विविध आजारांवर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेत असतो. पण, ही औषधे घेताना त्यात नेमके कोणते घटक आहेत, याचा विचार कधी दुरान्वयेही आपल्या मनाला स्पर्श करत नाही. कारण, आपल्यासाठी त्या औषधात नेमके काय आहे, यापेक्षा हे औषध घेऊन लवकरात लवकर बरे कसे वाटेल, हाच विचार केंद्रस्थानी असतो. तेव्हा, आज आपण औषधनिर्माणशास्त्रातील एका अशा वेदनाशामक घटकाविषयी जाणून घेणार आहोत, जो अगदी डायलिसीस, केमोेथेरपी, त्वचाविकारांवरील औषधांसह अन्य अनेक आजारांवरील औषधांमध्येही प्रामुख्याने वापरलो जातो. हा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘सोडियम थायोसल्फेट.’ त्याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख...
एके दिवशी काय झालं, मी मुंबईतील वरळीहून दादरला प्रवास करत होतो. दादरमध्ये पुरेशी अशी चांगली उत्तम रुग्णालये आहेत. त्यांपैकी एका रुग्णालयात माझा प्रिय चुलत भाऊ डॉ. केतन केळकर कार्यरत होता. मी दादरला जाण्याचे कारण म्हणजे मला त्याला भेटायचे होते. पाटकर वर्दे महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागाचा माजी साहाय्यक प्राध्यापक व त्याचसोबत तिथे माझी ‘पीएचडी’ करत असल्यामुळे मी माझ्या काही प्रश्नांना उत्तरे मिळावे, म्हणून डॉ. केळकर यांना भेटत असतो. चहाच्या घोटासोबत विज्ञानाची चर्चा अशा उत्तम खुराकासाठी आम्ही धडपडत असायचो.आम्ही मानवी पेशींवरील रसायने आणि औषधांची यंत्रणा यांवर बराच वेळ चर्चा करत असायचो. कशाप्रकारे औषधांच्या क्रिया पूर्णपणे औषधांच्या ‘स्टिरिओकेमिस्ट्री’वर अवलंबून असतात. जगात सर्व ‘एन्झाइमॅटिक’ क्रियेला रसायनशास्त्राचा कणा कसा काय असतो? जर रसायने आपल्या शरीरात नसतील किंवा ‘इंझ्याइम कॅटलिस्ट’ नसेल, तर एका भाकरीचा तुकडा पचन करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 65 वर्षे लागतील. मी माझ्या रसायनशास्त्राचा वापर करण्याचा माझ्या स्तरावर सर्वतोपरि प्रयत्न करतो आणि तो त्याचे वैद्यकीय विज्ञान वापरतो. मी दवाखान्यात पोहोचलो. डॉ. केळकरांनी चहाचा ब्रेक घेतला. आम्ही ‘हिमोडायलिसिस’ या विषयावर आमची मोहीम वळवली. चर्चासत्र सुरू झाले. त्या चर्चेदरम्यान मला एक गोष्ट कळली,ती म्हणजे डायलिसिसच्या प्रक्रियेत मानवी जैविक प्रणालीसाठी विषारी असणारे युरिया आणि क्रिएटिनसारखे पदार्थ मूत्रपिंडातून (किडनी) बाहेर काढून टाकले जातात. जर एखाद्या व्यक्तीची किडनी नीट कार्यरत नसेल किंवा किडनीचे कार्य 15 टक्के किंवा त्यापेक्षा कमी होत असेल, तर तुमचे डॉक्टर डायलिसिसची शिफारस करू शकतात. डायलिसिसनंतर जी औषधे वापरली जातात, त्यांत ‘सोडियम थायोसल्फेट’ असतो. उपचारानंतर तो औषधांच्या यंत्रणेला साहाय्यक म्हणून काम करतो.
कर्करोगाच्या उपचारादरम्यान केमोथेरपीच्या दुष्परिणामांबद्दल आपल्याला माहिती असेलच. थेरपी घेतलेल्या लोकांना विचारले असता असे समजते की, त्या लोकांना खूप त्रास, असह्य वेदना, यातनांना सामोरे जावे लागते. अशा दुःखापासून मुक्त होण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांमध्ये ‘सोडियम थायोसल्फेट’ असते. काहीजण मुद्दाम म्हणतात की, आपण जगण्यासाठी खाण्यापेक्षा, खाण्यासाठी जगतो. असे असले तरी, भरपूर पीक मिळविण्यासाठी मानव कीटकनाशकांचा वापर करतो. त्याला ते करणे भागच आहे ओ! पिकाच्या वाढीसाठी इष्टतम प्रमाणात कीटकनाशक आवश्यक आहे. नायट्रोजन, सल्फरचे प्रमाण पिकांच्या जीवनाचे पोषण करते, या सर्व बाबी लक्षात घेऊन काहींचे म्हणणे आहे की कीटकनाशकांसह पीक संरक्षणाशिवाय, जगातील निम्म्याहून अधिक पिके कीटक, रोग आणि तणांमुळे नष्ट होतील. कीटकनाशके महत्त्वाची आहेत, परंतु आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की, कीटकनाशकांमध्ये ‘सोडियम सायनाइड’सारखी घातक संयुगे असते आणि ती अन्नसाखळीमध्ये अप्रत्यक्षपणे समाविष्ट होऊ शकते. जर एखाद्याला सायनाइड विषबाधेचा सामना करावा लागला, तर तुम्ही अशा स्थितीवर कशी मात कराल? यावर त्वरित उपचार करायचे म्हटले, तर एक उपाय आहे. तुम्हाला ‘सोडियम थायोसल्फेट’चा दरवाजा ठोठावा लागेल आणि ते तुम्हाला सायनाइड विषबाधेवर उतारा म्हणून आपले कार्य करून दाखवेल. गजकर्ण, दाद, खाज, खुजली यांसारख्या त्वचेच्या आजारावर जी औषधे वापरली जातात, त्यामध्येदेखील हा गडी आपली उपस्थिती दर्शवतो. ‘टिनिया वर्सिकलर’सारख्या त्वचेच्या विकाराचा सामना करताना औषधनिर्मिती प्रक्रिया ‘सोडियम थायोसल्फेट’शिवाय पुढे जाणारच नाही.
