वांद्रे येथील आगीची सर्वंकष चौकशी करा

- पालकमंत्री मंत्री आशिष शेलार यांचे आयुक्तांना निर्देश

    29-Apr-2025
Total Views |
वांद्रे येथील आगीची सर्वंकष चौकशी करा


मुंबई, वांद्रे येथे लागलेल्या आगीची अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर सर्वंकष चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी आयुक्तांना दिले.

वांद्रे येथील लिंकिन रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. यामुळे क्रोमा शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे ४ वाजता आग लागली, याबाबतचे माहिती मिळताच पहाटेपासून स्थानिक आमदार आणि पालकमंत्री आशिष शेलार संबंधित यंत्रणांच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी ही केली.

दरम्यान, याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ही घटना दुदैवी असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी इमारत आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील व्यापारी आणि या इमारतीच्या निर्माणात सहभागी असलेल्या माजी आमदार झिशान सिद्धिकी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे मिळणे आवश्यक आहेत. म्हणजे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणी चौकशी करावी, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत.