पाकने सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या कल्याणकारी आणि शैक्षणिक वेबसाइट्सकडे आपले प्रयत्न वळवले आहेत. "आयओके हॅकर" - इंटरनेट ऑफ खिलाफत या टोपणनावाने कार्यरत असलेल्या या गटाने संकेतस्थळांवर हल्ले करण्याचा, ऑनलाइन सेवांमध्ये व्यत्यय आणण्याचा आणि वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या स्तरित सायबरसुरक्षा आर्किटेक्चरने रिअल टाइममध्ये घुसखोरी शोधली आणि त्यांचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे त्वरीत शोधून काढले.
प्राप्त माहितीनुसार, गुप्तचर संस्थांच्या तपासाद्वारे सायबर हल्ल्याच्या चार घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये श्रीनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल, रानीखेत आर्मी पब्लिक स्कूल या दोन संकेतस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन तसेच भारतीय हवाई दल प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पोर्टललाही लक्ष्य करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अशा प्रयत्नांना भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडले आहे.
भारतीय लष्कराचे एलओसीवर चोख प्रत्युत्तर
२८-२९ एप्रिल २०२५ च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील एलओसी तसेच अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. भारतीय सैन्याने या चिथावणीला प्रभावी पद्धतीने प्रत्युत्तर दिले, अशी माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे.