मानवजातीच्या प्रगत वाटचालीत धार्मिक सहिष्णुता, बहुविधतेचा आदर आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष स्थान आहे. लोकशाही आणि मानवाधिकारांची प्रतिष्ठा ज्या जगात मानली जाते, त्यात काही विशिष्ट समुदायांविरुद्ध असहिष्णुतेचे प्रकार सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवरच स्कॉटलंडच्या संसदेमध्ये ‘हिंदूफोबिया’च्या विरोधातील एक ऐतिहासिक ठराव नुकताच संमत झाला.
‘हिंदूफोबिया’ म्हणजे हिंदू धर्म, त्याचे तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा आणि अनुयायांविरुद्ध द्वेष, तिरस्कार, चुकीचा प्रचार व हिंसक वृत्ती बाळगणे होय. धार्मिक किंवा सांस्कृतिक विविधतेचा स्वीकार करण्याऐवजी, हिंदू धर्माविषयी गैरसमज पसरविणे, प्रतिमा मलीन करणे किंवा त्यांच्या धार्मिक श्रद्धा स्थानांवर हल्ले करणे, ही ‘हिंदूफोबिया’ची दृश्यरूपे.
हिंदू धर्माचे स्वरूप पाहता, तो एक व्यापक आणि समावेशक जीवनदृष्टी असणारा धर्म. ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ किंवा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ यांसारख्या विचारांनी तो समृद्ध आहे. प्रत्येकाला स्वतःच्या साधनेचा मार्ग निवडण्याची पूर्ण मुभा देणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. अहिंसा, सहिष्णुता, सहअस्तित्व आणि सर्व प्राणिमात्रांविषयी करुणा ही या धर्माची मूलभूत वैशिष्ट्ये.
इतक्या समावेशक विचारांचा पुरस्कार करणार्या धर्माच्या अनुयायांविषयी पूर्वग्रह किंवा द्वेष बाळगणे, हे एका व्यापक मानवी मूल्यांच्या विरोधात जाणारे आहे. पण, आजच्या जागतिक वास्तवात, अनेक देशांमध्ये हिंदू समुदाय विविध प्रकारच्या दुजाभावाला आणि असहिष्णुतेला सातत्याने सामोरे जात आहे. मंदिरे उद्ध्वस्त करणे, हिंदू धार्मिक परंपरांचा उपहास करणे, हिंदू सणांमध्ये अडथळे आणणे किंवा प्रसारमाध्यमांमध्ये हिंदू संस्कृतीचे विकृत चित्रण करणे, ही काही त्याची गंभीर उदाहरणे. विशेषतः ‘इस्लामोफोबिया’च्या संदर्भात जागतिक स्तरावर ज्या तत्परतेने चर्चा होते, त्या तुलनेत ‘हिंदूफोबिया’ हा विषय दुर्लक्षितच राहिलेला आहे, असे जाणवते.
स्कॉटलंडच्या संसदेत नुकताच पारित झालेल्या ठरावात ‘हिंदूफोबिया’चा ठाम निषेध केला असून, हिंदू समुदायाच्या सांस्कृतिक व सामाजिक योगदानाची प्रशंसाही केली आहे. स्कॉटलंडमधील एल्बा पक्षाच्यावतीने एश रिजन यांनी हा ठराव मांडला. हिंदू धर्माविषयी कोणत्याही प्रकारचा भेदभाव थांबविण्यासाठी स्पष्ट धोरणात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता या ठरावाने अधोरेखित केली आहे.
हा ठराव केवळ स्कॉटलंडपुरता मर्यादित राहत नाही. युरोपियन संघ, तसेच कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या बहुसांस्कृतिक लोकशाही देशांनीही यापुढे ‘हिंदूफोबिया’ची गंभीर दखल घेण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. स्कॉटलंडच्या ठरावामुळे जागतिक मंचावर हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत नव्या दिशेने विचारमंथन सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिंदू धर्माची वैशिष्ट्ये समजावून घेतली, तर स्पष्ट दिसते की, हा धर्म कोणत्याही एकाधिकारशाही विचारसरणीचा पुरस्कार करत नाही. विविधता, प्रश्न विचारण्याची मुभा, आंतरसंवाद आणि परिवर्तनशीलता या मूल्यांचा स्वीकार करणारा हा धर्म, मानवतेचा एक समृद्ध वारसा आहे. त्यामुळे ‘हिंदूफोबिया’ वाढविण्याचा प्रयत्न केवळ एका विशिष्ट समाजाच्या नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या सहअस्तित्वाच्या विरोधात आहे.
आजच्या जागतिक वास्तवात माहितीच्या सहज प्रसारामुळे, चुकीच्या कल्पना अधिक वेगाने पसरतात. याला प्रत्युत्तर म्हणून अधिक जबाबदारीने, शास्त्रशुद्ध आणि संवेदनशील पद्धतीने हिंदू धर्माची खरी ओळख लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे झाले आहे. म्हणूनच जागतिक हिंदू समुदायानेही स्वतःची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याची तयारी ठेवली पाहिजे.
स्कॉटलंडच्या संसदेतून निघालेला आवाज केवळ एक ठराव न राहता, भविष्यात सर्व धार्मिक समुदायांच्या सन्मानासाठी, भेदभावमुक्त जागतिक समाजनिर्मितीसाठी प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा. हिंदू धर्माचा आत्मा असलेली सहिष्णुता हीच त्याची शक्ती आहे. पण, ही सहिष्णुता कमजोरी समजली जाऊ नये. त्याऐवजी या सहिष्णुतेचा जागतिक संवादासाठी आदर्श म्हणून वापर करणे, ही काळाची गरज आहे. मात्र, सध्या स्कॉटलंडचा ठराव हा सर्व धर्मांना समान सन्मान मिळवून देणार्या जागतिक मूल्यांसाठी, सहिष्णुतेचा नवा प्रवाह ठरेल यात शंका नाही.
- कौस्तुभ वीरकर