मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून रविवार दि. २७ एप्रिल रोजी पश्चिम घाट किंग कोब्रा सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescue). घराजवळ आढळलेल्या या १४ फूटांच्या अजस्त्र सापाला स्थानिक सर्पमित्राने वन विभागाच्या सहकार्याने पकडले आणि त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडले. (king cobra rescue)
पश्चिम घाटाचा विचार हा दक्षिणेकडून केल्यास या क्षेत्रात आढळणाऱ्या किंग कोब्राची सर्वात उत्तरेकडची नोंद दक्षिण महाराष्ट्रातील दोडामार्ग आणि चंदगड या दोन तालुक्यांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे महाराष्ट्रात या दोन तालुक्यामध्येच किंग कोब्रा आढळतो. महाराष्ट्रात या सापाला भुजंग, नागराज, डोम अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. रविवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात किंग क्रोबा साप आढळून आला. आदिनाथ राऊळ यांच्या घराशेजारील वर्दळीच्या रस्त्यावर हा साप आढळला. त्यामुळे स्थानिक सर्पमित्र विठ्ठल गवस यांना बोलवण्यात आले. गवस यांनी या सापाचा सुखरुप बचाव करुन त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीअंतर्गत नैसर्गिक अधिवासात सोडले. हा साप अंदाजे १४ फूटांचा होता आणि त्याचे वजन २० ते २५ किलोच्या दरम्यान होते.
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्राचे विभाजन नव्या प्रजातीमध्ये करण्यात आले आहे. 'टॅक्सोनाॅमी' म्हणजेच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्रा सापाचे नाविन्य ओळखून संशोधकांनी या प्रजातीचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा' असे केले आहे. शिवशंकराच्या गळ्यातील सापाला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. त्यावरुन या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या सापाला 'वेस्टर्न घाट किंग कोब्रा' असे सामान्य नाव देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आढळणारा किंग कोब्रा देखील आता 'आॅफिओफॅगस कलिंगा' या नावानेच ओळखला जाईल.