नवी दिल्ली, देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना शिक्षणाच्या जागतिक मानकांचा विचार करण्यात आला आहे. त्याद्वारे तरुणांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कौशल्यांनी सक्षम करून भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून स्थापित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित युग्म नवोन्मेष परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, कोणत्याही राष्ट्राचे भविष्य त्याच्या तरुणांवर अवलंबून असते आणि भविष्यासाठी त्यांना सज्ज करण्याचे महत्त्व अधोरेखित करून, पंतप्रधानांनी या सज्जतेमध्ये शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते असे नमूद केले आणि 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला. जागतिक शिक्षण मानके लक्षात घेऊन तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या समावेशावर त्यांनी प्रकाश टाकला आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेत त्यामुळे झालेले महत्त्वपूर्ण बदल निदर्शनास आणले.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट, शैक्षणिक अध्ययन साहित्य आणि इयत्ता पहिली ते सातवीसाठी नवीन पाठ्यपुस्तकांच्या विकासाबाबत माहिती दिली. 30 हून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि सात परदेशी भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार करणे शक्य झालेल्या पीएम ई-विद्या आणि दीक्षा प्लॅटफॉर्म अंतर्गत एआय-आधारित आणि स्केलेबल डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म - 'एक राष्ट्र, एक डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा' च्या निर्मितीवर त्यांनी प्रकाश टाकला.