तलावाच्या पाण्यात क्लोरीनची उपस्थिती आम्हाला सामान्यतः माहीत असते. पोहण्याच्या पाण्यात किंवा तलावामध्ये क्लोरीनचा वापर सर्रासपणे होतो. जर क्लोरीनचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असेल, तर त्यामुळे अतिसार, त्वचा कोरडेपणा, श्वासोच्छवासाची जळजळ, नाकाची जळजळ यांसारखे काही आजार उद्भवू शकतात. क्लोरीन असलेले पाणी शुद्ध करण्यासाठी, आम्हाला ‘सोडियम थायोसल्फेट’ या रसायनाची आवश्यकता लागते. आपण असे म्हणू शकता की, हा एक आराध्य कारागीर आहे, जो नेहमी योग्य प्रकारे आपले कार्य नीतिमत्तेसह पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतो.
इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात गंगा नदीचे खोरे आणि अॅमेझॉन नदीचे खोरे यांची चांगली तुलना केलेली आहे. गंगा नदीचे खोरे मानवी वस्तीसाठी मानवाला का सर्वाधिक प्रभावित करू शकले? आमच्याकडे भूगोलाच्या पुस्तकात याचे उत्तर सापडते. मी याबद्दल येथे चर्चा करणार नाही. पण नक्कीच, थोडक्यात, मला कोणत्याही नदीजवळ मानवी वस्ती आणि उद्योग सांडपाण्याचे थोडक्यात व्यवस्थापन यावर टीपा लिहायचे आहे. जो उद्योग कोणत्याही नदीपात्राच्या आसपास आहे, सांडपाणी किंवा उद्योगांचे उत्सर्जित रसायन नदीमध्ये सोडतो किंवा सोडतात, त्याआधी उत्सर्जित रसायन किंवा सांडपाण्याने आपली जल-उपचार चाचणी सकारात्मकरित्या उत्तीर्ण होणे आवश्यक असते. उद्योगाद्वारे निष्कासित केलेले सांडपाणी हे घातक घटकांपासून मुक्त आहे का किंवा कोणत्याही सांडपाण्यात विषारी किंवा घातक घटक कमी (अल्प) प्रमाणात आहेत का, या प्रश्नांसाठी एक चाचणी केली जाते. ती चाचणी करण्याकरिता रसायनशास्त्रज्ञ ‘सोडियम थायोसल्फेट’चा वापर करतात. केमिस्ट ‘सोडियम थायोसल्फेट’चा वापर करून त्या सर्व विषारीपणाची पडताळणी करत असतात.‘कोविड’ महामारीच्या काळात ऑक्सिजन संपृक्तता पातळीचे महत्त्व काय आहे, हे सर्वांना चांगले समजले आहे, त्यावर चर्चा करायची गरज नाही. त्या काळात कानाला तृप्त करणारे, विलास देणारे कदाचित दोनच शब्द असावेत. असावेत काय? होतेच जणू, पहिला शब्द म्हणजे ’नकारात्मक’ (पशसरींर्ळींश) आणि दुसरा शब्द म्हणजे ’ऑक्सिजन संपृक्तता पातळी’ (जुूसशप डर्रीीींरींळेप ङर्शींशश्र) आता तुम्ही कल्पना करू शकता की, ‘सोडियम थायोसल्फेट’ उपलब्ध नसेल, तर काय होईल. काही वैज्ञानिकांचा, संशोधक लोकांचा असा अंदाज आहे की, ‘सोडियम थायोसल्फेट’चा वापर करून ऑक्सिजनची संपृक्तता पातळी किती आहे, हे पाहता येते. हे इतके समृद्ध आहे की, औषध रसायनशास्त्रात याचे अस्तित्व आपल्याला बहुतेक सर्व ठिकाणी दिसत असतेच.
आम्हाला येथे विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, रसायनशास्त्रज्ञ यांना प्रेरित करायचे आहे, जेणेकरून देशाला विकसित राष्ट्राकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग असेल. शेवटी आपल्याला ‘जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’ हे घोषवाक्य माहीतच आहे. विज्ञान एक साधन म्हणून त्याचा वापर भारतासाठी काही महान शास्त्रज्ञ घडविण्यासाठी आपण करायला हवा. प्रथमतः आणि अंततः एक भारतीय म्हणून मी हे कबूल करू इच्छितो की, माझा देश लवकरच प्रगती करेल, लोकांना जीवघेण्या आजारांपासून बरे करण्यासाठी विज्ञानाचे शस्त्र हाती घेऊन दया, करुणा, शांती दर्शविणारा खर्या अर्थाने भाग्यविधाता बनेल. ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभोनी राहो.’ होय, आपण हे नक्कीच करू.
वैद्यकशास्त्र
राहुल कांबळे