धारावीकर अग्नितांडवाच्या सावटाखाली

सततच्या दुर्घटनांमुळे स्थानिकांमध्ये धास्ती

    29-Apr-2025
Total Views |
धारावीकर अग्नितांडवाच्या सावटाखाली

मुंबई, दाटीवाटीची वस्ती, गॅस सिलेंडर सारख्या ज्वलनशील पदार्थांची अवैध रीतीने केलेली साठवणूक, बेकायदेशीर झोपड्यांची उभारणी आणि इतर कारणांमुळे गेल्या काही वर्षांत धारावीत आगीच्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. धारावीतील निसर्ग उद्यानाजवळ गेल्या महिन्यात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटाने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे वाढत्या दुर्घटना आणि दुसरीकडे दाट वस्तीमुळे अग्निशमन दलाला बचावकार्यात येणारे अडथळे अशा दुहेरी कात्रीत सापडलेले स्थानिक रहिवाशी यामुळे धास्तावले आहेत.

मार्च महिन्यात धारावीच्या निसर्ग उद्यानाजवळबेकायदेशीरपणे पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या ट्रकमधील २० सिलेंडर्सचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती.सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या स्फोटाने आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. हा स्फोट ऐन वस्तीच्या ठिकाणी झाला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. १ फेब्रुवारी २०२३ रोजी कमला नगर आणि शाहू नगर येथील १०० गाळे जळून खाक झाले होते. या भीषण आगीत एका ६२ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. मात्र ६ कोटींहून अधिक रुपयांची वित्तहानी झाली होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली तिथून अग्निशमन केंद्र हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, अरुंद गल्ल्या, दाट वस्ती यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना दुर्घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवायला तब्बल १० तासांचे अथक प्रयत्न करावे लागले.

कपड्यांच्या छोट्या कारखान्याला १ फेब्रुवारी, २०२३ रोजी लागलेल्या भीषण दुर्घटनेतून धारावीला वाचविणारे तत्कालीन अग्निशमनदल प्रमुख संजय मांजरेकर यांनी बचावकार्यातील आव्हानांबाबत भूमिका मांडली होती. "अग्निशमन केंद्र जवळ असूनही आगीच्या ठिकाणी पोहोचायला रस्ता नसल्याने लगेच आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य नव्हते. यामुळे आगीच्या ज्वाळांनी काही वेळात रौद्ररूप धारण केले. त्यातच काही गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. आमच्या जवानांनी घरांच्या छतावर चढून पाण्याचा मारा केला. त्यानंतर एका हाऊसगल्लीतून वाट काढत जवानांना प्रत्यक्ष घटनास्थळावर जाता आले" अशा शब्दांत मांजरेकरांनी बचावकार्याची माहिती दिली.

" रात्री १०वाजता लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवायला मध्यरात्रीचे २ वाजले. तोपर्यंत आम्ही जीव मुठीत घेऊन आमच्या घराबाहेच उभे होतो. इतक्या भीषण आगीत जीवितहानी झाली नाही. हा वास्तविक एक चमत्कार म्हणावा लागेल".

- सलीम अगवान